इस्लामाबाद एक्सप्रेसचे किमान १० डबे रुळावरून घसरले. यात सुमारे ३० प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील लाहोरजवळ एक ट्रेन रुळावरून घसरली. या घटनेत किमान ३० प्रवासी जखमी झाले आहे. पाकिस्तान रेल्वे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, लाहोरजवळ एका ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. लाहोरहून रावळपिंडीला जाणारी इस्लामाबाद एक्सप्रेस शुक्रवारी संध्याकाळी लाहोरपासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या शेखुपुरा येथील काला शाह काकू येथे रुळावरून घसरली. पाकिस्तान रेल्वेने शुक्रवारी रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "शेखुपुरा येथे ट्रेनचे किमान १० डबे रुळावरून घसरले, ज्यामध्ये सुमारे ३० प्रवासी जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे." बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले. डब्यांमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेने सांगितले की, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.