‘तिच्या शरीराचे करवतीने तुकडे करून सूपच्या भांड्यांत शिजवले... पुढे काय झालं?’

शुक्रवार, 3 मार्च 2023 (16:03 IST)
या बातमीतलं कथन किंवा वर्णन काही वाचकांसाठी त्रासदायक ठरू शकतात
ती इंस्टाग्राम मॉडल होती, सोशल इन्फ्लुएन्सर होती. काही दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाली.
ती सापडली नाहीच, तिचा मृतदेह सापडला असंही म्हणणं धाडसाचं ठरेल. एका निर्जन ठिकाणी जेव्हा तिच्या शरीराचे अवशेष सापडले तेव्हा तिथे होतं मांसांचा लगदा करण्याचं मशीन, यांत्रिक करवत, फेस शिल्ड, दोन मोठाली सूप शिजवण्याची भांडी आणि हातोडी. तिथेच मानवी मांसाचे अवशेषही सापडले होते.
याच भांड्यात मानवी मांसाचे अवशेष सापडले होते.
 
इतक्या भयानक रितीने खून झाला ती तरुणी होती 28 वर्षांची अॅबी चोई. हाँगकाँग, आणि संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या एका खूनाची कहाणी.
 
अॅबी चोईचे अवशेष ती शेवटचं दिसली होती त्या कोवलोन शहरापासून 27 किलोमीटरवर असलेल्या लुंग मे गावातल्या एका बंदिस्त घरातल्या फ्रीजमध्ये सापडले.
 
कोण होती अॅबी चोई?
अॅबी चोई 28 वर्षांची प्रसिद्ध मॉडल, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, सोशलाईट होती. तिचं आयुष्य उत्तम कपडे, सौदर्यप्रसाधानं, पार्टी आणि फॅशन शोजने व्यापलेलं होतं. ग्लॅमर तिच्या दिनक्रमाचा भाग होता.
 
अनेक मॅगझिन्सच्या कव्हरवर तिचे फोटो झळकले होते. नुकतंच डिओर या लक्झरी ब्रँडच्या फॅशन शोमध्ये ती दिसली होती.
 
तिला इंस्टाग्रामवर 1 लाखाहून जास्त फॉलोअर्स होते.
अॅबी एका श्रीमंत घरातली होती. तिने मॉडलिंगमधून पैसा कमवलाच होता, पण तिच्या आई-वडीलही कोट्यधीश आहेत.
 
तिला दोन लग्नातून चार मुलं झाली होती.
 
वयाच्या 18 व्या वर्षी अॅबीने अॅलेक्स क्वांग-काँगची याच्याशी लग्न केलं. या लग्नातून त्यांना दोन मुलं झाली. पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला आणि तिने दुसरं लग्न ताम-चक-क्वान याच्याशी केलं. या लग्नातूनही तिला दोन मुलं आहेत.
 
नक्की काय घडलं?
अॅबी 21 फेब्रुवारीला तिच्या मुलीला शाळेत घ्यायला जाणं अपेक्षित होतं. पण ती गेलीच नाही. त्यावेळी ती बेपत्ता झाल्याचं कळलं. आधी तिचं अपहरण झालं असेल असं वाटलं.
पोलीस तपासाअंती लुंग मे गावातल्या एका घरात पोचले जिथे तिचे अवशेष फ्रीजमध्ये सापडले. तसंच मोठ्या सूपच्या पातेल्यात तिच्या मांसाचे अवशेष चिकटलेले दिसले.
 
अॅबीच्या कवटीच्या मागच्या बाजूला एक मोठी खोक पडलेली आढळून आली आहे. अणकुचीदार वस्तूने तिच्या डोक्यावर प्रहार करून तिचा खून झाला असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
 
एका चालत्या गाडीत तिच्यावर हल्ला झाल्याचं चीनच्या माध्यमांनी म्हटलंय.
 
या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा माजी नवरा अॅलेक्स क्वांग-काँग, त्याचा भाऊ आणि त्याच्या आईला अटक केली आहे.
अॅबीचे अवशेष ज्या घरात सापडले ते घरही अॅबीच्या माजी सासऱ्यांनी, क्वांग-काँगच्या वडिलांनी भाड्याने घेतल्याचं निदर्शनास आलं आहे.
 
अॅलेक्स काही कामधंदा करत नव्हता. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचं कुटुंब अजूनही अॅबीवर अवलंबून होतं. ती सगळी मंडळी अॅबीच्याच एका आलिशान फ्लॅटमध्ये राहात होती. तर तिने दिरालाही घर घ्यायला मदत केली होती.
 
अॅलेक्सला पैशासंबंधी फ्रॉड केल्यामुळे पोलीस शोधत होते. त्याने सोन्यात पैसे गुंतवून भरपूर परतावा देतो असं म्हणत अनेकांचे पैसे लुबाडल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. त्याच्यावर कर्जाच्या परताव्यासाठी खटलाही सुरू होता.
 
अॅलेक्सचा भाऊ अॅबीकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा. त्यानेच तिला गाडीत बसवून अपहरण केल्याचं समोर आलंय.
 
अॅलेक्स आणि अॅबीमध्ये पैशांवरून वाद होते. एका प्रॉपर्टीच्या कारणावरून अॅलेक्सने तिचा खून केल्याचं प्रथमदर्शनी समोर येतंय.
 
25 फेब्रुवारीला पोलिसांनी अॅलेक्सला देश सोडून जाताना अटक केली. त्याला सापळा रचून पकडण्यात आलं. तो एका स्पीडबोटीतून पळून जाणार होता. त्याला पकडलं तेव्हा त्याच्याकडे रोख रक्कम आणि लाखो रूपयांची महागडी घड्याळं सापडली.
 
Published By- Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती