भारतात यंदा तब्बल 38 लाख लग्नं, किमान 4.74 लाख कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता
शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (21:40 IST)
अमिताभ भट्टासाली
व्यापाऱ्यांच्या एका राष्ट्रीय संघटनेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या एकूण लग्नांपैकी सुमारे 50 हजार लग्नं अशी असणार आहेत ज्यात एका लग्नात किमान एक कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाईल.
भारतात आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत किमान 38 लाख लग्नं होणार असल्याची आकडेवारी देशातील विविध शहरांमधून मिळाली आहे.
आणि विशेष म्हणजे या लग्नांवर किमान 4.74 लाख कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.
याशिवाय 7 लाख लग्नं अशी असणार आहेत ज्यात प्रत्येकी 3 लाख रुपयांपेक्षा कमी खर्च केला जाईल. तर इतर 50 हजार लग्नं अशी असतील ज्यात प्रत्येकी 50 लाख रुपये खर्च केले जातील.
तर दुसऱ्या बाजूला असेही पालक आहेत जे लग्नात एक लाखांपेक्षाही कमी खर्च करतील.
महाराष्ट्रातही दिवाळीनंतर आणि विशेषत: तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराई सुरू होते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागात या लग्नांमध्ये थोड्याफार प्रमाणात वेगळेपणा आढळतो. पण खर्चाचा विषय घेतला तर राज्यात कोणत्याही लग्नात गेला तरीही आपल्याला या प्रसंगी अवाढव्य खर्च केल्याचं आपल्याला दिसून येत.
अनेकदा हा खर्च मुलीच्या कुटुंबीयांना करावा लागतो. मुलीचा बाप कर्ज काढून लग्नात खर्च करतो आणि पुढचे काही वर्षं ते कर्ज फेडत राहतो, असंही सर्रास पाहायला मिळतं.
पण आजकाल हा ट्रेंड बदलत आहे. एकतर लग्नाचा खर्च वाटून घेतला जातो किंवा मुलाकडील मंडळी पण लग्नाचा खर्च उचलतात.
आपल्याकडे जरी हुंडा पद्धत बंद झाली असली तरी मुलीला लग्नात अनेक महागड्या वस्तू देताना आपण पाहतो.
लग्नात मोठ्या चारचाकी गाड्यांपासून हेलिकॉप्टर भेट दिल्याच्या घटना आपण याआधी बातम्या पाहिल्याच असतील.
यंदा एकट्या दिल्लीत 4 लाख लग्नं पार पडणार असून त्यावर 1.25 लाख कोटी रुपये खर्च होणार असल्याचं व्यापारी संघटनेने सांगितलं.
संघटनेने दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह देशातील 30 शहरांतील व्यापाऱ्यांची माहिती गोळा केली आहे.
गेल्या वर्षीच्या लग्नसराईत देशात 32 लाख लग्नं पार पडली. त्यावर अंदाजे 4.4 लाख कोटी रुपये खर्च झाले होते.
लग्नामध्ये भरमसाठ खर्च
व्यावसायिकांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 'केंद्र सरकार आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना काही महिन्यांपूर्वीच बोनस आणि इन्सेंटिव्ह मिळाला आहे. अशा परिस्थितीत लोकांकडे मुला-मुलींच्या लग्नावर खर्च करण्याएवढा पैसा आहे.'
ते म्हणाले, "कोरोना काळात लोकांना लग्नसोहळे थाटामाटात साजरे करता आले नाहीत. या वर्षी लोकांनी दिवाळीत खूप पैसे खर्च केलेत, त्याचप्रमाणे हिवाळी हंगामातील लग्नाच्या खर्चातही नवा विक्रम होणार आहे. दिवाळीत संपूर्ण देशभरात 3.75 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. लग्नसराईत नवा विक्रम प्रस्थापित केला जाईल."
कोणत्या वस्तूवर किती खर्च
भारतात मोठ्या थाटामाटात होणाऱ्या लग्न समारंभांना 'द बिग फॅट इंडियन वेडिंग' म्हटलं जातं.
खंडेलवाल सांगतात की, भारतीय लग्नाच्या खरेदीवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी 10 टक्के खर्च साडी आणि लेहेंगा यासारख्या गोष्टींवर होतात. याशिवाय 15 टक्के दागिन्यांवर आणि पाच टक्के विद्युत उपकरणांवर खर्च केले जातात.
लग्नावरील एकूण खर्चापैकी अर्धा खर्च खरेदीवर आणि उर्वरित खर्च विविध सेवांवर केला जातो. आता लग्न समारंभ आयोजित करताना या सर्व गोष्टींचे नियोजन करण्यासाठी वेडिंग प्लॅनरचा वापरही वाढला आहे.
दिल्लीस्थित इव्हेंट मॅनेजर आणि वेडिंग प्लॅनर सीरत गिल यांनी या सराईत एका लग्न समारंभाची तयारी सुरू केली आहे.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "लग्नाच्या दिवशी होणाऱ्या खर्चापैकी सुमारे 50 टक्के खर्च लग्नाच्या ठिकाणचं भाडं आणि केटरिंगवर केला जातो. याशिवाय 15 टक्के खर्च सजावटीवर, 10 टक्के व्हिडिओग्राफी, सात टक्के मद्य, पाच टक्के मनोरंजनावर केला जातो. शिवाय मुलगी आणि तिच्या कुटुंबाच्या मेकअपवर तीन टक्के खर्च केला जातो. याशिवाय 10 टक्के खर्च विविध सेवांवर केला जातो. यात आमच्यासारख्या वेडिंग प्लॅनरच्या फीचाही समावेश असतो."
एक सारखी लग्नं
बहुतेक मुलं-मुली त्यांची लग्न भारतीय चित्रपट आणि मालिकांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या लग्न सोहळ्यासारखी करतात.
त्यामुळे बहुतांश भारतीय लग्नसमारंभ सारखेच दिसतात. काही वेळा तर हा समारंभ कोणाचा आहे हे ओळखणं देखील कठीण होऊन जातं.
वेडिंग प्लॅनर सीरत गिल सांगतात, "जोडपी, विशेषत: मुली सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेले सेलिब्रिटी आणि लग्न समारंभ पाहून त्यांच्या लग्न समारंभाचे नियोजन करतात."
ते सांगतात, "बहुतेक मुली त्या मोसमातील ट्रेंडिंग लग्न सोहळ्याच्या धर्तीवर त्यांच्या लग्नाची योजना आखतात. त्यामुळेच देशात होणारी सर्व लग्न जवळपास सारखीच दिसतात."
"अनेक वधू-वर भव्य समारंभ आयोजित करतात. कोरोना नंतर, विवाहसोहळ्यांची संख्या देखील वाढत आहे. अशावेळी जास्त पैसे खर्च न करता अतिशय वैयक्तिक विवाह समारंभ देखील आयोजित केले जातात."
बंगाली विवाह सोहळे
आजकाल, बहुतेक बंगाली कुटुंबांमध्ये उत्तर भारतीय प्रथा परंपरांना सुरुवात झाली आहे. जसं की, मेहंदी आणि संगीत लग्नासोहळ्यातील अविभाज्य भाग बनले आहेत.
बहुतांश ठिकाणी उत्तर भारतात होणाऱ्या विवाहसोहळ्यांच्या धर्तीवर विवाहस्थळाची सजावटही केली जाते.
पण काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे.
28 नोव्हेंबरला कोलकाता येथील चैताली चटर्जी यांच्या मुलीचं लग्न पार पडणार आहे. त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने होणार आहे.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "आम्ही आमच्या जुन्या घरात इलेक्ट्रिक लाईट आणि झुंबर लावलं आहे. आमचे नातेवाईक काही दिवस इथे राहतील. लग्न आणि स्वागत समारंभ वगळता, दररोज सुमारे दोनशे लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे."
त्या सांगतात, "आमच्याकडे वेडिंग प्लॅनरची गरज नाही. आम्ही आमच्या कुटुंबात लग्न पाहिली आहेत तसंच आम्ही आमच्या मुलीचं लग्न करू. आमच्याकडेही नाच-गाणं असेल. पण ते घरच्या मुलींपुरतं मर्यादित असेल."
त्या पुढे म्हणल्या, "माझ्या मुलीनेही सोशल मीडियावरचे लग्न सोहळे पाहिले. पण तिला पारंपरिक पद्धतीनेच लग्न करायचं आहे."
दुप्पट खर्च
लोकांच्या हातात पैसा आल्याने लोक मुला-मुलींच्या लग्नावर अवाढव्य खर्च करत असल्याचं व्यापारी संघटनांचं म्हणणं आहे.
अगदी कमी खर्चात लग्न केलेल्या पालकांशीही बीबीसीने संवाद साधला.
नाव न जाहीर करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं की, "मुलाच्या लग्नासाठी सुमारे 70 ते 80 हजार रुपये खर्च येणार आहे. दहा वर्षांपूर्वी मी माझ्या मेव्हण्याचं लग्न केलं होतं. आता सोनं म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी.. सगळ्याच्याच किंमती दुप्पट झाल्या आहेत. पण लग्न केलं तर पाहिजे, शेवटी एकच मुलगा आहे."