इस्रायल-गाझा: 'आमची अवस्था कुत्र्या-मांजरांसारखी झाली आहे, त्यांना निवारा तरी मिळतो पण आम्हाला तोही नाही'

बुधवार, 6 डिसेंबर 2023 (23:20 IST)
जीन्स आणि स्लीपर (फ्लिप फ्लॉप) परिधान केलेले तरुण खान युनिसमधील नासेर हॉस्पिटलसमोर रांगेत उभे आहेत. जणू अंत्ययात्रेत आले असावेत असे ते उभे आहेत.
इस्रायलनं 1 डिसेंबरपासून दक्षिण गाझावर जोरदार बॉम्ब हल्ले करायला सुरुवात केल्यापासून शेकडो लोक मारले गेले आहेत.
 
आणीबाणी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण काळोखातली ही अशीच एक रात्र आहे.
 
स्क्रब (वैद्यकीय गणवेश) परिधान केलेले पुरुष बाहेर उभे आहेत. अचानक आवाज वाढतो आणि पुरुष आजूबाजूला गर्दी करू लागतात.
 
लोकांना प्रचंड धक्का बसला आहे आणि ते थकलेले आहेत.
 
एक कार येते, तिचे हॉर्न वाजतात, लाईट फ्लॅश होऊ लागतात. त्यातून एका तरुणाला ओढून बाहेर काढलं जातं, स्ट्रेचरवर टाकलं जातं आणि घाईत आत नेलं जातं.
 
धुळीनं माखलेली आणखी एक कार येते आणि एका लहान मुलाला मदत करत बाहेर काढलं जातं. तो चालू शकतो. अगदी लहान चार किंवा पाच वर्षांचा असेल.
 
दुसऱ्या दिवशी समाह इलवान नावाची सहा मुलांची आई मदतीसाठी याचना करत असते.
 
"मला संपूर्ण जगाला आणि बाहेरील अरब जगाला संदेश पाठवायचा आहे," असं त्या म्हणतात.
 
"मला जगाला संदेश पाठवायचा आहे की, आम्ही निर्दोष आहोत. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही."
 
हातातल्या दोन पाण्याच्या रिकामाच्या बाटल्या वर उचलून हवेत हलवत त्या सांगत आहेत की, त्यांच्या पाच मुली आणि एक मुलगा तहानलेले आहेत.
 
"आमची अवस्था कुत्र्या-मांजरांसारखी झाली आहे. पण कुत्र्या-मांजरांना निवारा तरी मिळतो. आम्हाला तर काहीच नाही. आम्ही रसत्यांवर अडकलो आहोत."
 
हमासनं 7 ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
 
अमेरिका आणि EU नं बंदी घातलेली दहशतवादी संघटना हमासने या हल्ल्यात 1200 जणांचा जीव घेतला तर 240 हून अधिक जणांना बंदी बनवून गाझाला घेऊन गेले.
 
त्यानंतर अनेक आठवडे जोरदार बॉम्बहल्ले आणि इस्रायलच्या उत्तर भागात आक्रमणात गेले.
 
हमास प्रशासनाच्या आरोग्य मंत्रालयानं 15800 लोक मारले गेले असून त्यात बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे.
 
त्यानंतर बंदींच्या देवाणघेवाणीच्या मुद्द्यावर एकमत करत सात दिवसांची शस्त्रसंधी लागू करण्यात आली.
 
पण आता युद्ध पुन्हा सुरू झालं आहे आणि मी खान युनिसमध्ये एकटा असून माझं कुटुंब मध्य गाझा मध्ये आहे.
 
काही दिवसांपूर्वीपर्यंत हे चांगल्या सिग्नलसह सॅटेलाईट ट्रकसाठी सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक होतं.
 
मला पत्रकार असल्याचा कायम अभिमान राहिला आहे. पण आता माझ्यासमोरचे पर्याय संपत आहेत. जीवनात सर्वकाही संपत चाललं आहे असं वाटतंय.
 
मला दर काही दिवसांनी कुटुंबाला भेटण्यासाठी मध्य गाझापर्यंत प्रवास करून जाता येत होतं. पण आता इस्लायलनं एक मार्ग बंद केला असून दुसरा मार्ग अत्यंत धोकादायक आहे.
 
मी मूळचा उत्तर भागातला आहे. पण इस्रायलच्या लष्करानं दिलेल्या आदेशानंतर आम्ही दक्षिण भागात आलो. त्यांनी आम्हाला दक्षिणेकडचा भाग सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं.
 
आता ते आम्हाला खान युनिसमध्ये धोकादायक लष्करी मोहीम राबवणार असल्याचा इशारा देत आहेत. त्यामुळं आम्ही आणखी दक्षिणेला म्हणजे इजिप्तच्या सीमेवर असलेल्या राफाहमध्ये जावं, असं ते सांगत आहेत.
 
युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या आणि माझ्या कुटुंबाबरोबर बरंच काही घडलं. पण मला यावेळी पहिल्यांदाच सर्वकाही गमावल्याची भावना निर्माण झाली आहे. माझ्यातली सर्व इच्छाशक्ती आणि नियंत्रण संपल्यासारखं मला वाटत आहे.
 
मला माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची सवय आहे, त्यासाठी माझ्याकडे योजना तयार असायची. पण आता मला निर्णयही घेता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
 
मी राफाहला जायला हवं की, माझं कुटुंब सुरक्षित राहील अशी आशा बाळगत काम करत राहायला हवं? की मी वार्तांकन (रिपोर्टिंग) करणं बंद करून त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करायला हवा? म्हणजे किमान आम्ही मरताना तरी एकत्र असू.
 
कोणालाही अशा प्रकारची निवड करावी लागू नये अशी मला आशा आहे. हे तर निवडीसाठीचे पर्यायही नाहीत.
 
Published By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती