इर्मा चक्रिवादळाने फ्लोरिडाच्या किनारपट्टीला जोरदार तडाखे दिले. ताशी 130 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांपुढे घरे, बोटी कोलमडून पडल्या. इमारतींच्या बांधकामांसाठीच्या अवजड क्रेनही या चक्रिवादळामुळे दूरवर फेकल्या गेल्या आहेत. या चक्रिवादळाचा पसारा 400 मैल इतका प्रचंड रुंद आहे. त्यामुळे फ्लोरिडाचा बहुतेक किनाऱ्याला या चक्रिवादळाचा जोरदार तडाखा बसला. पश्चिम किनारपट्टीकडे इर्मा सरकल्यावर त्याचा वेग थोडा मंदावला. मात्र तरिही मियामी आणि वेस्ट पाम बीचच्या दिशेने वेगवान वारे वाहत आहेत. वादळामुळे लक्षावधी घरांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
फ्लोरिडाचे गव्हर्नर रिक स्कोट यांनी फ्लोरिडातील नागरिकांसाठी अमेरिकावासियांना मदतीचे आवाहन केले आहे. सुमारे 1 लाख 60 हजार नागरिक या चक्रिवादळामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता असली तरी अद्याप जिवितहानीचे कोणतेही वृत्त नाही. गेल्या आठवड्यात कॅरिबियनमध्ये इर्मामुळे 24 जण मरण पावले होते. वादळाच्या काळात समुद्रात 10 फूट उंचीच्या लाटाही उसळल्या. त्यामुळे सागरी नौकांचे मोठे नुकसान झाले आहे. फ्लोरिडामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उद्यापासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.