होळी खेळा, पण सावधगिरीने!

WD
महाशिवरात्र जाताच होळीची चाहूल लागते आणि सर्वजण उत्साहाने होळीच्या तयारीला लागतात. मुंबईतील चाकरमान्यांना लागतात गावाकडचे वेध. आता तर होळी दोन दिवसावर आली असल्याने होळीची तयारी जोरात सुरु झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठांमध्ये रंगीबिरंगी रंगांनी दुकाने सजली आहेत.

पिस्तुल-बंदुक एवढेच नव्हे तर, रॉकेटच्या रुपातील पिचकार्‍या बालमनांना भुरळ घालीत आहेत. असा हा उत्साहाचा आनंदाचा सण, आपला आनंद द्विगुणीत करीत असतो. या आनंदात भर पडावी व त्यावर विरजण पडू नये म्हणून थोडीशी सावधानताही आपण बाळगली पाहिजेच, कारण आज बाजारात विक्रीसाठी ठेवलेले रंग आपल्या रंगाचा बेरंग करु शकतात. यासाठी होळीच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती या लेखात दिली आहे.

होळी सणाच्या वेळी बाजारात फेरफटका मारताना अनेक चित्ताकर्षक रंग आपले लक्ष वेधून घेतात, बालमनालाही ह्या रंगाची भुरळ पडते आणि हे रंग शेवटी मुलांच्या हट्टापायी आपण खरेदी करतो, पण सावधान? हे रंग विषारी असू शकतात, म्हणून हे रंग खरेदी करताना दुकानदाराकडे याबाबत चौकशी करावी. या आकर्षक रंगामध्ये घातक रसायन असू शकते आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरास भोगावा लागतो.

या रंगानी होळी खेळण्यास डोळे आणि कानाच्या पडद्यांनाही इजा होऊ शकते. काही जण तर या रंगामध्ये बूट पॉलिश ऑईलपेंट हेअरडायही मिसळतात. या सर्व बाबी आपल्या त्वचेवर दूरगामी परिणाम करु शकतात. यामुळे त्वचेचा कर्करोग, केस गळणे, त्वचेवर सफेद डाग पडणे, त्वचारोग अशा समस्याही उद्भवू शकतात, स्कारलेटरेड, क्रिस्टल व्हॉयलेट, ब्रिलियंट ग्रीन हे रंग कातडीस अपायकारक आहेत. रंगात मिसळण्यात आलेली रांगोळी किंवा मार्बल पावडर सारखे खरखरीत पदार्थ डोळ्यात गेल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणून मुलांना असे रंग देताना याबाबत संपूर्ण चौकशी करुनच मग हे रंग खेळण्यास द्यावेत.

या शिवाय हे रंगीत पाणी पोटात गेल्यास पचनाच्या, डोळ्यात गेल्यास डोळे जळजळणे अशाही तक्रारी उद्भवू शकतात. काही ठिकाणी चिखल, गटाराचे खराब पाणी याचा वापर करुन सामूहिक होळी खेळली जाते. हा जीवघेणा प्रकारच आहे, हे घाण पाणी पोटात गेले तर, काय होईल याची कल्पनाच करवत नाही, म्हणून हा उत्साहाचा आनंदाचा सण नैसर्गिक रंगाने खुल्या रंगाची उधळण करुनच खेळून आनंद द्विगुणीत करावा.

होळी खेळताना ही सावधगिरी बाळग
होळी खेळताना जुनेच कपडे घालावे. रंगामुळे कसे गळण्यासारख्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून प्लॅस्टिकच्या टोपीचा वापर करण्याची सक्ती मुलांना करावी. होळी खेळण्यापूर्वी शरीरास खोबरेल तेल लावावे.

रस्त्याने जाणार्‍या येणार्‍या अनोळखी व्यक्तीवर रंग उडवू नका, त्यांच्यावर तसेच आपापसातही रंगीत पाणी भरलेले फुगे फेकून मारु नका, यामुळे कानास आणि डोळ्यांना इजा होवून प्रसंगी अंधत्वही येवू शकते. रंग खेळताना कोणावरही जबरदस्ती करु नका, अचानक पाठमोरे जावूनही रंग लावू नका, यामुळे डोळ्यात आणि कानात रंग जाण्याची शक्यता असते आणि शेवटी महिलांच्या, मुलींच्या अंगावर रंग फेकू नका त्यांची चेष्टा मस्करी करुन सणाची मजा घालवू नका.

होळी खेळताना डोळ्यात जर जळजळ झाली तर, ताज्या स्वच्‍छ पाण्याने डोळे हळू हळू धुवा, चोळू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, रंगामुळेही चक्कर, मळमळ आणि ताप आल्यासारखे किंवा रंगाची एलर्जी वाटली तर घरगुती उपचार न करता लगेचच डॉक्टरांना दाखवा. शरीरास खाज, जळजळ येत असल्यासही त्वचा तज्ज्ञास दाखवा.

रंगाची होळीत उधळण करत असताना कान आणि डोळ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. होळी खेळताना अचानक कुठून तरी फेकल्या गेलेल्या फुग्यामुळे समस्या निर्माण होवू शकतात, म्हणून मुलांना फुगे देणे टाळावे. असा फुगा लागल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

असा हा रंगाची उधळण करणारा, सण साजरा करताना सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे. यामुळे आनंदात वाढ होऊन परस्पर बंधुभाव आणि प्रेमही वाढीस लागेल, यात शंका नाही.

वेबदुनिया वर वाचा