येथे बनणार जगातील सर्वात उंच लाकडी इमारत

सोमवार, 5 मार्च 2018 (16:11 IST)
जपान देशातील एक कंपनी 2041 साली येणार्‍या आपल्या 350व्या वर्धापनदिनानिमित्त जगातील सर्वात उंच लाकडी इमारत बनविण्याच्या तयारीला लागली आहे. या इमारतीला 'डब्ल्यू 350' असे नाव देण्यात आले असून ही इमारत सत्तर मजली असणार आहे. ह्या इमारतीच्या निर्माणामध्ये केवळ दहा टक्के स्टील वापरले जाणार असून बाकी नव्वद टक्के वापर लाकडाचा केला जाणार आहे. ह्या गगनचुंबी इमारतीध्ये आठ हजार घरे असणार आहेत, तसेच प्रत्येक घराच्या बाल्कनीमध्ये एक लहानशी बाग देखील असणार आहे. जपान देशामध्ये वारंवार भूकंप होत असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन या इमारतीसाठी लाकूड आणि स्टील वापरून बनविल्या गेलेल्या 'ब्रेस्ड ट्यूब स्ट्रक्चर'चा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल सहाशे बिलियन येन म्हणजे सुमारे 36,000 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. पण 2041 सालापर्यंत तंत्रज्ञानामध्ये नवनवीन विकास झाले असण्याची शक्यता असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चामध्ये कपात करता येणे शक्य असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 2010 साली जपानमध्ये पारित केलेल्या नव्या कायद्यानुसार तीन मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींमध्ये लाकडाचा वापर करणे बंधनकारक केले गेले आहे. पण लाकडाच्या इमारती बनविल्या जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. जगामध्ये अनेक गगनचुंबी इमारतींचे निर्माण, लाकडाचा वापर करून केले गेले आहे. मिनियापोलीसध्ये लाकडाने बनविली गेलेली अठरा मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे वँकूव्हरमध्येदेखील 53 मीटर उंचीचीलाकडी इमारत बनविली गेली आहे. ह्या इमारतीध्ये विद्यार्थ्यांसाठी निवासस्थाने आहेत. इमारतींच्या निर्माणासाठी वापरले जाणारे स्टील आणि काँक्रिट पर्यावरणासाठी हानिकारक समजले जाते. या तत्त्वांपासून अनुक्रमे आठ आणि पाच टक्के कार्बन उत्सर्जन होत असते. या उलट लाकडामधून कार्बन उत्सर्जित केला जात नाही. पण लाकडाच्या इमारती बनविताना सर्वात मोठे आव्हान असते, ते म्हणजे या इमारती अग्रिप्रतिरोधक बनविणे. त्यासाठी आजकाल क्रॉस लॅमिनेटेड टिंबरचा वापर करण्यात येत आहे. हे लाकूड स्टील प्रमाणेच अग्रिप्रतिरोधक असून जास्त तापानामुळे देखील या लाकडाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती