अवकाशातून अशी दिसते भारत-पाक सीमारेषा

बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (09:45 IST)
वॉशिंग्टन- पृथ्वीवरचा जो भाग सतत धुमसत असतो, चर्चेत असतो, जिथे युद्धेही झाली आहेत, त्या भारत-पाकिस्तान सीमारेषेचा अंतराळातून काढलेला फोटो ‘नासा’ने आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट केला आहे. रात्री काळोख झाल्यानंतर ही रेषा अगदी स्वच्छ, स्पष्ट, उठून दिसते.
 
नासाच्या एका अंतराळविराने 23 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सीमारेषेचा फोटो काढला होता. पाकमधील सिंधू नदीपात्राकडून उत्तर दिशेकडे पाहत असताना त्याने हा फोटो घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सीमारेषेवर दिवे लावण्यात आले असल्याने केशरी रंगाच्या प्रकाशात ही रेषा स्पष्ट दिसते. या फोटोत कराची आणि लाहोरही दिसते. अरबी समुद्राच्या किनार्‍यावरचे कराची शहर तर चांगलेच चमकते.
 
नासाने हा फोटो फेसबुकवर शेअर केल्यानंतर 70 हजार नेटकर्‍यांनी तो ‘लाइक’ केला, तर तो 15 हजारांहून अधिक शेअर झालाय. याआधी 2011 मध्येही नासाने अंतराळातून काढलेला भारत-पाक सीमेचा फोटो शेअर केला होता. तो फोटोही ‘सुपरहिट’ ठरला होता.

वेबदुनिया वर वाचा