भारतीय मच्छिमारांच्या मुद्द्यावर भारताने श्रीलंकेकडे नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय मच्छिमारांना पकडण्यासाठी श्रीलंकन नौदलाने केलेल्या गोळीबाराचा कोलंबोमध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. मंत्रालयाने सांगितले की, डेल्फ्ट आयलंडजवळ श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय मच्छिमार गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या भारतीय मच्छिमारांवर जाफना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीलंकेच्या कार्यवाहक राजदूताला परराष्ट्र मंत्रालयात बोलावून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'आज सकाळी डेल्फ्ट आयलंडजवळ 13 भारतीय मच्छिमारांना पकडताना श्रीलंकेच्या नौदलाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. मासेमारी बोटीवरील 13 मच्छिमारांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
यापूर्वी, श्रीलंकेच्या नौदलाने पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील कराईकल येथून 13 मच्छिमारांना बेट राष्ट्राच्या प्रादेशिक पाण्यात प्रवेश केल्याबद्दल अटक केली होती. पुद्दुचेरी सरकारच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, मच्छिमार आणि त्यांच्या यांत्रिक बोटींना मुक्त करण्यासाठी सरकार केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी करेल. अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांची नावे शोधण्यात येत आहेत.