हवामान बदलाला नियंत्रणात राखण्यासाठी गाय, म्हैस आणि शेतीपुरक पाळीव प्राण्यांच्या मलमूत्रावर आणि ढेकरांवर कर लावण्याचा न्यूझीलंड विचारात आहे. हा प्रस्ताव अंगीकारण्यात आला तर न्यूझीलंडमधले शेतकरी शेती आणि संलग्न गोष्टींतून होणाऱ्या कार्जन उत्सर्जनासाठी कर देतील. जगात अशा स्वरुपाचा कर गोळा करणारा न्यूझीलंड हा पहिलाच देश असेल.
न्यूझीलंडमधल्या एकूण कार्बन उत्सर्जनापैकी निम्मं उत्सर्जन कृषी क्षेत्रातून होतं. शेतकऱ्यांनी या करारावर टीका केली आहे. छोट्या शेतकऱ्यांसाठी हा कर जुलूम असेल, असं एका लॉबिंग कार्यकर्त्याने म्हटलं आहे.
या करातून सरकारला मिळणारा पैसा हा पुन्हा कृषी क्षेत्राकडेच वळवण्यात येईल, असं पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी म्हटलं आहे. नवं तंत्रज्ञान राबवण्यासाठी, संशोधन आणि शेतकऱ्यांसाठी बोनस योजना याकरता उपयोगात आणला जाईल.
"कार्बन उत्सर्जन कमी करणारे हे जगातले पहिले शेतकरी असतील, यामुळे निर्यातीत आम्हाला प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत वरचष्मा मिळेल. खाण्याबाबत अतिशय सजग असलेली माणसं आमच्या प्रयत्नांना दाद देतील."
वैरारपा इथे पत्रकारांशी बोलताना आर्डेन यांनी या गोष्टी सांगितल्या.
नेमका किती कर लावला जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. करासाठी शेतकरी जो पैसा देतील तो हवामान बदलाला रोखण्यासाठी पूरक गोष्टींवर अधिक पैसा आकारून त्यांना मिळवता येईल.
काही शेतकऱ्यांनी या कराचा निषेध केला आहे.
फेडरेटेड फार्मर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड्यू होगार्ड यांनी सांगितलं की या करामुळे लहान शेतकऱ्याचं जीणं पणाला लागेल. शेतकरी आता त्यांची जमीन विकू लागतील.
अन्न निर्मिती कार्बन उत्सर्जन पोषक देशांमध्ये होत नसेल तर या करामुळे कार्बन उत्सर्जन वाढण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये वातावरणातली मिथेनची पातळी सर्वाधिक झाली होती. औद्योगिक कालखंडात मिथेनच्या प्रमाणात अडीच टक्क्यांपेक्षा जास्त झालं आहे.