गावची होळी

NDND
होळी आठवली की मला माझं लहानपण आठवतं. माझं गाव आठवतं नि होळीची मजाही आठवते. गावात मध्यावर आमचं दुकान. या दुकानाच्या समोरचा रस्ता खालच्या आळीकडे जाणारा. या रस्त्याच्या तोंडावरच आमची होळी असायची. गावात होळीची मजा दिवाळीपेक्षाही जास्त असायची. कारण फटाके उडविण्यातली मजा गावात तेव्हा खरोखरच नव्हती.

होळीचा दिवस उगवला की आम्हाला होळी खणायचे वेध लागायचे. दुपारी त्या जागेवर पाणी शिंपडून होळी खणायची तयारी सुरू व्हायची. होळीच्या आजूबाजूला सगळी मच्छी विक्रेत्यांची दुकानं होती. मच्छी बोंबिल यांचा वास घेत घेतच होळीच्या जागेची सफाई सुरू होत असे. आणि त्यानंतर होळी खोदली जायची.

त्याचवेळी आम्हा मुलांपैकी एक गट होळीसाठी लाकडं आणि गवर्‍या गोळा करायला आजूबाजूच्या घरांमध्ये जात असे. या गटात माझा समावेश असे. (कारण खोदकाम वगैरे टाळणे हा उद्देश) आमच्या आगमनाची वर्दी हातातली डबडी देत असत. कुणाच्याही घरी गेल्यानंतर दडा दडा डबडी वाजवत सामुदायिकरित्या एक परवलीचं वाक्य म्हटलं जायचं. 'पाच लाकडं पाच गवर्‍या दिल्याच पाहिजेत.' खणखणीत आवाजात मागणी मांडल्यानंतर घरातील बाई बाहेर येऊन आम्हाला लाकडं आणि गवर्‍या जे काही उपलब्ध असेल ते देत असे. गावात बहुतांश घरांत किमानपक्षी पाणी तापवायला तरी चुलीचाच वापर होत असल्याने लाकडं आणि गवर्‍या जवळपास सगळ्यांच्याच घरी सायच्या. ज्या घरात लाकडं नसत. ती मंडळी गावात लाकडाचे भारे घेऊन येणार्‍या आदिवासी मंडळींकडून भारे घेऊन होळीला देत असत. होळीच्या आजूबाजूला बसणारे 'मांगेले' (मच्छी विकणारे) प्रत्येकी एकेक भारा द्यायचे.

ही सगळी लाकडे आणि गवर्‍या घेऊन आम्ही मंडळी होळीच्या तिथे यायचो. तोपर्यंत खणण्याचं काम पूर्ण झालेलं असायचं. मधल्या काळात मोठी मंडळी काम कुठवर चाललंय ते बघायसाठी येऊन जायची. मग संध्याकाळी हातातली काठी टेकत टेकत अप्पाकाका यायचे. हे आमच्या गल्लीत रहाणारे पुरोहित. 'संसार केला घाई घाई म्हातारपणाला काही नाही' हे पालुपद त्यांच्या तोंडी असायचं. हे अप्पाकाका मग मोठ्यांच्या मदतीने होळी रचायचे. होळी रचण्याचीही शास्त्रीय पद्धत आहे. आधी होळीच्या खड्ड्यात मध्ये मोठठं लाकूड ठेवायचं. मग त्याला आधाराला खाली जड छोटी लाकडं रचायची आणि त्याच्या बाजूला गवर्‍या रचायच्या. त्यामुळे मधलं लाकूड हलायचं नाही. मग हळूहळू इतर लाकडं रचत जायची. असं करत करत होळी रचण्याचे काम पूर्ण व्हायचे.

मग आजूबाजूच्या बायका येऊन होळीभोवती रांगोळी काढायच्या. छानपैकी होळीची तयारी पूर्ण व्हायची. त्यानंतर अप्पाकाका होळीची पूजा करायचे. आम्ही सगळे त्यांना हवं नको ते बघत असू. त्यानंतर होळी पेटवायचा कार्यक्रम असायचा. अप्पाकाका एका जळत्या लाकडाच्या सहाय्याने होळी पेटवायचे. मग आम्ही बच्चेमंडळी होळी सगळ्या बाजूंनी पेटवायचो. मग धडधडणार्‍या ज्वालांशी स्पर्धा करत आम्ही जोरदार 'बोंब' ठोकायचो.

होळी पेटली की मग आजूबाजूची मंडळी होळीला नैवेद्य दाखवायला यायची. या नैवेद्यावेळी होळीत आख्खा नारळ वहायचे. हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्‍याची चव निव्वळ अप्रतिम. होळीच्या धुराचा सुगंधही या खोबर्‍यात मिसळलेला असायचा. तो गंध आजही आठवण काढली तरी नाकात येतोय.

होळी एकदा पेटली. सगळयांची जेवणं झाली, की आजूबाजूच्या घरची सगळी मंडळी होळीच्या आसपास येऊन बसायची. मग एक छानपैकी गप्पांची मैफल रंगायची. याची त्याची गंमत, टर उडविणे. किस्से सांगणे यात मजा यायची. मूळची गावातली पण नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळीही या निमित्ताने गावात यायची. तीही मग होळीवर यायची. यानिमित्ताने सगळ्यांच्या भेटी व्हायच्या. त्यामुळे गप्पांना बहर यायचा.

  होळी पेटली की मग आजूबाजूची मंडळी होळीला नैवेद्य दाखवायला यायची. या नैवेद्यावेळी होळीत आख्खा नारळ वहायचे. हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्‍याची चव निव्वळ अप्रतिम.      
एकीकडे हे चालू असताना होळी रात्रभर पेटती ठेवण्यासाठी लाकडे चोरून आणली जायची. यात आम्हा मुलांना फारच रस. शिवाय त्यात मोठी माणसंही आम्हाला 'मौलिक' मदत करायची. कुणाच्या घराच्या आजूबाजूला ठेवलेली लाकडं घरमालकाच्या नकळत पळवून आणणे हे मोठे शौर्याचे मानले जायचे. कुणाच्या कुंपणातली लाकडं पळव, तर कुणाचं फाटकच पळवून होळीत टाक. असले उद्योग फार चालायचे. यातून काही भांडणही व्हायची. पण ती बाब अलहिदा. लाकडं पळवून नेऊ नये म्हणून अनेक घरातील लोक रात्रभर जागत असत.

याशिवाय होळीची आणखी एक मजा म्हणजे लोकांची टर उडवणे. यासाठी काय उद्योग केले जातील याचा नेम नव्हता. कुणी नवपरिणत जोडपे वा गावात बदलून आलेले तरूण जोडपे असले की त्याला खूप त्रास दिला जाई. हे जोडपे झोपी गेले की टारगट मंडळी त्यांच्या घराला कडी लावत. शिवाय एक दोरी घेऊन त्या कडीला मोठा दगड बांधत. नंतर ती दोरी लांबून नेऊन ओढली जात असे. खड खड आवाज येऊन ते जोडपे बिचारे वैतागून जात असे आणि बाहेर येण्याची सोय नसे. मला आठवतंय. एका घरात एक प्रोफेसर जोडपं रहात होतं. त्यांच्या घरावर अल्युमिनियमचे पत्रे होते. त्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्या घरची कडी लावली जायची. मग लांबून त्यांच्या घरावर छोटे दगड फेकले जायचे. धाड धाड आवाज येऊन ते जोडपं पार वैतागून गेलं होतं. जे मिळेल ते पळवणं आणि होळीत टाकणं हे मोठ्या शौर्याचं लक्षण होतं. त्यामुळे काही पोरं त्या कामात गुंतलेली असायची.

हे सुरू असताना होळीवर गप्पांची मैफलही रंगलेली असायची. मग काही मुलं गावातल्या सगळ्या होळींचा फेरफटका मारत असत. मग जातांना प्रत्येक होळीवर थांबून गप्पा मारल्या जायच्या. शिवाय प्रत्येक होळीवर गेल्यावर कचकचीत शिव्या देणं ही प्रथाही आवर्जून पाळली जायची. लहानपणी शिव्यांची एवढी 'दोस्ती' नसल्याने अनेक शिव्यांचे अर्थ कळायचे नाही. मग कधी कधी त्या शिव्या दिल्या की घरातल्यांचा पाठीवर सणसणीत धपाटा बसायचा.

रात्रभर होळी जागवल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी घरातलं पाणी तापवायचं पातेलं होळीवर नेऊन तापवलं जायचं. त्यावर तापवलेल्या पाण्यानेच घरातल्या सगळ्यांच्या अंघोळी व्हायच्या. या गावातली लहान मुलं आणखी एक 'उपक्रम' राबवायची. हा उपक्रम म्हणजे सगळी मुलं मुख्य चौकात रस्ता अडवून उभी रहायची आणि येणार्‍या जाणार्‍याकडून 'पोस्त' (पैसे) घ्यायची. पोस्त घेतल्याशिवाय कुणालाही सोडलं जात नसे.

होळी म्हटलं की ही सगळी मजा आठवते. लहानपणी केलेल्या गमती-जमती, करामती, पराक्रम सगळं काही आठवतं. त्यावेळी लोकांना जो त्रास दिलं त्याविषयी आज वाईट वाटत असलं तरी ती त्यावेळची मजा होती. सगळे लोक एकत्र यायचे. आनंदाने होळी साजरी करायचे. 'आमची होळी' असा एक अभिमानही असायचा. पुढे शहरात आल्यानंतर हे सगळं संपलं. होळी म्हणजे बिल्डिंगच्या पुढे एक खड्डा खणून चार दोन लाकडं आणून थोड्यावेळासाठी आग निर्माण करणं एवढंच राहिलं. ते ठीक आहे, पण त्या गप्पा, गंमत-जंमत हे सगळं सगळं गावाबरोबर गावातच राहिलं.

वेबदुनिया वर वाचा