लिबियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ बोट बुडून युरोपला जाणाऱ्या 61 स्थलांतरितांचा मृत्यू
रविवार, 17 डिसेंबर 2023 (10:15 IST)
लिबिया येथील समुद्रकिनाऱ्याजवळ जहाजाचा अपघात झाल्याने 60 पेक्षा अधिक स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची शक्यता International Organization for Migration (IOM) ने वर्तवली आहे.जे लोक या दुर्घटनेतून बचावले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार झुवारा शहरातून ही बोट निघाली तेव्हा 86 प्रवासी बोटीवर होते.
उंचच उंच लाटांमुळे बोट पाण्याने भरली आणि त्यामुळे 61 प्रवासी बेपत्ता झाले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
भूमध्य समुद्र ओलांडून युरोपात जाण्याकरता लिबिया हा मुख्य प्रवेशबिंदू आहे.
IOM ने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी समुद्र ओलांडताना 2200 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थलांतरासाठी हा जगातील सर्वांत धोकादायक मार्ग झाला आहे.
AFP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सर्व पीडित नायजेरिया, गँबिया आणि इतर आफ्रिकन देशातले होते.
बचावलेल्या 25 लोकांना लिबिया येथील एका केंद्रात पाठवण्यात आलं असून त्यांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.
IOM च्या प्रवक्त्यांनी X वर एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, “मृतांची संख्या पाहता समुद्रावर लोकांचे जीव वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नाहीयेत हे स्पष्ट आहे.”
जून महिन्यात मासेमारीची बोट बुडाल्याने दक्षिण ग्रीसमध्ये 78 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 100 लोक बचावले होते.
भूमध्य सागरात अनेक स्थलांतरित छोट्या बोटीवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
जे या बोटीवर होते ते युरोपात प्रवेश करण्यापूर्वी इटलीला जाण्याच्या बेतात होते. काही लोक तिथल्या असंतोषाला कंटाळून जात होते तर काही लोक कामाच्या शोधात जात होते.
संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरितांसाठी असलेल्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार 153000 पेक्षा अधिक स्थलांतरित यावर्षी ट्युनिशिया आणि लिबियामधून इटलीत आले होते.