Independence Day : स्वातंत्र्य दिनासाठी 15 ऑगस्टची निवड कशी झाली जाणून घेऊ या
रविवार, 14 ऑगस्ट 2022 (14:16 IST)
Independence Day :भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा प्रतिज्ञा आपण अभिमानाने आणि गर्वाने करतो . ही प्रतिज्ञा आपण आज म्हणू शकतो कारण आपल्या महान नेत्यांनी ,क्रांतिवीरांनी ब्रिटीशांशी लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.
स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान नेत्यांनी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले . त्यांचा बलिदानामुळे आपल्याला हा अमृत महोत्सव साजरा करता येत आहे 15 ऑगस्ट 2022 रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करेल. यानिमित्ताने भारत सरकार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट ही थीम घेऊन विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. या निमित्ताने देशभरात 20 कोटी तिरंगे फडकवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
स्वातंत्र्यदिन हा सर्व भारतीयांसाठी नेहमीच खास राहिला आहे. या दिवशी पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. यंदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करणार आहेत.
स्वातंत्र्य दिनाचा इतिहास
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1929 च्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराजचा ठराव संमत केला. काँग्रेस पूर्ण स्वातंत्र्याची मागणी पूर्ण ताकदीने मागु लागली होती. लॉर्ड आयर्विन आणि भारतीय यांच्यातील वाटाघाटी अयशस्वी झाल्यामुळे हा प्रस्ताव आणण्यात आला होता.
ब्रिटिशांना भारताला वसाहतवादी राष्ट्राचा दर्जा द्यायचा होता. मोहम्मद अली जिना, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि तेज बहादूर सप्रू यांनी प्रतिनिधित्व केलेले भारतीय शिष्टमंडळ पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत होते. भारतीयांशी आयर्विनची चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अयशस्वी झाल्यानंतर, काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आणि 26 जानेवारी 1930 हा पहिला 'स्वातंत्र्य दिन' म्हणून निवडला.
नेहरूंनी 29 डिसेंबर1929रोजी लाहोरमध्ये रावीच्या काठावर काँग्रेसचा ठराव स्वीकारून राष्ट्रध्वज फडकवला. "काँग्रेस आपले सर्वात महत्वाचे अधिवेशन घेत आहे आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी एक मोठे पाऊल उचलणार आहे," ते म्हणाले. तेव्हापासून 1947 पर्यंत भारताने 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला. या तारखेला 1950 मध्ये भारताने संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले. म्हणूनच आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
देशातील हजारो शूर वीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली . या अन्यायाच्या व अत्याचाराच्या विरोधात लोकमान्य टिळक ,महात्मा गांधी ,पंडित जवाहलाल नेहरू ,भगतसिंग ,चंद्रशेखर आजाद ,सरदार वल्लभभाई पटेल ,वीर सावरकर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले . मंगल पांडे , सुभाष चंद्र बोस , राजगुरू ,सुखदेव , लाला लजपतराय , झाशी ची राणी लक्ष्मीबाई व अनके महिला क्रांतिकारक अश्या हजारो शूर वीरांनी , क्रांतीकारांनी देशासाठी खूप मोठे योगदान आहे. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला .आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहतात . त्यामुळे आपला देश सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणून ओळखला जातो .
15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडला गेला?
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारतीयांनी ब्रिटिशांना देश सोडण्यास भाग पाडले. ब्रिटिश संसदेने लॉर्ड माउंटबॅटन यांना 30 जून 1948 पर्यंत भारतात सत्ता हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय होते.
भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी या निर्णयाला आणि स्वातंत्र्य देण्याच्या विलंबावर आक्षेप घेतला. माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. आपल्याला कोणत्याही प्रकारचा रक्तपात किंवा दंगल नको असे ते म्हणाले होते.
माउंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीच्या दुसऱ्या वर्धापन दिनाची तारीख निवडली. माउंटबॅटन म्हणाले, "मी निवडलेली तारीख तशीच निवडली होती . मला माहित होते की भारत लवकरच स्वतंत्रता मिळवणारच. पण मला वाटले की ते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये असेल आणि मग मी 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली, कारण तो जपानच्या शरणागतीचा दुसरा वर्धापन दिन होता."
माउंटबॅटनच्या निर्णयानंतर, ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्सने 4 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य विधेयक मंजूर केले. भारत आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र सार्वभौम राज्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनतर पाकिस्तानात 14 ऑगस्ट आणि भारतात 15 ऑगस्ट स्वतंत्रदिन साजरा करण्याची सुरुवात झाली.