इस्रायलच्या लष्करानं पॅलेस्टिनी नागरिकाला जीपच्या बोनेटवर बांधले, IDF ने दिला दुजोरा
रविवार, 23 जून 2024 (11:32 IST)
इस्रायलच्या लष्करानं पश्चिम किनारपट्टीवरील जेनिन शहरात छापेमारी करताना एका जखमी पॅलेस्टिनी नागरिकाला त्यांच्या जीपसमोर बांधून फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे.इस्रायलच्या लष्करानंही याला दुजोरा दिला असून, हे कृत्य करत त्यांच्या लष्करानं प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं असल्याचं म्हटलं आहे.या प्रकाराचा व्हीडिओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलांनी याबाबत कबुली दिली आहे.
छापेमारीदरम्यान दोन्ही बाजूनं झालेल्या गोळीबारात हा संशयित व्यक्ती जखमी झाला होता, असं इस्रायलच्या लष्करानं (IDF) दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
जखमींच्या कुटुंबानं सांगितलं की, "त्यांनी जेव्हा रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली त्यावेळी लष्करानं त्यांना सोबत घेतलं आणि त्यांना जीपच्या बोनेटवर बांधून तशीच जीप चालवत नेली."
या जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रेड क्रेसेंटकडे पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं IDF नं सांगितलं आहे.
इस्रायलच्या लष्कराने काय सांगितले?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रत्यक्षदर्शींनी जखमी व्यक्ती स्थानिक नागरिक असून त्यांचं नाव मुजाहीद आझमी असल्याचं सांगितलं.
"शनिवारी सकाळी दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान बुर्किन भागामध्ये संशयितांना पकडण्यासाठी छापेमारी करण्यात येत होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी IDF वर गोळीबार केला आणि त्याला लष्करानं प्रत्युत्तर दिलं," असं IDF नं निवेदनात म्हटलं आहे.
"गोळीबारादरम्यान एक संशयित जखमी झाला आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं. पण आदेश आणि आदर्श प्रक्रियेचं उल्लंघन करत संशयिताला ताब्यात घेत लष्करानं गाडीच्या बोनेटवर बांधलं.
"घटनेचा जो व्हीडिओ समोर आला आहे, त्यातील लष्कराचं कृत्य हे IDF च्या मूल्यांच्या विरोधी आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल," असं आयडीएफकडून सांगण्यात आलं आहे.
गाझापट्टीमध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासूनच पश्चिम किनारपट्टी भागामध्ये हिंसाचारात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. हमासनं 7 ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली होती.
संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, पूर्व येरूसलेमसह पश्चिम किनारपट्टीवर झालेल्या संघर्षामध्ये किमान 480 पॅलेस्टिनी, सशस्त्र दलांचे सदस्य, हल्लेखोर आणि नागरिक मारले गेले आहेत.
तर पश्चिम किनारपट्टीवर सुरक्षा दलातील 6 सदस्यांसह एकूण 10 इस्रायलीदेखिल मारले गेले आहेत.
दोन हवाई हल्ल्यांत 38 पॅलेस्टिनी ठार
हमासनं दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलनं शनिवारी गाझा शहरातील इमारतींवर दोन हवाई हल्ले केले. त्यात किमान 38 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले आहेत.
इस्रायलच्या लष्करानं हमासच्या तळांवर हल्ला केल्याचं सांगितलं. मात्र याबाबत नंतर माहिती दिली जाणार आहे, असं सांगण्यात आलं.
गाझाच्या निर्वासितांचं ऐतिहासिक शिबिर असलेल्या अल-शत्ती भागातील निवासी भागात अनेक हल्ले झाल्याचं, गाझा सिव्हिल डिफेन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
तर दुसऱ्या एका हल्ल्यात अल-तुफाह भागातील अनेक घरांना लक्ष्य करण्यात आल्याचं हमासच्या राज्य माध्यम कार्यालयानं सांगितलं.
याबाबत समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये लोक धूळ आणि ढिगाऱ्यांनी माखलेल्या रस्त्यांवरून जखमी लोकांना घेऊन जाताना आणि वाचलेल्यांचा शोध घेत असल्याचं दिसत आहे.
याआधी आलेल्या बातम्यांमध्ये मृतांची संख्या 42 असल्याचं सांगण्यात आलं होतं.
या हल्ल्यांमध्ये हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याचं इस्रायली माध्यमांनी म्हटलं आहे.
गाझा शहरातील सिव्हिल डिफेन्स प्रवक्ते हुसेन मुहैसेन यांनी हा हल्ल्याचा परिणाम एखाद्या भूकंपासारखा झाल्याचं सांगितलं.
ते म्हणाले की, "संपूर्ण परिसराला लक्ष्य करण्यात आले, घरं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक कुटुंबं अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेली आहेत."
"काही जखमींना बाप्टिस्ट रुगणालयात पाठवण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. रुग्णवाहिकांसाठी उपकरणं आणि इंधनाची कमतरचा असल्यानं स्थिती अत्यंत वाईट आहे."
हमासचे कमांडर होते लक्ष्य
इस्रायलच्या माध्यमांच्या माहितीनुसार त्यांच्या लष्करानं गाझामध्ये हमासचे प्रमुख कमांडर राद साद यांना ठार करण्याचा प्रयत्न केला आहे.
हमासच्या अनेक मोहिमांचं नेतृत्व त्यांनी केलं असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
तर इस्रायलनं लेबनानमध्ये केलेल्या एका हवाई हल्ल्यात हमासचे ज्येष्ठ सदस्य आणि अल जमाल अल इस्लामियाशी संबंधित सदस्यांला मारण्याचा दावा करण्यात आला आहे.
IDF च्या माहितीनुसार हमास कमांडर अयमान घतमा हमासला शस्त्र उपलब्ध करून देण्यासाठी जबाबदार होते. घतमा यांना खैरा शहराच्या जवळ कारमध्ये प्रवास करताना ड्रोन हल्ल्यानं लक्ष्य करण्यात आलं होतं.
"रेड क्रॉसवर लष्कराकडून थेट हल्ला करण्यात आला नव्हता" अशी माहिती दक्षिण गाझाच्या अल मसावी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या प्राथमिक तपासात समोर आल्याचं इस्रायली लष्करानं सांगितलं.
या घटनेची तत्काळ चौकशी करण्यात आली आणि त्याचे निष्कर्ष समोर ठेवण्यात आल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेल्या हमासच्या हल्ल्यात 1,200 लोक मारले गेले होते. तर 251 जणांना बंदी बनवून गाझाला नेण्यात आलं होतं.
हमास प्रशासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, यानंतर इस्रायलनं गाझावर गेलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 37,551 जण मारले गेले आहेत.
एप्रिलच्या अखेरीपर्यंत मारल्या गेलेल्यांमध्ये लहान मुलं, महिला आणि वृद्धांचा आकडा 14,680 एवढा होता.