पाकिस्तानात 'ईश्वरनिंदा' प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या हिंदू प्राध्यापकांची सुटका व्हावी असं तिथल्या लोकांना का वाटतंय? वाचा
शुमायला खान
“गेल्या चार वर्षांपासून आम्ही दारोदारी भटकतोय. आम्ही कोणत्याही घरात सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. आम्हाला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातायत. कृपया कोणीतरी आम्हाला न्याय द्या.
मुस्कान सचदेव यांनी या गोष्टी आम्हाला फोनवर सांगितल्या. मुस्कानचे वडील प्राध्यापक नूतन लाल सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. सिंध न्यायालयाने त्याला ईश्वरनिंदा केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रोफेसर नूतन लाल यांच्या सुटकेसाठी सिंध प्रांतातील सामाजिक कार्यकर्ते आणि लेखकांनी शुक्रवारी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली.
पाकिस्तानाबाहेर राहणारा सिंधी समाजही या मोहिमेत सहभागी झालाय.
एकाच ठिकाणी वास्तव्य करू शकत नाही
मुस्कान सचदेव यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांचे 60 वर्षीय वडील चार वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांनी 30 वर्षे सरकारी नोकरी केली.
त्या म्हणतात, “आमच्या कुटुंबावर कधीही कारवाई झाली नाही. आम्ही तीन बहिणी असून आम्हाला एक दहा वर्षांचा भाऊ आणि आई आहे. 2019 पासून आम्ही अनेक समस्यांचा सामना करत आहोत. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या आणि फोन येतायत.
“आम्ही कुठेही शांतपणे राहू शकत नाही. आम्ही आमच्या घराचा पत्ता कोणालाही सांगू शकत नाही. आमच्या वडिलांचा पगार थांबला आहे. आमच्याकडे उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नाही.”, असंही त्यांनी सांगितलं.
प्राध्यापक नूतन लाल यांच्यावर काय आरोप आहेत?
नूतन लाल यांना 2019 मध्ये उत्तर सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात अटक करण्यात आली होती.
प्राध्यापक नूतन लाल वर्गात उर्दू शिकवत असताना घोटकीच्या शाळेत हा वाद सुरू झाल्याचं घोटकी पोलिसांचं म्हणणं आहे.
नूतन लाल यांच्या वर्गातील तासानंतर एक विद्यार्थी त्यांच्या इस्लाम विषयाचे धडे देणाऱ्या शिक्षकाकडे गेला आणि प्राध्यापक लाल यांनी इस्लामच्या प्रेषितांविरोधात चुकीची भाषा वापरल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला होता.
शिक्षकांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. नूतन लाल यांनी माफी मागितली आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता असं सांगितलं होतं.
मात्र तक्रारदार विद्यार्थ्याने ही घटना आपल्या वडिलांना सांगितली आणि फेसबुकवर पोस्टही लिहिली. यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.
या घटनेनंतर स्थानिक बाजारपेठेत संप झाला. यावेळी संतप्त जमावाने नूतन लाल यांच्या शाळेवर हल्ला करून तोडफोड केली.
दुसऱ्या गटाने नूतन यांच्या घरावरही हल्ला केला. यादरम्यान साई साधराम मंदिरावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. परिस्थिती चिघळल्याचं पाहता जिल्हा प्रशासनाने सुरक्षारक्षकांना पाचारण केलं.
न्यायालयाने प्राध्यापकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली
या प्रकरणी घोटकीच्या स्थानिक न्यायालयाने प्राध्यापक लाल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि दंडही ठोठावला.
एका हिंदू व्यक्तीला ईश्वरनिंदा केल्याप्रकरणी शिक्षा झाल्याची ही सिंधमधील अलिकडच्या काही वर्षांतील पहिलीच घटना होती.
न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलंय की, फिर्यादी अब्दुल अजीज खान यांनी 14 सप्टेंबर 2019 रोजी घोटकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
खान यांनी तक्रारीत म्हटलंय की, 'त्यांचा मुलगा एका पब्लिक स्कूलमध्ये शिकतो. त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं की, शाळेचे मालक नूतन लाल वर्गात आले आणि इस्लामच्या प्रेषिताविरुद्ध अपशब्द वापरले आणि निघून गेले.'
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, 'त्यांच्या मुलाने मोहम्मद नावेद आणि वकास अहमद या दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत हे सांगितलं.'
अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुमताज सोलंगी यांनी आपल्या निकालात लिहिलंय की, 'फिर्यादीने सादर केलेले साक्षीदार 'स्वतंत्र आणि विश्वासार्ह' आहेत. त्यांचे जबाब 'द्वेषावर आधारित नव्हते' कारण त्यांच्यापैकी कोणाचंही आरोपींविरुद्ध वैयक्तिक वैर किंवा शत्रुत्व नव्हतं. अशा परिस्थितीत त्याच्या साक्षीवर अविश्वास ठेवण्याचं कोणतेही कारण नाही.'
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, आरोपी नूतन यांच्यावर आरोप सिद्ध करण्यात फिर्यादीला यश आलं, त्यामुळे त्यांना जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
दंड न भरल्यास आरोपीला आणखी चार महिने तुरुंगवास भोगावा लागेल, असं न्यायालयानं सांगितलं. या निर्णयानुसार अटकेच्या दिवसापासून शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे.
नूतन यांचा चुलत भाऊ महेश कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, या घटनेचे साक्षीदार प्रत्यक्षदर्शी नव्हते, फक्त अफवा होत्या. फिर्यादीने साक्षीदार म्हणून हजर केलेल्या व्यक्तीही त्यांचे शेजारी आहेत.
उच्च न्यायालयात अपिल प्रलंबित
महेश कुमार यांनी सांगितले की, उत्तर सिंधमधील कोणताही वकील त्यांची बाजू मांडण्यास तयार नाही.
यानंतर त्यांनी हैदराबाद येथील पुरोगामी वकील युसूफ लघारी यांच्याशी संपर्क साधला. लघारी यांनी या खटल्याची बाजू मांडण्यासाठी 600 किलोमीटरचा प्रवास केला, मात्र गेल्या दोन वर्षांपासून या खटल्याची सुनावणी पुढे सरकलेली नाही.
महेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 नोव्हेंबरला होणार आहे. न्यायालय किमान नूतन यांच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेऊन या प्रकरणात न्याय देईल आणि नूतन लाल यांची सुटका करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चार वर्षांपासून तुरुंगात असलेल्या नूतन लाल यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. प्राध्यापक नूतन लाल या हॅशटॅगद्वारे त्यांनी आपली मतं व्यक्त केली.
जेसी शर्मा या एक्सवरील वापरकर्त्यानं लिहिलंय की, प्राध्यापक नूतन लाल यांच्यावर ईश्वरनिंदा केल्याचा आरोप होता. त्यांना तुरुंगात जाऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटलाय.
"प्राध्यापक नूतन लाल यांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आलं होतं, कोणताही गुन्हा केला नसतानाही त्यांना शिक्षा झालेय. आम्ही त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करतो."
अधिकाऱ्यांना अपील करताना सपना सेवानी यांनी लिहिलंय की, "प्राध्यापक नूतन लाल पंजन सरीन यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यात आली."
"आम्ही पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाला आणि पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी आवाहन करतो. आपण एकत्र येऊन त्याच्या स्वातंत्र्यासाठी पावले उचलूया."
सुनील ठाकुरिया यांनी लिहिलंय की, 'प्राध्यापक नूतन लाल यांना सोडा आणि इतर धर्माच्या लोकांच्या जीवाशी खेळणं बंद करा.'
दिलीप रतनी यांनी सांगितलं की, प्राध्यापक नूतन लाल यांच्या सुटकेसाठी आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेला पाकिस्तान सरकारवर राजकीय दबाव टाकण्याचं आवाहन करतो.
नारायण दास भिल यांनी लिहिलं, "पाकिस्तानने आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आपल्या धर्मनिंदा कायद्यांचा पुनर्विचार करावा. ईश्वरनिंदा कायद्याचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे.
मुस्लीम कार्यकर्ते आणि नागरिकांनीही सोशल मीडियावर आपली चिंता व्यक्त केली आणि प्राध्यापक नूतन लाल यांच्या सुटकेची मागणी केली.
अब्दुल सत्तार बाकर यांनी एक्सवर संताप व्यक्त करत म्हटलं की, ''जर तुम्हाला या देशात टिकून राहायचं असेल, तर तुम्हाला देवाची भीती वाटते की नाही हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला मौलवींची भीती बाळगण्याची नक्कीच गरज आहे."
सीनघर अली चंडियो या आणखी एका नागरिकानं लिहिलंय की, "निरपराध नागरिकांना त्रास देण्यासाठी ईश्वरनिंदा कायद्याचा गैरवापर करणं थांबवा."
मुबारक अली भट्टी यांनी लिहिलं, “प्राध्यापक नूतन लाल यांच्यावर ईश्वरनिंदा केल्याचा आरोप होता. त्यांना तुरुंगात जाऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटलाय.
“प्राध्यापक नूतन लाल यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलं होतं, कोणताही गुन्हा केला नसताना त्यांना शिक्षा देण्यात आलेय. त्यांची तात्काळ सुटका व्हावी, अशी करण्याची आमची मागणी आहे.”