इस्रायल म्हणतो, 'शत्रूला मोठी किंमत मोजायला लागणार', 'हमास'च्या आक्रमक हल्ल्यानंतर प्रतिक्रिया

शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (15:20 IST)
इस्लामी कट्टरवादी गट 'हमास'ने इस्रायलवर अचानक हल्ला करून देशात प्रवेश केला आहे.
शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने तब्बल 5 हजार रॉकेट्स डागण्यात आल्याचा हमास या इस्लामी कट्टरतावादी गटाने दावा केला आहे.
 
या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरन वाजले. तेल अवीव आणि दक्षिण गाझाच्या आसपासच्या भागात स्फोट झाल्याचंही वृत्त आहे.
 
या हल्ल्यात इस्रायलमधील एका महिलेचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत.
 
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार अनेक पॅलेस्टिनी कट्टरतावादी गाझामधून दक्षिण इस्रायलमध्ये घुसले आहेत.
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आम्ही युद्धात असून आम्हीच जिंकू अशी प्रतिक्रिया दिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार नेत्यानाहू म्हणाले, आमच्या शत्रूला कळणारही नाही इतकी याची किंमत मोजावी लागेल.
 
इस्रायल 'युद्धाच्या तयारीत'
गाझामधून अचानक झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्कर युद्धासाठी तयार असल्याचं इस्रायल संरक्षण दलाने घोषित केलं आहे.
 
संरक्षण मंत्र्यांनी लष्करातील राखीव सैनिकांनाही तयार राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
 
इस्रायली लष्कराने प्रत्युत्तरासाठी गाझा पट्टीवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्याची हमासला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, परिस्थितीचं मुल्यांकन करून आम्ही प्रतिहल्ला करू असा इस्रायलने इशारा दिला आहे.
 
इस्त्रायली लष्कराने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे.
 
पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या हमास गटाची गाझावर सत्ता आहे.
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे.
 
इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी इस्रायलमध्ये सध्या सामान्य परिस्थिती नसल्याचं सांगितलं आहे
“ज्यू लोकांच्या सुटीच्या दिवशी इस्रायलवर गाझाकडून एकत्रित हल्ला होतोय. हमासच्या दहशतवाद्यांची रॉकेट हल्ला केला आणि जमिनीवरून घुसखोरी केलीय. ही सामान्य परिस्थिती नाहीये. पण यात इस्रायचाच विजय होईल,” असं गिलॉन यांनी म्हटलं आहे.
 
'दक्षिण इस्रायलमध्ये रस्त्यावर गोळीबार'
इस्रायलमधील बीबीसी प्रतिनिधी योलांद नेल यांनी दिलेल्या माहितीनुसार :
 
पॅलेस्टिनी कट्टरतावादी दक्षिण इस्रायलच्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर गोळीबार करताना सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये दिसत आहेत.
 
हमासच्या कट्टरतावाद्यांनी इस्रायलच्या सेडेरोट भागातील घरे ताब्यात घेतल्याचंही वृत्त आहे.
 
शनिवारच्या पहाटे इस्रायलवर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा हल्ला सुरू झाला आहे.
 
यातील बहुतेक रॉकेट्स हवेतच नष्ट करण्यात इस्रायलला यश आलं आहे.
 
पण रॉकेट हल्ल्यामुळे या भागात अनेक ठिकाणी आग लागल्याचं दिसत आहे.
 
दुसरीकडे हमासच्या वरिष्ठ कमांडरने आपण इस्रायलवर हल्ल्या केल्याचं सांगितलं आणि सर्व पॅलेस्टिनीं लोकांना एकत्र लढण्याचं आवाहन केलं आहे.
 
इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, ते इस्रायली नागरिकांचे रक्षण करतील आणि हमासला त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागेल.
 


























Published By-Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती