किरणकुमार रेड्डी करणार नव्या पक्षाची स्थापना

शुक्रवार, 7 मार्च 2014 (11:09 IST)
स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्दय़ावरून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे किरणकुमार रेड्डी नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. तसेच त्यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
 
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर किरणकुमार रेड्डी यांनी काँग्रेसला रामराम करत नव्या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तेलंगणा निर्मितीचे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. रेड्डी यांच्याबरोबर तेलंगणाच्या निर्मितीला विरोध असणारे नेतेही या पक्षात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 
रेड्डी यांनी तेलंगणाच्या निर्मितीवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकांबरोबर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर तेलंगणा व सीमांध्र अशी दोन राज्ये निर्माण करण्यात येणार आहेत. स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जूनला अधिकृतरीत्या करण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा