अमेरिका: दहशतवादी हल्ल्यात 50 ठार

फ्लोरिडा- ओरलॅंडो येथील एका समलैंगिकांच्या नाइट क्‍लबमध्ये रविवारी रात्री बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारामध्ये 50 जण ठार झाले असून 53 जण जखमी झाले आहेत. यादरम्यान पोलिस अधिकार्‍याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला. ओरलॅंडोचे मेयर बडी डायर यांनी ही माहिती दिली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे व्यक्त केले आहे.
 
हल्लेखोराची ओळख 29 वर्षाच्या उमर मतीन अशी करण्यात आली आहे. ओरलॅंडोमधील पल्स नाइट क्‍लबमध्ये सुमारे रात्रीच्या दोन वाजता हल्लेखोराने गोळीबार केला. या वेळी नाइट क्‍लबमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे ठार झालेल्यांची संख्या वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. गोळीबार सुरू झाल्यानंतर सुमारे तीन तासांनंतर पोलिसांच्या पथकाने नाइट क्‍लबमध्ये प्रवेश करून हल्लेखोराने ताब्यात घेतलेल्या नागरिकांची सुटका केली. तसेच या वेळी झालेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला. 
 
घटनानंतर क्‍लबच्या बाहेर मोठा पोलिस ताफा तैनात करण्यात आला. 
 
ओरलॅंडोमध्ये 24 तासांत घडलेली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी येथील एका नाट्यगृहात कार्यक्रम सुरू असताना प्रसिद्ध गायिका क्रिस्टिना ग्रिमी हिची हत्या करण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा