Gaza War: इस्रायलने गाझामधील 400 ठिकाणी बॉम्बफेक केली, 704 पॅलेस्टिनी ठार

बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (07:26 IST)
इस्रायली लष्कराने गाझामधील हमासच्या लक्ष्यांवर हल्ले तीव्र केले आहेत. गेल्या 24 तासांत इस्रायली लष्कराने 400 हून अधिक लक्ष्यांवर बॉम्बफेक केली. हमासच्या तीन उपकमांडर्ससह शेकडो पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. गाझामध्ये 24 तासांत 704 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने मशिदींमध्ये बांधलेली हमासची अनेक कमांड सेंटर नष्ट केली. एक बोगदाही उद्ध्वस्त करण्यात आला, ज्याद्वारे दहशतवादी समुद्रमार्गे इस्रायलमध्ये घुसखोरी करत आहे. 
 
गाझामधील आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 5,791 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी गेल्या 24 तासांत झालेल्या हल्ल्यांमध्ये 704 जणांचा मृत्यू झाला. मंत्रालयाने असेही सांगितले की मृतांमध्ये 2,360 मुले आणि 1,100 हून अधिक महिलांचा समावेश आहे.
 
अधिका-यांनी सांगितले की, एका दिवसात बॉम्बस्फोटात 15 घरे जमीनदोस्त झाली. खान युनिस येथील पेट्रोल स्टेशनवर झालेल्या बॉम्बस्फोटात कुटुंबातील काही सदस्यांसह अनेक लोक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या सर्वांनी पूर्व गाझा येथून पलायन करून पेट्रोल स्टेशनमध्ये आश्रय घेतला होता. गाझा पट्टीवर मंगळवारी इस्रायली हवाई हल्ल्यात अनेक निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाडली गेली, असे स्थानिकांनी सांगितले. 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी पुन्हा सांगितले की, हमास पूर्णपणे संपल्यानंतरच ही मोहीम संपेल. इस्रायलचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल हाजी हालेवी यांनी स्पष्टपणे सांगितले की, आम्ही गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्यास तयार आहोत. त्याच वेळी, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, लष्कर पुढील टप्प्यातील कारवाईसाठी सरकारच्या निर्देशांची वाट पाहत आहे. ते म्हणाले, ही लढत दीर्घकाळ चालेल अशी अपेक्षा आहे. ओलिसांच्या सुटकेच्या वाटाघाटीमध्ये इजिप्त आणि कतार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
 



Edited by - Priya Dixit    
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती