टांझानियामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 155 जणांना जीव गमवावा लागला आहे. मुसळधार पावसामुळे सध्याची परिस्थिती पाहता टांझानियाचे पंतप्रधान कासिम मजलिवा यांनी यासाठी एल निनो हवामान पद्धतीला जबाबदार धरले आहे. टांझानियामध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते, पूल आणि रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
टांझानियाचे पंतप्रधान म्हणाले की, अतिवृष्टीमुळे 51,000 घरांचे नुकसान झाले आहे. 20,000 हून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरात अडकलेल्या लोकांना आपत्कालीन सेवांद्वारे सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. पाणी साचल्याने येथील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. पुरामुळे 226 लोक जखमी झाले आहेत. पूर्व आफ्रिकेत अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे.