बांगलादेश : ढाक्यामध्ये भीषण स्फोट; 15 जण जखमी, 100 हून अधिक जण जखमी
मंगळवार, 7 मार्च 2023 (23:38 IST)
बांगलादेशची राजधानी ढाक्यातील गुलिस्ताँ भागात मंगळवारी (7 मार्च) झालेल्या स्फोटात कमीत कमी 11 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शंभरपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
ही घटना ढाक्याच्या नॉर्थ साऊथ रोडच्या सिद्दीकी बाजारात संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास झाली. मृतांमध्ये नऊ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. जखमी लोकांना ढाका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
स्फोटाच्या वेळी बीबीसी बांगला प्रतिनिधी शाहनवाज रॉकी त्याच रस्त्याने जात होतो. घटनास्थळापासून त्यांचं वाहन फक्त 100 मीटर अंतरावर होतं.
शाहनवाज यांनी घटनास्थळावरून सांगितलं की स्फोटानंतर एक सात मजली इमारत कोसळली आणि दगड-मातीचा ढिगारा आजूबाजूच्या भागात पसरला. स्फोटामुळे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका बसच्या काचा फुटल्या आणि त्यातले अनेक प्रवासी जखमी झाले.
त्याशिवाय इमारतीच्या आसपास असलेल्या अनेक गाड्या, रिक्शा चालक आणि सामान्य लोक जखमी झाले.
बीबीसी प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार कॅफे क्वीन नामक या इमारतीच्या आसपास हार्डवेअरची दुकानं आहेत. स्थानिक लोकांच्या मते या इमारतीच्या वरच्या भागात काही ऑफिसेस आणि फ्लॅटही होते.
अनेक लोकांना ढिगाऱ्यातून काढलं
शाहनवाज रॉकी यांनी सांगितलं की, स्फोटामुळे आसपासचे अनेक लोक जखमी झाले होते. बीबीसी प्रतिनिधींनी पाहिलं की, एका ट्रकमधून जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं जात आहे. स्फोटानंतर अनेक लोक घटनास्थळी गोळा झाले.
फायर सर्विसेस कंट्रोल रुमचे अधिकारी रशीद बिन खालिद म्हणाले, “स्फोटाची माहिती मिळताच तिथे पोहोचलेल्या टीम ने तिथून चार मृतदेह ताब्यात घेतले आणि अनेक जखमींना वाचवलं. जखमींना इस्पितळात दाखल केलं जात आहे.”
मात्र ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे संचालक ब्रिगेडिअर जनरल मोहम्मद नजमुल हक यांनी सांगितलं, “मी कमीत कमी सहा मृतदेह पाहिले आहेत. आमच्याकडे 100 जखमींवर उपचार सुरू आहे. आता अनेक जखमी लोक हॉस्पिटलमध्ये येत आहेत. त्यामुळे मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी हॉस्टिपलच्या अनेक डॉक्टरांना आपात्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी बोलावलं जात आहे.”
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
फायर सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांना हा स्फोट कसा झाला आहे हे कळलेलं नाही.
तिथल्या एक प्रत्यदर्क्षी पत्रकारांनी सांगितलं, “मी ब्रिक बँकेच्या आसपास उभा होतो. अचानक एक स्फोटाचा आवाज ऐकून मी इमारतीच्या समोर गेलो तर तिथून बराच धूर निघत होता. तिथून निघालेले तुकडे समोर उभ्या असलेल्या लोकांना लागले. काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले.
इमारतीच्या समोर असलेल्या काही व्हॅनचे चालक भिंतीच्या खाली दबले गेले. अनेक जखमींच्या शरीरातून रक्त वाहत होतं.
गेल्या रविवारी ढाक्याच्या सायन्स क्लबमध्ये एका स्फोटात तीन लोकांचा मृत्यू झाला होता आणि 14 लोक जखमी झाले होते. शनिवारी चटगावच्या सीता कुंडमध्ये एका ऑक्सिजन कारखान्यात स्फोटामुळे सहा लोकांचा मृत्यू झाला होता.
अनेक स्फोट, चौकशी पूर्ण नाही
बांगलादेशमध्ये गेल्या एक महिन्यात ढाक्यासह अनेक शहरात स्फोट झाले आहेत.
गेल्या काही वर्षांत अशा अनेक घटना चर्चेत होत्या. मात्र बहुतांश प्रकरणात कोंडलेला गॅस हेच स्फोटाचं कारण सांगितलं जात आहे. यांच्यापैकी अनेक घटनांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.
फायर सर्व्हिसेसच्या मते सामान्य लोकांमध्ये दक्षतेचा अभाव असल्यामुळे अशा घटना होत आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना थोपवणं कठीण होत आहे.
आज घडलेल्या घटनेसारखी घटना 27 जून 2021 ला झालेल्या स्फोटाशी मिळतीजुळती आहे. तेव्हा या इमारतीच्या खाली कोणतंच गॅस कनेक्शन आढळलं नाही. गॅस सिलिंडर व्यवस्थित होतं तसंच नारायणगंज येथे 4 सप्टेंबर 2020 ला एका मशिदीत झालेल्या स्फोटात 34 लोकांचा मृत्यू झाला होता.