काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी राज बब्बर यांनी ही माहिती दिली. प्रियांका कधी आणि कोणत्या मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात करतील, हे अजून निश्चित व्हायचे आहे, असेही बब्बर यांनी स्पष्ट केले.
राज बब्बर यांनी घोषणा केल्याने प्रियांका गांधी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळणार, हे निश्चित झाले आहे. निवडणुकीत प्रचार करण्यास प्रियांका यांनी तयारी दर्शवली आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत उत्तर प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत प्रियांका गांधी उपस्थित होत्या. त्यावेळीच त्या प्रचाराच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा होती. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका गांधी १५० विधानसभा मतदारसंघात शीला दिक्षित यांच्यासाठी मते मागतील. दरम्यान, प्रियांका गांधींकडे प्रचाराची धुरा दिल्यास प्रत्यक्षात किती फायदा होईल, असे दिल्लीत झालेल्या बैठकीत अमेठी आणि रायबरेली येथून आलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारले होते. तसेच पक्षाची रणनिती ठरवणारे प्रशांत किशोर यांची योजना काय आहे, याबाबतही चर्चा झाली होती.