जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना महासाथीविरोधात लढण्यासाठी लस आल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर लसीचा पहिला डोस आणि त्यानंतर दुसरा डोस देण्यात आला. त्यानंतर बूस्टर डोस द्यायचा की नाही यावर बरीच चर्चा झाली. पण या सगळ्यात जर्मनीतील एका व्यक्तीने 29 महिन्यांत 217 वेळा कोरोनाची लस घेतल्याचं समोर आलंय. या व्यक्तीने वयाच्या 62 व्या वर्षी कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता हा प्रकार केला आहे. द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसिज जर्नलमध्ये हे प्रकरण प्रकाशित करण्यात आलं आहे. वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार, इतके डोस घेतल्यानंतरही या व्यक्तीला आरोग्याच्या कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला नाही.
प्रकरणाची चौकशी
एर्लांगेन-न्यूरेमबर्ग विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागाचे डॉ. किलियन स्कोबर म्हणाले, "आम्हाला वृत्तपत्रांमधून याची माहिती मिळाली." "आम्ही त्यांना विविध चाचण्यांसाठी एर्लांगेन विद्यापीठात बोलावलं. या चाचण्या घेण्यातही त्यांनी खूप रस दाखवला. आम्ही त्यांच्या रक्त आणि लाळेची तपासणी केली." यासोबतच संशोधकांनी त्यांच्या पूर्वी साठवून ठेवलेल्या रक्ताचे नमुने तपासले. अभ्यासाच्या वेळी त्यांचं पुन्हा लसीकरण करून रक्ताचे नमुने गोळा करण्यात आल्याचं किलियन स्कोबर यांनी सांगितलं. ते म्हणाले, "लशींना रोगप्रतिकारक शक्ती कसा प्रतिसाद देत आहे हे निर्धारित करण्यासाठी आम्ही या नमुन्यांचा वापर केला." मॅग्डेबर्ग शहरातील सरकारी वकिलाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. यात त्यांनी 130 वेळा लसीकरण झाल्याचे पुरावे गोळा केले आहेत. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कोरोनाच्या लशीमुळे संक्रमण होत नाही. पण त्या शरीराला रोगांशी कसे लढायचे ते शिकवतात.
रोगप्रतिकारक शक्ती
मेसेंजर रिबोन्यूक्लिक ॲसिड (mRNA) लस शरीराच्या पेशींना विषाणूचा जनुकीय संकेतांक दाखवून कार्य करतात. रोगप्रतिकारक शक्ती हे संकेतांक ओळखते आणि कोरोना विरुद्ध कसे लढायचे हे ठरवते. मात्र, वारंवार लसीकरण केल्याने रोगप्रतिकारक प्रणालीतील काही पेशी निष्क्रिय होऊ शकतात असं डॉ. किलियन स्कोबर सांगतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जर्मन माणसामध्ये अशी कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचं संशोधकांना आढळून आलं. याव्यतिरिक्त, त्यांच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं कधीच आढळलेली नाहीत. संशोधक सांगतात की, ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या 'हायपर लसीकरण' पद्धतीला मान्यता देत नाहीत. जर्मन माणसावर केलेल्या अभ्यासातून ते कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत, मात्र यातून त्यांना काही गोष्टी सुचवायच्या आहेत. विद्यापीठाने त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलंय की, "या संशोधनात असं दिसून आलंय की, नियमित लसीकरणाव्यतिरिक्त लसींचे तीन डोस देता येतील." कोरोना लस सहसा वेळेवर दिली जाते. परंतु कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या काही लोकांना आवश्यकतेनुसार इतर वेळी अतिरिक्त डोसची आवश्यकता असू शकते. कोरोना लसींमुळे काही नकारात्मक परिणाम (साइड इफेक्ट्स) होऊ शकतात. लस घेतल्यानंतर हात दुखणे, ताप, थकवा, डोकेदुखी आणि चक्कर येणे सामान्य आहे.