Brazil:: बोल्सोनारो समर्थकांचा संसद, राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टावर हल्ला
सोमवार, 9 जानेवारी 2023 (10:39 IST)
ब्राझीलच्या संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर रविवारी (8 जानेवारी) उजव्या विचारसरणीचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थकांनी हल्लाबोल केला.
ब्राझीलच्या फुटबॉल टीमची जर्सी घातलेले, हातात ध्वज असलेले लोक संसदेत घुसले. काहींनी अध्यक्षांच्या खुर्चीवर चढून निषेध केला.
काही आंदोलनकर्ते संसदेच्या छतावरही चढले आणि त्यांनी खिडक्याही तोडल्या.
भयंकर अशा संघर्षानंतर ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया इथल्या मुख्य वास्तूंवर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा नियंत्रण मिळवलं.
राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्व्हाने याला ब्राझीलमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर लोकांना 6 जानेवारी 2021 मध्ये अमेरिकेच्या कॅपिटल इमारतीत झालेल्या संघर्षाची आठवण झाली. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप समर्थकांनी कॅपिटल वास्तूवर आक्रमण केलं होतं.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांच्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण नेत्यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे.
गेल्या आठवड्यात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून लुला डा सिल्व्हा यांनी शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी माजी राष्ट्राध्यक्षांच्या समर्थकांना कठोरात कठोर शिक्षा करू असं म्हटलं होतं.
याआधी लुला डी सिल्व्हा यांनी ट्वीट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं, आम्ही सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत आहोत. रविवारी त्यांनी आमच्या शांत भूमिकेचा फायदा उठवला. माजी राष्ट्राध्यक्षांची भाषणं लोकांना भडकावण्यासाठी वापरली गेली. या हिंसाचाराची त्यांच्या पक्षाने आणि वैयक्तिक त्यांनीही जबाबदारी घ्यायला हवी.
ब्राझीलचे न्यायमंत्री फ्लॅव्हिओ डिनो यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 200 लोकांना अटक करण्यात आली आहे.
ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. बोलसोनारो त्या निवडणुकीत पराभूत झाले. मात्र त्यांनी हा निकाल मानण्यास सातत्याने नकार दिला. गेल्या आठवड्यात लुला यांच्या शपथविधी समारंभाला ते उपस्थित राहिले नव्हते.
67वर्षीय बोल्सोनारो यांना या हिंसाचारापासून स्वत:ला दूर करत याप्रकाराचा निषेध केला आहे. बोलसेनारो सध्या अमेरिकेत आहेत.
कॅबिनेट मंत्र्यांनी दावा केली की रविवारी झालेल्या हिंसाचारात राजधानीतल्या महत्त्वपूर्ण वास्तूंवर झालेल्या हल्ल्यात हल्लेखोरांनी राष्ट्रपती निवासातून हत्यारंही नेली.
संचारमंत्री पालो पिमेन्ता यांनी एक व्हीडिओ ट्वीट केला. ते लिहितात, आम्ही इन्स्टिट्यूशनल सेक्युरिटी ऑफिस रुममध्ये आहोत. इथल्या प्रत्येक ब्रीफकेसमध्ये धोकादायक आणि बिगरधोकादायक शस्त्रं होती. आंदोलनकर्त्यांनी ही शस्त्रं चोरली आहेत.
मात्र रविवारी राष्ट्राध्यक्ष निवास, संसद आणि सर्वोच्च न्यायालयावरच्या हल्ल्यात माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोलसेनारो यांच्या समर्थकांनी नेमकी किती शस्त्रं चोरली याबाबत ठोस माहिती ब्राझील सरकारने दिली नाही.
पोलिसांच्या मते आतापर्यंत 200 लोकांना अटक करण्यात आली आहे.
Published By -Smita Joshi