परिस्थिती तत्काळ पूर्वपदावर आणा, श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा लष्कराला आदेश

गुरूवार, 14 जुलै 2022 (10:51 IST)
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतरही तिथं तणावाची स्थिती कायम आहे.
 
मंगळवारी (13 जुलै) गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पळ काढला. सध्या ते मालदिवमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. पळाल्यानंतर 13 जुलैला ते राजीनामा देतील असं त्यांनी घोषित केलं होतं. पण 14 जुलै उजाडल्यानंतरसुद्धा त्यांनी राजीनामा दिलेला नाही.
 
गोटाबाया यांच्या पलायनानंतर पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांना कार्यकारी राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हातात घेताच विक्रमसिंघे यांनी पोलीस आणि लष्कराला देशातली स्थिती पूर्वपदावर आणण्याचे आदेश दिले आहेत.
 
बुधवारी (14 जुलै) रात्री रनिल विक्रमसिंघे यांन टीव्हीवर राष्ट्राला उद्देशून एक भाषण केलं. त्यात त्यांनी लोकांना राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या कार्यालयावरचा कब्जा सोडण्याचं आवाहन केलं आहे. बुधवारी आंदोलकांनी पंतप्रधानांचं कार्यालय ताब्यात घेतलं आहे. तर त्याआधीच लोकांनी राष्ट्रपतींचं निवासस्थानसुद्धा ताब्यात घेतलं आहे.
 
गोटाबाया राजपक्षेंनी देश सोडल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे, तसंच कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे.
 
विरोधीपक्ष नेते साजिथ प्रेमदासा यांनी मात्र विक्रमसिंघेच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
 
"संसदेत फक्त एक सदस्य असलेल्या पक्षाच्या नेत्याला आधी पंतप्रधान करण्यात आलं आणि आता राष्ट्राध्यक्ष ही लोकशाहीची मोठी थट्टा आहे," असं प्रेमदासा यांनी म्हटलंय.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती