चीन मध्ये काही दिवसांपासून गूढ आजार पसरत आहे. चीनमध्ये या दोन न्यूमोनियाच्या वाढत्या केसेसची नोंद होत आहे,लहान मुलांना या आजाराची लागण होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून या बाबत सूचना देण्यात आल्या आहे. हे पाहून केंद्र सरकार आधीच सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सूचना जारी केली आहे. सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयांच्या सज्जतेच्या उपाययोजनांचा तातडीने आढावा घ्यावा, असे म्हटले आहे.
या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. आरोग्य विभागाने तातडीने वरिष्ठ पातळीवर उपाययोजनांचा आढावा घ्यावा, असे या पत्रात म्हटले आहे. यासोबतच हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता, इन्फ्लूएंझासाठी औषधे आणि लस, ऑक्सिजन, अँटीबायोटिक्स, पीपीई किट, टेस्टिंग किट आणि इतर साहित्य तपासण्यास सांगितले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना संसर्गाच्या संदर्भात सुधारित पाळत ठेवण्याचे धोरण अवलंबण्यास सांगितले आहे.
चीनमध्ये पसरणाऱ्या या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही सांगितले आहे की, आरोग्य मंत्रालय चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराच्या वाढत्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये पसरत असलेल्या या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यांना रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा सुरू ठेवण्याच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.