चीनमध्ये कोरोना वाढतच चाललाय, रोजची आकडेवारी सादर करण्याचे WHO चे आदेश
शनिवार, 31 डिसेंबर 2022 (14:41 IST)
चीनमध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याबद्दल प्रशासनाने ताजी आकडेवारी देत रहावी असा विनंतीवजा आदेश जागतिक आरोग्य संघटनेने चीनला दिला आहे. चीन मध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्बंध उठवण्यात आले आहेत आणि तेव्हापासून कोव्हिडच्या केसेस वाढत आहे. अनेक देश आता चीन मधून येणाऱ्या प्रवाशांची कोव्हिड चाचणी घेत आहेत.
चीनमध्ये किती रुग्ण येत आहेत, किती रुग्ण दाखल होताहेत याची आकडेवारी हवी आहे असं त्यांनी चीनला सांगितलं आहे. त्याचबरोबर लसीकरणाची माहितीही मागवण्यात आली आहे.
अमेरिका, स्पेन, फ्रान्स, दक्षिण कोरिया, भारत, इटली, जपान या देशांनी चीन मधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरस पुन्हा पसरण्याची भीती असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
चीनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हे निवेदन जारी केलं आहे. विशेषत: साठीच्या आसपास असलेल्या रुग्णांची माहितीही WHO ने मागवली आहे.
ज्या भागात मदतीची गरज आहे, जिथे लस घ्यायला लोक तयार नाहीत अशा सर्व ठिकाणी मदत करण्याची तयारी WHO ने दर्शवली आहे.
चीन ने योग्य माहिती पुरवली तर त्याचा फायदा इतर देशांनाही होईल असं WHO चं मत आहे.
मंगळवारी WHO च्या तांत्रिक सल्लागार समितिची बैठक पार पडेल. त्यात चीन च्या अनेक वैज्ञानिकांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात व्हायरल सिक्वेन्सिंगचा डेटा आणायला सांगण्यात आलं आ.
चीन मधून येणाऱ्या प्रवाशांवर का निर्बंध घालण्यात येत आहे हे पुरेसं समजण्यासारखं आहे असं या संघटनेचं म्हणणं आहे.
चीनमध्ये लादलेल्या निर्बंधाविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाल्यामुळे चीन ने निर्बंध उठवले आणि तेव्हापासून तिथे कोव्हिड रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
तेव्हापर्यंत जगात चीनने सर्वांत कडक निर्बंध लादले होते. त्याला Zero Covid Policy असं नाव देण्यात आलं होतं.
या धोरणानुसार अगदी नगण्य केसेस दिसल्या तरी लॉकडाऊन लावलं जात होतं. जिथे केसेस आढळल्या तिथे सामूहिक चाचणी घेतली जात होती. ज्यांना कोव्हिड झाला आहे त्यांना घरी किंवा क्वारंनटाईन सेंटर मध्ये जावं लागत असेल.
आता तिथे लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. क्वारंनटाईनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. लोकांना परदेशात प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.
तेव्हापासून तिथे केसेस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. रोज पाच हजार नवीन रुग्ण सापडत आङेत. मात्र तज्ज्ञांच्या मते हा आकडा अतिशय कमी आहे.. रोज कमी कमी दहा लाख केसेस असल्याचं भाकित त्यांनी वर्तवलं आहे.
डिसेंबर मध्ये जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फक्त 13 लोकांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला. मात्र युकेमधील Airfinity या संस्थेच्या मते चीन मध्ये रोज 9000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.