जगभरातली ट्विटर कार्यालयांना टाळं, कर्मचाऱ्यांची ऍक्सेस कार्ड बंद, आज होणार मोठी कर्मचारी कपात

शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (11:56 IST)
ट्विटरची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे गेल्यापासून अनेक घडामोडी घडत आहेत. ट्विटरमधल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार की राहणार याविषयी आज चित्र स्पष्ट होईल.
 
ट्विटरला योग्य मार्गावर नेण्यासाठी ही नोकरकपात गरजेची आहे असं एका मेलमध्ये कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे.
 
सध्या ट्विटरची सर्व ऑफिसेस बंद राहणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. तसंच ज्या आयकार्ड मुळे कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळतो तेसुद्धा काम करेनासं झालं आहे.
 
गेल्या आठवड्यात इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवली आहे.
 
शुक्रवारी (4 नोव्हेंबर) ला आम्ही जगभरातील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचं कठीण काम करणार आहोत, असं या मेलमध्ये म्हटलं आहे.
 
"ज्यांनी ट्विटरसाठी भरघोस योगदान दिलं आहे त्यांच्यावर या निर्णयाचा परिणाम होईल याची आम्हाला कल्पना आहे. मात्र दुरगामी यशासाठी हे पाऊल महत्त्वाचं आहे," मेलमध्ये पुढे हे स्पष्टीकरण दिलं आहे.
 
कर्मचारी आणि युझर्सची माहिती सुरक्षित रहावी यासाठी मर्यादित लोकांना ऑफिसमध्ये प्रवेश दिला जात आहे.
 
नोकरीच्या भवितव्यासंदर्भात भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना मेल येणार आहे.
 
ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी शाबूत आहे. त्यांनाही एक मेल पाठवण्यात येणार आहे.
 
ज्यांची नोकरी जाणार आहे त्यांनी वैयक्तिकरित्या या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे.
 
"आमचे कर्मचारी जगभरात पसरले आहेत, त्यामुळे या निर्णयाची माहिती लवकरात लवकर मिळावी यासाठी इमेलद्वारे माहिती दिली जाणार आहे," असं ट्विटरतर्फे सांगण्यात आलं आहे.
 
अमेरिकन प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार कर्मचाऱ्यांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा मस्क यांचा मानस आहे. त्यामुळे एकूण 3700 लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
 
कंपनीच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना एक यादी तयार करायला सांगितली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना काढायचं आहे त्यांचं नाव या यादीत टाकण्यास सांगण्यात आलं आहे.
 
बियान्स या क्रिप्टोकरन्सी कंपनीने ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चान्पेंग झाओ म्हणाले, "कमी कर्मचारी असतील तर त्याचा जास्त फायदा होईल."
 
ट्विटर कंपनीत इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असूनसुद्धा नवीन फिचर आणण्याचा कंपनीचा वेग अतिशय कमी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
 
कर्मचारी कपातीबरोबरच ब्लू टिकसाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशावरूनही ट्विटरवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
 
जे लोक ब्लू टिकसाठी पैसे देतील त्यांचे ट्वीट प्रमोट केले जातील आणि त्यांना जाहिरातीही कमी दिसतील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
 
आम्हालाही बिलं भरावी लागतात, अशी टिप्पणी इलॉन मस्क यांनी केली होती.
 
गेल्या अनेक वर्षांपासून ट्विटरला नफा झालेला नाही आणि आणि वापरकर्त्यांची संख्यासुद्धा महिन्याला तीस कोटी इतकीच स्थिरावली आहे.
 
अनेक तज्ज्ञांच्या मते सध्याची आर्थिक स्थिती आणि शेअर बाजारातली तंत्रज्ञान कंपन्यांची स्थिती पाहता मस्क यांनी कंपनी विकत घेण्यासाठी जास्त पैसे दिले आहेत.
 
ट्विटरच्या Global communications विभागाचे माजी प्रमुख ब्रँडन बोरमन यांनी बीबीसीला मुलाखत दिली. इतर युझर्सच्या बरोबरीने रहायचं असेल तर पैसे द्यावे लागतील हा नियम ट्विटर कसा आणू शकते, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
 
कर्मचारी कपातीमुळे कंपनीच्या कामकाजावर आणि ट्विटरवर काय परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेत छापून आलेल्या बातमीनुसार मस्क यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना बराच वेळ ऑफिसमध्ये थांबवून ठेवण्यात आलं होतं.
 
मला कर्मचाऱ्यांकडून नैतिक वागणुकीची अपेक्षा आहे, असं मस्क म्हणाले होते. मात्र त्यांनी स्वत: यातून सूट मिळवली आहे.
 
ट्विटर विकत घेण्याचा करार झाल्यावर मस्क यांनी नऊ अधिकाऱ्यांचं संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त केलं होतं आणि एकटेच संचालक म्हणून कंपनीचा गाडा हाकत आहेत.
 
कंपनीवर एकछत्री अंमल ठेवण्याच्या दृष्टीने हे पाऊल होतं. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मस्क यांची निकटवर्तीय माणसं ट्विटरमध्ये रुजू होऊ शकतात.
 
बीबीसी प्रतिनिधी जेम्स क्लायटन यांनी केलेल्या विश्लेषणानुसार ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. जेम्स यांनी ट्विटरच्या एका कर्मचाऱ्यांशी बातचीत केली. हा कर्मचारी त्या मेलची वाट पाहत असल्याचं ते म्हणाले.
 
हजारो कर्मचाऱ्यांची कपात हाही ट्विटरमध्ये होणाऱ्या बदलाचा एक भाग आहे.
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती