डोनाल्ड ट्रंप यांच्यावर गोपनिय कागदपत्रं संडासात लपवल्याचा आरोप, ट्रंप यांचं प्रत्युत्तर

बुधवार, 14 जून 2023 (15:12 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी फ्लोरिडामधील मियामी इथल्या फेडरल कोर्टात आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रं आपल्या फ्लोरिडामधल्या निवासस्थानी लपविल्याप्रकरणी ट्रंप यांच्याविरोधातली ऐतिहासिक सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी ट्रंप यांनी या प्रकरणी आपण निर्दोष असल्याचं कोर्टात म्हटलं.
 
डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत (विद्यमान किंवा माजी) ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप लावण्यात आले आहेत.
 
बेकायदेशीररित्या सरकारी दस्तावेज स्वतःजवळ ठेवणं आणि ती परत मिळविण्यासाठीच्या सरकारी कारवाईत अडथळे आणण्याचा प्रयत्न करणं या आरोपांप्रकरणी ट्रंप यांच्या वकिलांनी ते दोषी नसल्याचं म्हटलं.
 
ट्रंप यांचे वकील टोड ब्लान्च यांनी कोर्टरूममध्ये न्यायाधीशांना म्हटलं की, आम्ही ठामपणे निर्दोष असल्याची विनंती करत आहोत.
मॅजिस्ट्रेट जज जोनाथन गुडमन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे सह-आरोपी वॉल्ट नॉउटा यांना या खटल्याशी संबंधित कोणत्याही तथ्यांबद्दल चर्चा न करण्याचे आदेश दिले आहेत.
 
न्यायाधीशांनी म्हटलं की, या दोघांनीही सोबत काम केलं आहे. पण खटल्याशी संबंधित कोणत्याही बाबीवरील चर्चा ही त्यांनी त्यांच्या वकिलामार्फतच करावी.
 
सुनावणीदरम्यान, ट्रंप यांनी राष्ट्रध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतरही व्हाईट हाऊसमधली गोपनीय कागदपत्रं स्वतःसोबत बाळगल्याचे आरोप फेटाळून लावले.
 
सरकारी गोपनीय दस्तावेज आपल्या खाजगी निवासस्थानाच्या बाथरूम, शौचालय, बेडरूम, बॉलरूममध्ये लपवून ठेवल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप दाखल करण्यात आले आहेत.
 
अमेरिकेतील ‘प्रेसिडेन्शिअल रेकॉर्ड्स अ‍ॅक्ट’ अंतर्गत सरकारी कागदपत्रं कुणालाही हलवता येत नाहीत.
 
या प्रकरणी ट्रंप यांच्या खाजगी निवासस्थानी एफबीआयने छापेही मारले होते. या छाप्यांमागची पाच प्रमुख कारणं वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
 
2024 साली होणारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या ट्रंप यांनी आपल्याविरोधातील ‘इंडिक्टमेंट’ हा निवडणूक लढविण्यातील हस्तक्षेप असल्याचं म्हटलं.
 
इंडिक्टमेंट म्हणजे औपचारिक लेखी आरोप किंवा अभियोग असाही असा याचा अर्थ होतो. गुन्हा दाखल करणे, असंही या प्रक्रियेला संबोधलं जाऊ शकतं.
 
पण अमेरिकेत इतर कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणांपेक्षा हे प्रकरण वेगळं मानलं जातं. कारण यासंदर्भात येथील ग्रँड ज्युरींकडून मतदान घेऊन मगच आरोप निश्चित करायचे किंवा नाही, याचा निर्णय घेतला जातो.
 
हे ग्रँड ज्युरी नेमके कोण असतात?
 
तर, ग्रँड ज्युरी म्हणजे नागरिकांचा असा एक गट जो साक्षीदारांच्या साक्षीसह पुराव्यांचं निरीक्षण करतो.
 
संबंधित बाबी एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेशा आहेत की नाही, हे ठरवण्याचे अधिकारी ग्रँड ज्युरींकडे असतात.
 
या प्रकरणाची चौकशी करणारे विशेष तपासाधिकार जॅक स्मिथ यांनी सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
 
मंगळवारी (13 जून) झालेल्या सुनावणीदरम्यान डोनाल्ड ट्रंप हे काळ्या रंगाचा सूट आणि लाल रंगाचा टाय परिधान करून कोर्टात उपस्थित झाले होते.
 
माजी राष्ट्राध्यक्षांना देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय प्रवासावर कोणत्याही स्वरुपाची बंधनं न लादता अटी-शर्तींविना न्यायालयातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली.
 
सुनावणीच्या आधी न्यायालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं की, ट्रंप यांच्या इतर कोणत्याही चाचण्या केल्या जाणार नाहीत. त्यांच्या बोटांचे डिजिटली ठसे घेतले जातील, तसंच स्वॅबच्या माध्यमातून त्यांचा डीएनएचा नमुनाही चाचणीसाठी घेतला जाईल.
 
या वर्षात ट्रंप यांना दुसऱ्यांदा कोर्टासमोर हजर राहावं लागलं आहे. ट्रंप यांना पहिल्यांदा एका पॉर्न स्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार संदर्भात न्यायालयात हजर व्हावं लागलं होतं.
पण मंगळवारी झालेली सुनावणी ही अधिक कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्वाची होती.





Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती