हाचिको: जगातला ‘सर्वात प्रामाणिक कुत्रा’ झाला 100 वर्षांचा
रविवार, 16 जुलै 2023 (17:58 IST)
त्याचं आपल्या मालकावर प्रेम होतं. इतकं, की तो रोज त्याची स्टेशनबाहेर वाट पाहायचा आणि त्याच्यासोबतच घरी परतायचा. मालकाचं अचानक निधन झालं, तरी तो वर्षानुवर्ष तिथे उभा राहून वाटा पाहात राहायचा...
हाचिको नावाच्या एका प्रेमळ आणि प्रामाणिक कुत्र्याची ही गोष्ट कदाचित तुम्ही वाचली किंवा ऐकली असेल किंवा त्यावर आधारीत चित्रपट पाहिला असेल.
खरंतर हाचिकोचा जन्म झाला, तयाला आता 2023 मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. पण आजही त्याची कहाणी तेवढीच हृदयस्पर्शी आहे आणि जगभरात पोहोचली आहे.
आपल्या मालकाची वाट पाहण्याच्या मुद्रेतला हाचिकोचा पुतळा जपानच्या टोकियोमध्ये शिबुया रेल्वे स्टेशनबाहेर, अगदी गर्दीच्या ठिकाणी एका कोपऱ्यात उभा आहे आणि दरवर्षी हजारो लोक त्याला भेट देतात.
जपानमध्ये तर शाळेत मुलांना चुकेन हाचिको म्हणजे प्रामाणिक कुत्रा हचिकोची गोष्ट आवर्जून सांगितली जाते. प्रेम आणि निष्ठेचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
“प्रामाणिक, विश्वासार्ह, आज्ञाधारक, समजूतदार... हाचिको एकप्रकारे जपानचा आदर्श नागरिक आहे,” असं हवाई विद्यापीठातल्या ख्रिस्टिन यानो सांगतात.
तसं जभरातच प्रामाणिक श्वानांच्या अनेक कथा आहेत. पण हाचिकोची गोष्ट जगभरात पोहोचली आहे.
हाचिकोची गोष्ट
हाचिको हा अकिता इनु प्रजातीचा कुत्रा होता. त्याचा जन्म 1923 सालच्या नोव्हेंबरमध्ये ओडेट शहरात झाला, जे अकिता प्रांतात वसलं आहे.
या प्रांतातूनच अकिता इनु ही प्रजाती तयार झाली.
अकिता कुत्रे आकारानं मोठे असतात आणि ही जपानमधली श्वानांची सर्वात जुनी आणि सर्वात लोकप्रिय प्रजाती आहे. 1931 साली त्यांना जपानच्या सरकारनं राष्ट्रीय प्रतिकाचा दर्जा दिला.
एकेकाळी अकिता कुत्र्यांना रानडुक्कर, एल्क अशा प्राण्यांची शिकार करण्याचं प्रशिक्षणही दिलं जायचं.
हाचिकोविषयी पुस्तक लिहिणारे एत्सु सकुराबा सांगतात, “अकिता कुत्रे शांत, हुशार, धाडसी आणि मालकाशी प्रामाणिक असतात. ते काहीसे हट्टीपण असतात आणि मालकाशिवाय इतर कुणाचं ऐकत नाहीत.”
हाचिको आपल्या मालकांकडे कसा पोहोचला? तर त्याचे मालक हिडेसाबुरो उएनो एक नावाजलेले कृषीतज्ञ होते आणि टोकियोमधल्या विद्यापीठात शेतीविषयाचे प्राध्यापकही होते.
उएनो यांना कुत्रे आवडायचे आणि आपल्या एका विद्यार्थ्याला त्यांनी अकिता जातीचं पिल्लू आणण्यास सांगितलं होतं.
ट्रेनमधून लांबवरचा प्रवास करून ते पिल्लू 15 जानेवारी 2024 रोजी उएनो यांच्या घरी शिबुयामध्ये दाखल झालं. तेव्हा ते पिल्लू एवढं थकून गेलं होतं, की ते जिवंत आहे की नाही असा प्रश्न पडावा.
हाचिकोच्या चरित्रकार प्राध्यापक मायुमी इटोह सांगतात की, उएनो आणि त्यांची पार्टनर ये यांनी पुढे सहा महिने त्याची काळजी घेतली आणि त्याची तब्येत सुधारली.
त्यांनी या पिल्लाला हाचि असं नाव दिलं, ज्याचा जपानी भाषेत अर्थ होतो आठ. उएनो यांच्या विद्यार्थ्यांनी त्यापुढे को हे आदरयुक्त नाव जोडलं.
आपल्याकडे नावापुढे राव किंवा साहेब असं जोडतात ना, तसंच. आणि हाचिचा हाचिको झाला.
उएनो आठवड्यातून अनेकदा कामासाठी ट्रेननं प्रवास करायचे. ते शिबुया स्टेशनला जायचे तेव्हा हाचिकोसह त्यांचे तीन कुत्रे सोबत जायचे.
मग संध्याकाळी उएनो परत येईपर्यंत तिघं तिथे वाट पाहात थांबायचे.
21 मे 1925 रोजी वयाच्या 53व्या वर्षी उएनो यांचा मेंदूतील रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. हाचिको त्यांच्याकडे येऊन फक्त सोळा महिने झाले होते.
मायुमी इटोह लिहितात, “लोक डॉ. उएनो यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी जमा झाले, तेव्हा हाचि बाहेरून घरात आला. उएनो यांचा वास घेत लिव्हिंग रूममध्ये गेला. त्यांची शवपेटी ठेवली होती, त्या टेबलाखाली जाऊन बसला आणि तिथून हटायलाच तयार नव्हता.”
पुढचे काही महिने हाचिको शिबुयाबाहेर वेगवेगळ्या परिवारांसोबत राहिला. पण शेवटी 1925 साली उएनो यांच्याकडे बागकाम करणआऱ्या किकुसाबुरा काबायाशी यांच्याकडे त्याला पाठवण्यात आलं.
आपले दिवंगत मालक राहायचे, त्या जागी परतल्यावर हाचिको पूर्वीसारखं रोज स्टेशनवर जाऊ लागला. ऊन असो वा पाऊस, न चुकता नेमानं तो रोज स्टेशनवर जाऊन उभा राहायचा.
जपानचा राष्ट्रीय आयकॉन
जवळपास दशकभर हाचिको रोज न चुकता शिबुया स्टेशनवर जात राहिला.
"संध्याकाळच्या वेळी हाचि तिकीट गेटपाशी चार पायांवर उभा राहायचा आणि प्रत्येक प्रवाशाकडे असा बघायचा जणू तो कुणाच तरी शोध घेतो आहो," असं प्रा. इटोह लिहितात.
त्या सांगतात की स्टेशनवरच्या कर्मचाऱ्यांना आधी हा नस्ता उपद्व्याप वाटायचा. याकितोरी (जपानमधला एक चिकनपासून बनवलेला खाद्यपदार्थ) विकणारे त्याच्यावर पाणी उडवायचे. लहान मुलं त्याला त्रास द्यायची, मारायचीही.
तर काहींनी हाचिकोला आधीही प्राध्यापक उएनो यांच्यासोबत स्टेशनवर पाहिलं होतं आणि ते अधूनमधून हाचिला काही खायला घालायचे.
असं सांगतात की उएनो यांचे एक माजी विद्यार्थी आणि श्वानप्रेमी हिरोकिची सायटो यांनी एकदा शिबुया स्टेशनवर हाचिकोला पाहिलं, त्याचा पाठलाग केला, तेव्हा त्यांना उएनो आणि हाचिची गोष्ट लक्षात आली. त्यांनी हाचिवर लेख लिहायला सुरुवात केली.
मग ऑक्टोबर 1932 मध्ये हाचिकोवरचा एक लेख टोकियोतल्या असाही शिमबुन नावाच्या वृत्तपत्रानं प्रसिद्ध केला. त्यामुळे हाचिची गोष्ट देशभर पोहोचली आणि त्याला जपानमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली.
हाचिकोला दररोज खायला घालण्यासाठी लोक शिबुया स्टेशनला देणगी जमा करू लागले. त्याला पाहण्यासाठी लोक अगदी दूरवरून येत असतं.
कुणी त्याच्यावर कविता लिहिल्या, हायकू रचले. त्याचे फोटो काढले. 1934 साली हाचिचा पुतळा उभारण्यासाठी निधी जमा करण्यात आला, तेव्हा त्या कार्यक्रमाला 3,000 हून अधिक जण जमा झाले होते, असं त्यावेळेच्या काही बातम्या सांगतात.
हाचिकोचा पुतळा
8 मार्च 1935 रोजी हाचिकोचं निधन झालं. त्यावेळी अनेक वृत्तपत्रांनी अगदी पहिल्या पानावर त्याच्या निधनाची बातमी दिली होती.
हाचिकोवर अगदी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बौद्ध भिख्खू आणि मान्यवर लोकांनीही शोकसंदेश वाचून दाखवले. पुढच्या काही दिवसांत हाचिकोच्या पुतळ्याला आदरांजली वाहण्यासाठी हजारो लोकांनी शिबुया स्टेशनला भेट दिली.
शिबुया स्टेशनबाहेर 1934 सालीच हाचिकोचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात आला होता. पण दुसऱ्या महायुद्धादरम्यान युद्धकालीन गरजा भागवण्यासाठी तो वितळवण्यात आला.
मग 1948 साली पुन्हा नवा पुतळा उभारण्यात आला. त्यासाठी पैसे गोळा करण्यात आले.
युद्धानंतर खरंतर जपानची अर्थव्यवस्था ढासळली होती. त्या परिस्थितीतही हाचिकोच्या नव्या पुतळ्यासाठी 8 लाख येन जमा झाले.
आजच्या तुलनेत हा आकडा चार अब्ज येन किंवा भारतीय चलनात 2 अब्ज 36 कोटींहून जास्त एवढा भरतो.
आजही हा पुतळा शिबुया स्टेशनबाहेर उभा आहे.
हाचिको आता टोकियोमधला एक लँडमार्कच झाला आहे असं म्हणा ना.
म्हणजे लोक कुणाला भेटायचं असेल तर या पुतळ्यापाशी जमा होतात. अनेकदा राजकीय निषेधमोर्चे, आंदोलनंही या पुतळ्याजवळ आयोजित केली जातात.
हाचिकोची आठवण
ताकेशी यामामोटो विद्यार्थी असताना शिबुया स्टेशनवरून शाळेत जायचे आणि रोज हाचिकोला तिथे पाहायचे.
1982 साली एका वृत्तपत्रात त्यांनी हाचिकोविषयी लिहिलं होतं, “मागे वळून पाहिलं तर मला वाटतं की, डॉ. उएनो परतणार नाहीत, हे हाचिला माहिती असावं.
"पण तरीही तो वाट पाहात तिथे उभा राहिला. एखाद्यावर भरवसा ठेवणं किती महत्त्वाचं असतं हेच हाचिकोनं आपल्याला शिकवलं आहे.”
दरवर्षी 8 एप्रिल रोजी शिबुया स्टेशनबाहेर हाचिकोचा स्मृतीदिन साजरा केला जातो.
त्याच्या पुतळ्यावर कधी स्कार्फ, कधी सँटा क्लॉजची टोपी घातली जाते. अलीकडे कोव्हिडच्या साथीदरम्यान हाचिकोच्या पुतळ्यालाही मास्क घालण्यात आला होता.
टोकियोच्या नॅशनल म्युझियम ऑफ नेचर अँड सायन्समध्ये हाचिकोला टॅक्सीडर्मी म्हणजे कातडीत पेंढा भरून जतन करून ठेवण्यात आलं आहे.
त्याचे काही अवशेष टोकियोतल्या आओयामा दफनभूमीत त्याचे मालक उएनो आणि ये यांच्यासोबत दफन करण्यात आले आहे.
हाचिकोच्या जन्मगावी म्हणजे अकिता प्रांतातल्या ओडेट मध्येही त्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. उनेओ यांचं मूळ गाव हिसाई आणि टोकियो विद्यापीठातही त्याचे पुतळे उभारण्यात आले.
नंतर हाचिकोची कहाणी पुस्तकातून तसंच वेगवेगळ्या अनिमेशन सीरीज आणि फिल्ममधूनही मांडण्यात आली.
2009 साली हॉलिवूडमध्येही हाचिकोवर आधारीत चित्रपट तयार करण्यात आला, ज्यात अभिनेता रिचर्ड गेअरनं मुख्य भूमिका बजावली होती. तर लायला, चिको आणि फॉरेस्ट या तीन कुत्र्यांनी हाचिकोची भूमिका बजावली.
या चित्रपटाची कहाणी अमेरिकेतल्या ऱ्होड आयलंडमध्ये घडते. तिथेही आता हाचिकोचा पुतळा उभारण्यात आला आहे.
हाचिकोची जन्मशताब्दी
टोकियोला भेट देणारे लोक शिबुयातलं सर्वात व्यस्त ट्रॅफिक जंक्शन पाहायला येतात, तसेच ते इथे हाचिकोचा पुतळा पाहण्यासाठी येतात. त्याच्यासमोर फोटो काढतात.
आता 2023 या वर्षी हाचिकोची जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्तानं ओडेट शहरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
शिबुयामध्येही काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पण शतकभरानंतरही लोक या प्रामाणिक कुत्र्याचा जन्मदिवस साजरा करतील का? प्राध्यापक यानो सांगतात की, हिचिकोसारखं धाडस, त्याची कहाणी ही कालातीत आहे असं त्यांना वाटतं. ती कुठल्या एका पिढीपुरती मर्यादित नाही.
साकुराबा सांगतात, " 100 वर्षांनंतर आताही, हाचिकोचं निस्वार्थ, निरपेक्ष प्रेम बदललेलं नाही. हाचिकोची कहाणी यापुढेही कायम राहील."