'पाचव्या महिन्यांतच प्रसूती वेदना, प्रचंड रक्तस्राव; तरीही माझी जुळी मुलं जन्माला आली...'
शनिवार, 11 मार्च 2023 (21:28 IST)
सामान्यतः चाळीस आठवडे पूर्ण झाल्यानंतर बाळंतपण होतं. पण शकिना राजेंद्रन यांची प्रसूती दिवस पूर्ण भरण्याच्या आधीच झाली. तसे थोडेफार दिवस मागेपुढे होतातच, पण शकिना यांनी 22 व्या आठवड्यातच बाळांना जन्म दिला. म्हणजे 280 दिवसांऐवजी 126 दिवसांमध्येच त्यांची प्रसूती झाली. त्यांच्या या जुळ्या बाळांची नोंद मोस्ट प्रीमॅच्युअर ट्वीन्स म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली.
या मुलांचा जन्म कॅनडामध्ये झाला आहे.
पापा आणि बाबू अशी या दोघांची लाडाची नावं आहेत. त्यांची खरी नावं अदिहा आणि अॅड्रिएल नादराज अशी आहेत.
याआधी अमेरिकेतील लोआमधील बाळांची मोस्ट प्रीमॅच्युअर ट्वीन्स म्हणून नोंद झाली होती. 2018 साली त्यांचा जन्म झाला होता.
22 आठवडे पूर्ण व्हायला एक तास जरी बाकी असता तरी हॉस्पिटलने या बाळांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला नसता, असं गिनीज रेकॉर्डच्या सूत्रांनी सांगितलं.
या बाळांच्या आई शकिना राजेंद्रन यांनी सांगितलं की, त्यांना 21 आठवडे आणि 5 दिवस झाल्यानंतरच पोटात दुखायला लागलं. या बाळांच्या वाचण्याची शक्यता नसल्याचं डॉक्टरांनी तेव्हाच स्पष्टपणे सांगितलं.
हे शकिना यांचं दुसरं बाळंतपण होतं. त्यांचं पहिलं मूलं बाळंतपणादरम्यान दगावलं होतं. ओन्टारियोमधल्या त्यांच्या घराजवळ असलेल्या त्याच हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या बाळंतपणासाठी शकिना गेल्या होत्या.
शकिनाचे पती केव्हिन नादराज यांनी सांगितलं की, डॉक्टरांनी इतक्या लवकर होणाऱ्या प्रसूतीमध्ये आपण काहीच करू शकत नाही असं सांगितल्यावर तिने देवाची प्रार्थना करत रात्री जागून काढल्या.
24 ते 26 आठवड्यांदरम्यान प्रसूती होत असेल तरच बरेचसे हॉस्पिटल बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. पण सुदैवाने टोरांटोमधील माउंट सिनाई हॉस्पिटलच्या रुपाने या जोडप्याला आशेचा किरण मिळाला. या हॉस्पिटलमधल्या नवजात शिशू इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये विशेष सुविधा होत्या.
21 आठवडे आणि सहा दिवस पूर्ण झाल्यावरच त्यांना त्रास सुरू झाला. पण डॉक्टरांनी जे सांगितलं ते शकिना आजही विसरू शकत नाहीत.
22 आठवडे पूर्ण व्हायला काही मिनिटं जरी शिल्लक असतील, तर आमच्यासाठी बाळांना वाचवणं कठीण होईल, असं डॉक्टरांनी सांगितलेलं. त्यामुळे प्रचंड रक्तस्राव व्हायला लागला तरी, शकिना यांनी धीर न सोडता पुढचे काही तास आपल्या बाळांसाठी कळा सोसल्या.
पण बारा वाजायला पंधरा मिनिटं शिल्लक असतानाच पाणी जायला सुरूवात झाली आणि प्रसूती करणं गरजेचं झालं. अर्थात, तांत्रिकदृष्ट्या आता शकिना 22 आठवड्यांच्या प्रेग्नंट होत्या. दोन तासांनंतर त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला.
प्रीमॅच्युअर असल्यामुळे अगदी सुरूवातीला या बाळांना काही वैद्यकीय समस्या आल्या. पण आता ही दोन्ही बाळं वर्षाची झाली आहेत आणि पूर्णपणे निरोगी आहेत.
“पण अनेकदा आम्ही आमच्या बाळांच्या प्रकृतीत चढउतार होतानाही पाहिलेले. अगदी त्यांच्या वाचण्याचीही खात्री नसायची. डॉक्टर अजूनही त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून असतात. पण आता दोघेही जणं छान आहेत.”