इस्लामाबाद-हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना २५ डिसेंबरला आई आणि पत्नीची भेट घेता येणार आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैजल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एका पाकिस्थानी वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार , कुलभूषण जाधव आणि पत्नी-आईच्या भेटीवेळी भारतीय दूतावासाचे अधिकारीही उपस्थित असतील, असे फैजल यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानने गेल्या महिन्यात जाधव यांना पत्नीची भेट घेण्यास परवानगी दिली होती. पाकिस्तानने मानवतेच्या आधारावर हा निर्णय घेतला होता. त्यानंतर जाधव यांना आईलाही भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. तसेच आई आणि पत्नीच्याही सुरक्षेची हमी देण्यास सांगितले होते.