पाकमध्ये सरकारविरोधात देशभर निदर्शने, परिस्थिती चिघळली

सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (12:00 IST)
पाकिस्तानात सुरू असलेली सत्ताविरोधी लाट अधिक तीव्र झाली असून, हा देश अराजकाच्या उंबरठ्यावर आहे. यात सामान्य माणूस होरपळून निघत आहे. राजधानी इस्लामाबादसह देशभरात तीव्र निदर्शने सुरू असल्याने पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आता निवासस्थानातून लाहोरला पळ काढला आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता बंद केला असून, या मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

शनिवारी रात्री इमरान खान आणि ताहीर उल कादरी यांच्या कार्यकत्र्यांवर पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. त्यामुळे या मार्गावर बंदोबस्त वाढविण्यात आला. शरीफ सरकारचा कार्यकाल आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे यांना खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा शरीफ यांनी दिला. काल झालेल्या गोळीबारात इमरान खान यांच्या महिला कार्यकर्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इमरान खान अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी पंतप्रधान शरीफ यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली आहे. इमरान खान आणि ताहीर उल कादरी यांचे कार्यकर्ते गेल्या बर्‍याच दिवसांपासून इस्लामाबादमध्ये ठाण मांडून बसले असून, त्यांनी पंतप्रधान कार्यालयासह सर्वच शासकीय कचेरींची कोंडी करून थेट पंतप्रधान कार्यालयावर धडक मारल्याने पंतप्रधान नवाज शरीफ आपल्या खाजगी स्टॉपसह पंतप्रधानांचे निवासस्थान सोडून पळून गेले आहेत. जोपर्यंत पोलिस तहरिक-ए-इन्साफ आणि पाकिस्तान आवामी तहरिकच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरून हटविणार नाहीत, तोपर्यंत पंतप्रधान नवाज शरीफ पंतप्रधानांच्या निवासस्थानी येणार नाहीत. सध्याची स्थिती पाहून शरीफ कुटुंबातील एकही सदस्य रस्त्यावरून प्रवास करणार नाही, असेही आज स्पष्ट करण्यात आले.

शनिवारी रात्री झालेल्या चकमकीनंतर संपूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार निदर्शने सुरू आहेत. इमरान खान यांचे समर्थक सियालकोटमध्ये संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या निवासस्थानासमोर एकत्रित जमले आणि त्यांनी जोरदार दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांना ऐनवेळी लाठीमार करावा लागला. यातून परिस्थिती अधिक चिघळली आहे. देशातील अन्य भागातही रस्त्यांवर निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे ब-याच ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता. 

वेबदुनिया वर वाचा