नोबेल पुरस्कारः इराणी महिलांसाठी लढणाऱ्या नर्गिस मोहम्मदींना शांततेचं नोबेल

शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (15:56 IST)
इराणी महिलांवरील अत्याचाराविरोधात लढणाऱ्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.त्यांनी इराणी महिलांच्या मानवी हक्क आणि स्वातंत्र्यासाठी मोलाचं कार्य केल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.शुक्रवारी (6 ऑक्टोबर) नोबेल समितीने या पुरस्काराची घोषणा केली.
 
इराण सरकारने त्यांना आतापर्यंत 13 वेळा अटक केली आहे. तर त्यांना पाचवेळा दोषी ठरवलं. त्यानंतर त्यांना 31 वर्षांचा तुरुंगवास आणि 154 फटके मारले आहेत.
 
या पुरस्काराची घोषणा झाली असली तरी त्या अजूनही तुरुंगातच आहेत.
 
दरवर्षी 6 पैकी 5 पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते तर नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची निवड नॉर्वेमध्ये केली जाते.

यॉन फॉस यांना यंदाचं साहित्याचं नोबेल देण्यात आलं आहे. ते नॉर्वेचे असून त्यांच्या नाटक आणि इतर लेखनाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आल्याचं नोबेल समितीनं म्हटलं आहे.
 
यंदाचा रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मौंगी बवेंडी, लुई ब्रुस आणि अ‍ॅलेक्सी एकिमोव्ह यांना देण्यात आला आहे.
 
क्वांटम डॉट्सचा शोध आणि त्यावर संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 1980-90 च्या दशकात तिघांनी स्वतंत्रपणे हे तंत्रज्ञान विकसित केलं.
 
हे क्वांटम डॉट्स तंत्रज्ञान एलईडी लाईट्स, टीव्ही स्क्रीन, सोलर पॅनेल्सपासून ते वैद्यकशास्त्रातही ट्यूमर काढण्याच्या शस्त्रक्रियेही वापरलं जातं.
 
प्रकाशावर महत्त्वाचे प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील सन्मान
यंदाचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्राऊझ आणि अॅनी लुलिए यांना दिले जाणार आहे.
 
त्यांच्या संशोधनातून आपल्याला अणूरेणूंच्यामधील इलेक्ट्रॉन्स कणांच्या अभ्यासाची वेगळी साधनं मिळाली.
त्यांनी प्रकाशाची अगदी छोटी स्पंदनं तयार करण्याचा मार्ग शोधून काढला. त्यामुळे इलेक्ट्रॅान्सची हालचाल आणि त्यांच्यातील ऊर्जेच्या भारामध्ये होणारे बदल मोजता येणं शक्य झाले आहे, असं नोबेल समितीने म्हटलं आहे.
 
प्रोफेसर पियरे अगस्टिनी अमेरिकेतील ओहायो विद्यापीठात शिकवतात. प्रोफेसर फेरेंक क्राऊझ जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमध्ये क्वांटम ऑप्टिक्स शिकवतात. प्रोफेसर अॅनी लुलिए स्वीडनमधील एका विद्यापीठात शिकवतात.
 
1919 पासून भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे.
 
कोरोना लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल
याआधी सोमवारी (2 ऑक्टोबर) mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या जोडीला फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 
ड्रू वाईसमन आणि कॅटलिन कारिको यांना विभागून हा पुरस्कार जाहीर झाला.
 
हे तंत्रज्ञान कोव्हिड साथीच्याआधी प्रायोगिक पातळीवर होते. पण ते आता जगभरातील करोडो लोकांच्या उपयोगी येत आहे.
 
कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणार्‍या न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी (nucleoside base modifications) संबंधित त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.
mRNA तंत्रज्ञानाच्या आधारे आता इतर आजार आणि अगदी कर्करोगावरही संशोधन केले जात आहे.
 
"कोव्हिड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यासाठी दोन नोबेल विजेत्यांनी केलेले शोध महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण निष्कर्षांद्वारे, mRNA आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तींशी कसा संवाद साधतो याचा या शास्त्रज्ञांच्या जोडीने अभ्यास केला," असं नोबेल समितीने सांगितलं.
 
रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी मेसेंजर आरएनए (mRNA) नावाच्या अनुवांशिक कोडचा रेणू वापरतात. विषाणूचा हल्ला झाल्यानंतर प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करण्यास ते मदत करतं.
 
सोमवारपासून (2 ऑक्टोबर) 2023 सालच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी पहिल्या विजेत्याची घोषणा केली.
 
कोणत्या क्षेत्रांत नोबेल पुरस्कार दिले जातात?
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात. या सगळ्या क्षेत्रांमध्ये अल्फ्रेड नोबेल यांना प्रचंड रस होता.
 
आधीच्या 12 महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो.
 
नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहीलं आहे, "prizes to those who, during the preceding year, have conferred the greatest benefit to humankind" म्हणजेच आधीच्या वर्षभरात मानवजातीसाठी महत्त्वाचं ठरणारं काम करणाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात यावेत.
 
या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने 1968 मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
 
2023चे पुरस्कार खालील तारखेला जाहीर होणार
 
2 ऑक्टोबर : वैद्यकशास्त्र
 
3 ऑक्टोबर : भौतिकशास्त्र
 
4 ऑक्टोबर : रसायनशास्त्र
 
5 ऑक्टोबर : साहित्य
 
6 ऑक्टोबर : शांतता
 
9 ऑक्टोबर : अर्थशास्त्र
 
दरवर्षी 6 पैकी 5 पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते तर नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची निवड नॉर्वेमध्ये केली जाते.
 
नोबेल विजेत्यांची निवड कशी केली जाते?
दर वर्षी प्रत्यक्ष क्षेत्रासाठीच्या विजेत्यांची निवड विविध संस्थांद्वारे केली जाते. 6 पैकी 5 पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते तर नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची निवड नॉर्वेमध्ये केली जाते.
 
शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठांचे प्राध्यापक, वैज्ञानिक, पूर्वीचे विजेत आणि इतर मिळून नामांकनं (nominations) दाखल करतात. त्यानंतर त्यातून काही नावं शॉर्टलिस्ट केली जातात.
 
पुरस्कारासाठी विचार करण्यात येत असलेल्या व्यक्तींची यादी नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार पुढची 50 वर्षं प्रसिद्ध केली जाऊ शकत नाही.
 
पुरस्कार विजेत्यांना Laureates म्हटलं जातं. प्राचीन ग्रीसमध्ये विजेत्यांना Bay Laurel च्या पानांनी गुंफलेली डोक्यावर अडकवायची wreath किंवा शिरपेच दिला जाई. त्यावरुन हा लॉरिएट्स (Laureates) शब्द आलेला आहे.
 
नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त 3 विजेत्यांची निवड एकाच वर्षी केली जाऊ शकते.
 
अशीही काही वर्षं होती ज्यावेळी हे पुरस्कार देण्यात आले नाही. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान हे पुरस्कार देण्यात आले नव्हते.
 
यासोबतच नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार जर एखाद्या वर्षी, एखाद्या क्षेत्रात कोणीच जर पुरस्कारासाठी पात्र नसेल तर पुरस्कार दिला जात नाही. त्या बक्षीसाचा निधी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवला जातो.
 
कोणत्या भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे?
रविंद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते.
 
भारतीय नोबेल विजेते
रविंद्रनाथ टागोर - 1913 साहित्य
सर चंद्रशेखर वेंकट ऊर्फ सी. व्ही. रमण - 1930 भौतिकशास्त्र
हरगोविंद खुराणा - 1968 वैद्यकशास्त्र
मदर टेरेसा - 1979 शांतता पुरस्कार (वाचा मदर तेरेसा यांना नोबेल पुरस्कार मिळण्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?)
सुब्रमण्यम चंद्रशेखर - 1983 भौतिकशास्त्र
अमर्त्य सेन - 1998 अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार
सर व्ही. एस. नायपॉल - 2001 साहित्य
वेंकटरमणन रामकृष्णन - 2009 रसायनशास्त्र
कैलाश सत्यार्थी - 2014 - शांतता पुरस्कार (मलाला युसुफजाई यांच्यासह)
अभिजीत बॅनर्जी - 2019 - अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार (एस्थर डुफ्लो यांच्यासह)
 






Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती