फिलीपिन्सची राजधानी मनिला परिसरातील एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. गुरुवारी पहाटे राजधानी क्षेत्रात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथील आगीमुळे, एका तासात तीन मजली निवासी इमारत जळून खाक झाली आणि त्यात आठ जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. आगीत किमान एक व्यक्ती जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, बहुतेक लाकडी इमारतीत मध्यरात्रीनंतर लोक झोपेत असताना आग लागली. ही इमारत क्वेझोन शहरातील उपनगरातील सॅन इसिड्रो गालास गावात होती. आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. वरिष्ठ अग्निशमन अधिकारी रोलांडो व्हॅलेना यांनी प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत एपीला सांगितले की, दोन मृतदेह तळमजल्यावर आणि सहा मृतदेह दुसऱ्या मजल्यावर आढळले, जिथे आग लागली असावी.
फिलीपिन्समधील अनेक घातक आगी सुरक्षा नियमांचे पालन न करणे, गर्दी वाढणे आणि इमारतींच्या चुकीच्या डिझाइनमुळे झाल्या आहेत1996 मध्ये, क्वेझोन शहरातील एका डिस्कोमध्ये लागलेल्या आगीत १६२ लोकांचा मृत्यू झाला होता, त्यातील बहुतेक विद्यार्थी शाळेचा निरोप साजरा करत होते. शेजारीच असलेल्या एका नवीन इमारतीने आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग बंद केल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही.