सुधारणावादी नेते डॉ. मसूद पेझेश्कियान बनले इराणचे नवीन राष्ट्राध्यक्ष

शनिवार, 6 जुलै 2024 (13:03 IST)
डॉ. मसूद पेझेश्कियान यांची इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ. पेझेश्कियान हे इराणमधील सुधारणावादी नेते मानले जातात.
 
डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे माजी सचिव असलेल्या सईद जलिली यांचा पराभव केला आहे.
 
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं विमान अपघातात निधन झाल्यानं 28 जून 2024 रोजी इराणमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या होत्या.
 
इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 3 कोटी मतदारांनी मतदान केलं होतं. त्यापैकी 53.3% मतं मसूद डॉ. पेझेश्कियान यांना मिळाली तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या सईद जलिली यांना 44.3% मतदारांची पसंती मिळाली.
 
28 जून रोजी झालेल्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला बहुमत न मिळाल्याने 5 जुलै रोजी झालेली रन ऑफ निवडणूक चुरशीची ठरली. पहिल्या फेरीत फक्त 40% मतदान झालं होतं.
 
सोशल मीडियावर डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या लोकांचे तेहरानमधील व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. इतरही शहरांमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
 
डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांमध्ये हातात हिरवा झेंडा (डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्या प्रचारात वापरण्यात आलेला झेंडा) घेतलेले तरुण दिसत आहेत.
 
पेझेश्कियान इस्लामिक रिपब्लिकच्या महिलांसाठीच्या कठोर ड्रेस कोडला विरोध करतात आणि एक आण्विक करार करून इराणवरील पाश्चात्य निर्बंध संपुष्टात आणू इच्छितात. बड्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.
 
इराणच्या राष्ट्रीय पोलीस दलाचा एक महत्त्वाचा भाग असणाऱ्या मोरॅलिटी पोलिस यंत्रणेवर डॉ. पेझेश्कियान यांनी बऱ्याचदा टीका केली आहे. डॉ. मसूद पेझेश्कियान हे एक हृदयरोगतज्ज्ञ असून इराणला मुख्य प्रवाहात आणण्याचं आश्वासन त्यांनी निवडणूक प्रचारात दिलं होतं.
 
तसेच डॉ. पेझेश्कियान यांनी 2015 च्या अणु कराराच्या नूतनीकरणाबाबत पाश्चात्य देशांशी 'रचनात्मक वाटाघाटी' करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. इराणने पाश्चात्य निर्बंध कमी करण्याच्या बदल्यात त्याच्या आण्विक कार्यक्रमावर अंकुश ठेवण्याचं मान्य केलं आहे.
 
डॉ. पेझेश्कियान यांचे मुख्य प्रतिस्पर्धी राहिलेले सईद जलिली यांना इराणच्या बहुतांश धार्मिक गटांचे समर्थन असल्याचं बोललं जात होतं.
 
पण, इराणमधली खरी सत्ता सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी चालवतात.
 
इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीची पहिली फेरी 28 जूनला पार पडली. इराणची एकूण लोकसंख्या 90 दशलक्ष आहे. त्यापैकी फक्त 61.5 दशलक्ष मतदार मतदानासाठी पात्र आहेत.
 
त्यामुळे अनेक बडे राजकीय नेते या निवडणुकीपासून वंचित राहिले. या निवडणुकीत फक्त सहा जण रिंगणात होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी माघार घेतली होती.
 
पाश्चात्य देश आणि इराण यांच्यातील अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेत मध्यस्थी करणारे राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे माजी सचिव सईद जलिली आणि संसदेचे विद्यामान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बाख कालिबाफ यांच्या खरी लढत असल्याचं बोललं गेलं पण 69 वर्षीय हार्टसर्जन मसूद पेझेक्शियान हे विजयी झाले आहेत.
 
मात्र, सध्याच्या सरकारमुळे मतदारांचा भ्रमनिरास झाल्यामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविण्याची चर्चा आहे. मार्च महिन्यात झालेल्या संसद निवडणुका आणि 2021 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत सर्वात कमी मतदान झालं होतं.
 
राष्ट्राध्यक्षांना कोणते अधिकार असतात?
राष्ट्राध्यक्ष लोकांमधून निवडून गेलेला अधिकारी असतो आणि सर्वोच्च नेत्यानंतर दुसऱ्या स्थानावर त्याला मान असतो. सरकारचा दैनंदिन कारभार चालवणे आणि देशांतर्गत धोरणांसह परराष्ट्र व्यवहारांवर अध्यक्षाचा प्रभाव असतो.
 
पण, सुरक्षेच्या बाबतीत त्यांचे अधिकार तुलनेने मर्यादीत आहेत. राष्ट्राध्यक्षांचे गृहमंत्रालय राष्ट्रीय पोलीस दलाचा कारभार बघतात.
 
पण, या दलाचे कमांडर सर्वोच्च नेत्याने नियुक्त केलेले असतात आणि हे कमांडर सर्वोच्च नेत्यालाच उत्तरदायी असतात. इस्लामिक रिव्हॉल्यूशन गार्ड कॉर्प्स आणि BASIJ च्या कमांडरच्या बाबतीतही हाच नियम आहे. संसदेद्वारे देखील राष्ट्रपतींच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवलं जातं.
 
सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे अधिकार काय आहेत
अयातुल्ला खामेनी इराणमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असून 1989 पासून ते सर्वोच्च नेते आहेत. ते राज्याचे प्रमुख आणि कमांडर इन चीफ आहेत. पोलीस दलही त्यांच्या अधिकारात येतात.
 
अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेले इस्लामीक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि त्याची स्वयंसेवी शाखा BASIJ रेझिस्टन्स फोर्स ज्याचा वापर इराणमधील असंतोष शमवण्यासाठी केला जातो हे दोन्ही दल खामेनी नियंत्रित करतात.
 
इराणमध्ये सत्तेला कसं आव्हान देण्यात आलं?
इराणच्या कठोर ड्रेस कोडचं उल्लंघन केल्यामुळे मॉरॅलिटी पोलिसांनी 22 वर्षीय महसा आमिनी यांना ताब्यात घेतलं होतं. यात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये मोठमोठे मोर्च झाले. यामुळे इराणच्या सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला होता.
 
या कारवाईत शेकडो लोक मारले गेले तर हजारोंना ताब्यात घेतल्याचं मानवाधिकार गटाचं म्हणणं आहे. ड्रेस कोडच्या मुद्द्यावरून असंतोष वाढला आणि एकूणच सत्ताधाऱ्यांबद्दल राग जनतेच्या मनात आहे.
 
मोरॅलिटी पोलिस म्हणजे काय?
मोरॅलिटी पोलिस किंवा मार्गदर्शक गस्त हा राष्ट्रीय पोलीस दलाचा एक भाग आहे. 1979 च्या इस्लामिक रिव्हॉल्युशनने आणलेला ड्रेस कोड बद्दलचे कायदे आणि इस्लामिक मूल्यांचं पालन होतंय की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी या दलाची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली. यामध्ये 7 हजार महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांना इशारा देण्याचा, दंड ठोठावण्याचा आणि संशयितांना अटक करण्याचा अधिकार आहे.
 
इराणमध्ये आंदोलन पेटण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच दिवंगत राष्ट्राध्यक्ष रायसी यांनी ‘’इराणचा हिजाब आणि पवित्रता कायदा’’ कडक करण्याचे आदेश दिले.
 
त्यामुळे स्त्रियांवर ड्रेस कोडचे बंधन आलं. या कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या महिलांवर पाळत ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले आणि सोशल मीडियावर हिजाबच्या नियमांना विरोध करणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा लागू करण्यात आली होती.
 
रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कोण असतात?
रिव्होल्यूशनरी गार्ड्स नियमित सैन्यापासून स्वतंत्रपणे काम करतात. IRGC ही अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी इराणची एक मुख्य संस्था म्हणून काम करतेय.
 
आता या संस्थेकडे एक प्रमुख लष्करी, राजकीय आणि आर्थिक शक्ती असून यामध्ये दीड लाखांपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.
 
स्वतःच्या भूदल, नौदल आणि हवाई दलासह ते इराणच्या शस्त्रांवर देखील देखरेख ठेवण्याचं काम करते. त्यांच्याकडे कुड्स फोर्स असून ते गुप्तपणे मध्य पूर्वेतील त्यांच्या सहकाऱ्यांना पैसा, शस्त्रे, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देत असते. तसेच IRGC हे BASIJ रेझिस्टन्स फोर्सवर देखील नियंत्रण ठेवण्याचं काम करते.
 
BASIJ काय आहे?
BASIJ हे एक स्वयंसेवी निमलष्करीय संघटना असून 1979 मध्ये स्थापन करण्यात आली. या संघटनेलाच अत्याचारितांची एकत्रीकरण संघटना म्हणूनही ओळखले जाते. या संघटनेचा इराणच्या प्रत्येक प्रांतात, शहरात आणि देशाच्या सरकारी संस्थांमध्ये शाखा आहे.
 
संघटनेच्या पुरुष आणि महिला सदस्यांना BASIJIS म्हणून ओळखलं जातं आणि ते संघटनेप्रती आणि IRGC च्या आदेशाचं पालन करतात. लाखभर सदस्य हे अंतर्गत सुरक्षेचं काम बघतात. 2009 च्या वादग्रस्त राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीपासून सरकारविरोधात आंदोलनं दडपण्यात या संघटनेचा मोठा वाटा आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती