पाकिस्तानच्या पंजाबमध्ये मंदिरावर हल्ला, मूर्तींची तोडफोड

गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (10:56 IST)
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिरेक्यांनी आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड केली आहे. दिवसाढवळ्या मंदिरावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये कट्टरवाद्यांचा जमाव मंदिराची तोडफोड करताना दिसत आहे. पाकिस्तानी सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मते, ही घटना पंजाब प्रांतातील रहीम यार खणाजवळील भोंग शहराची असल्याचे सांगितले जात आहे.
 
मंदिराच्या आत तोडफोड
पंजाबमधील भोंग शहरातील गणेश मंदिरात अतिरेक्यांनी गोंधळ घातला. त्यांनी केवळ मूर्ती तोडल्या नाहीत, तर मंदिरातील झुंबर, काच यासारख्या सजावटीच्या वस्तूंची तोडफोड केली. या दरम्यान, या कट्टरपंथीयांची मोठी गर्दी मंदिर परिसरात उपस्थित होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या प्रकरणांप्रमाणे या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

इम्रानच्या पक्षाच्या नेत्याने निषेध केला
इम्रान खान यांच्या पक्षाचे पीटीआयचे नेते आणि युवा हिंदू पंचायत पाकिस्तानचे संरक्षक जय कुमार धिरानी यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे. जिल्ह्यातील भोंग शरीफ येथील मंदिरावरील या भयंकर हल्ल्याचा तीव्र निषेध करतो, असे त्यांनी लिहिले. हा हल्ला प्रिय पाकिस्तानच्या विरोधातील कट आहे. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की दोषींना तुरुंगात टाका.
 
लॉकडाऊनमध्ये धर्मांतराची प्रकरणे वाढली
पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे की यामुळे अल्पसंख्याकांच्या मनात असुरक्षिततेची भावनाही वेगाने वाढली आहे. पोलिसांच्या ढिसाळ वृत्तीमुळे आणि इम्रान खान यांच्या सरकारमध्ये कडक कायदे नसल्यामुळे कट्टरपंथियांचा उत्साह आणखी वाढला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती