प्रांतोप्रांतीची ‘अक्षय’तृतीया

WD
‘व्हायब्रंट इंडिया’ म्हटलं जातं ते उगाच नाही. भारताइतकी व्हरायटी आणि एकाच गोष्टीचे इतके पर्याय खरंच इतर कोणत्याही संस्कृतीत सापडणार नाहीत. अतिशय जुनी अशी आपली परंपरा आहे. गेली काही हजार वर्ष ती टिकून आहे आणि आजही त्यात त्याच परंपरा पाळल्या जातात. आपल्याकडे साजरे होणारे वेगवेगळे सण हे तर सगळ्या लोकांना वाटणारं महाआश्चर्य आहे. एकतर निसर्गाला धरून तयार केलेले हे सण आणि त्याचं निसर्गसंवर्धनासाठी किंवा शेतीच्या कामासाठी असलेलं महत्त्व यामुळे आपल्या पूर्वजांनी किती खोल विचार केला होता याची कल्पना येते. आपल्याकडे फक्त एका धर्माचेच सण साजरे केले जात नाहीत तर सगळ्या धर्माच्या सणांना महत्त्व आहे. तरीही पूर्वीपासून हिंदुबाहुल्य असल्याने हिंदू सणांची आपल्याकडे असलेली महती काही औरच आहे. ज्या ज्या प्रदेशात आर्य गेले तिथल्या संस्कृती त्यांनी या सणात गोवल्या आणि त्यात समरसून जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून एकच सण भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात निरनिराळ्या नावाने ओळखला जातो आणि त्याची साजरी करण्याची पध्दतीही वेगळी आहे. मात्र त्यामागचा विचार समान आहे. हिंदू कालगणनेप्रमाणे वैशाख महिन्यातील शुध्द तृतीयेला येणारा अक्षय्य तृतीया हा सणही असाच महत्त्वाचा आहे. या सणाचं धार्मिक आणि व्यापारी महत्त्वही मोठं आहे. आपल्याकडे साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीया मानला जातो. अक्षय्य हा शब्द संस्कृत मध्ये ज्याचा क्षय (अंत) होत नाही असा या अर्थी वापरला जातो. म्हणून या दिवशी ज्याची सुरुवात होते ते अक्षय्य असतं अशीही एक कल्पना आहे.

WD
अक्षय तृतीया साजरी करताना भारताच्या भौगोलिक वैविध्याबरोबरच त्याचे संदर्भही बदलत गेलेले दिसतात. काही ठिकाणी हा दिवस श्री गणेशाने व्यास मुनींनी सांगितलेले महाभारत हे काव्य लिहायला सुरुवात केली तो दिवस मानून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो तर काही ठिकाणी याला विष्णूच्या सहाव्या अवताराचा (परशुरामाचा) प्रकटदिन म्हणून साजरा करण्याची पध्दत आहे. हिंदू मान्यतेप्रमाणे त्रेता युगाची सुरुवात या दिवसापासून झाली. दुसर्‍या एका मान्यतेनुसार द्वापार युगाची सुरुवातही याच दिवशी झाली. द्वारकेत कृष्णाचा मित्र सुदामा याने कृष्णासाठी पोह्याची पुरचुंडी भेट म्हणून आणली तोही दिवस हाच. अशा या दिवसामागे अनेक आख्यायिकाही जोडल्या गेल्या आहेत.

WD
उत्तर भारतात हा दिवस परशुरामाचा ( विष्णूचा सहावा अवतार) प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताच्या उत्तरेकडच्या राज्यात दानधर्म करण्याला फार महत्त्व आहे. या दिवशी केलेलं दान मोठं पुण्य मिळवून देतं असा समज आहे. त्यामुळे यादिवशी वस्त्र, जल, चंदन, नारळ अशा गोष्टी दान म्हणून दिल्या जातात. या दिवशी गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने पाप धुतलं जातं अशीही समजूत असल्याने यादिवशी गंगास्नानाला महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिवशी यात्रा प्रारंभ करण्यावरही भर असतो कारण या दिवशी सुरू केलेलं काम चांगली फळप्राप्ती करून देतं असा समज आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, चार धाम या यात्रांचा प्रारंभ या दिवशी होतो.

या दिवशी लग्न करण्याचाही प्रघात आहे. उत्तरेकडे यज्ञ याग करण्याचाही प्रघात विशेष दिसून येतो. दक्षिणेकडे अक्षय्य तृतीया साजरी करण्याची कारणं आणि परंपरा मात्र वेगळ्या आहेत. दक्षिणेत या दिवशी विष्णु-लक्ष्मी आणि कुबेर यांना विशेष मान दिला जातो. या दिवशी महाविष्णू पूजा आणि लक्ष्मी-कुबेर होम केला जातो. यादिवशी दक्षिणेतही दानधर्माला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. पण हे दान गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि कपडय़ांच्या रूपात केलं जाण्यावर इथे भर दिसतो. दक्षिणेत या दिवशी लोक महत्त्वाच्या देवळांना भेटी देतात. या दिवशी तिरुपती मंदिर, मीनाक्षी मंदिर, सहस्त्रखांब मंदिर अशा महत्त्वाच्या मंदिरात खूप गर्दी आढळते.

WD

राजस्थानात मात्र हा दिवस लग्न करण्याचा शुभदिवस म्हणूनच प्रख्यात आहे. आजही राजस्थानात या शुभमुहूर्तावर लग्न करायची ओढ असते. अजूनही अनेक ठिकाणी बालविवाह देखील ठरवले जातात. साजरेही केले जातात. ( कायदा काही करू शकत नाही असं म्हणायचं की कायद्याला किंमत नाही असं समजायचं?) बिकानेरसारख्या ठिकाणी पतंग उडवण्यावरही भर दिला जातो. तिथे अक्षय्य तृतीया पतंग उडवून साजरी केली जाते.

WD
महाराष्ट्रात अनेक परंपरिक प्रथांबरोबरच महिलांच्या हळदी-कुंकवाला जास्त महत्त्व आहे. हा मोठा सण मानतात. नवविवाहिता आजूबाजूच्या आणि नातेवाईकांमधील बायकांना हळदी-कुंकवाचं निमंत्रणदेतात. या दिवशी नारळ, गोड पदार्थ, बांगडय़ा असं काही देण्याचीही प्रथा आहे. पण खरं महत्त्व आहे ते वाटल्या डाळीला आणि कैरीच्या पन्ह्याला. याशिवाय त्याची पूर्तता होऊच शकत नाही. कोणतंही नवं का, व्यवसाय सुरू करण्याला हा दिवस अत्यंत शुभ मानतात.

WD
पश्चिम बंगालमध्ये या दिवशी नवीन वहीखातं सुरू करण्याची प्रथा आहे. त्याला ‘हलखाता’ म्हणतात. या दिवशी लक्ष्मी आणि गणपती यांची पूजा करून नवीन हिशेब सुरू केले जातात. त्यामुळे व्यवसायात चांगला फायदा होईल अशी धारणा असते. बरेच जण देवळांना भेट देतात. तर काही जणांकडे सत्यनारायण कथेचं आयोजन केलं जातं. गंगेत स्नान करण्यालाही या दिवशी खूप महत्त्व आहे. पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अक्षय्य तृतीयेला गंगास्नानाचा प्रघात दिसतो.

WD
ओरिसात ग्रामीण भागात धरणी मातेची पूजा करून अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. याला मुथी चुआन किंवा मुथी अनुकुला म्हणतात. या दिवशी शेतकरी नवीन कपडे घालून शेतात जातात. धरणीमातेची पूजा करतात आणि नवीन बियाणं पेरतात. शहरी भागात मात्र या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याला फार महत्त्व आहे. ओरिसाची सुप्रसिध्द रथयात्रेसाठी रथ तयार करण्याचं काम या दिवसापासून सुरू केलं जातं. त्यांची 42 दिवसांची चंदन यात्राही याच दिवशी सुरू होते.

WD
जाट समुदायातही अक्य तृतीयेचं महत्त्व वेगळं आहे. शेतीचे पुढच्या वर्षाचे अंदाज बांधण्यासाठी या दिवसाला फार महत्त्व आहे. यादिवशी घरातला कर्ता पुरुष सूर्योदयापूर्वी शेतात जातो आणि जाताना त्याला जे कोणी प्राणी किंवा पक्षी दिसतात त्यावरून येणार्‍या हंगामात पावसाळा कसा जाईल याचे अंदाज बांधले जातात. पीकपाणी कसं येणार याचा तो एक पूर्वानुमान असतो. हा दिवस ‘उनभुजा मुहूर्त’ म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी लग्न करण्याचा प्रघात आहे शिवाय या दिवशी जाट समुदायात अनेक सामुदायिक विवाहसोहळेही पार पडतात.

वेगवेगळ्या प्रांतात अक्षय्य तृतीयेची परंपरा वेगळी असली तरी त्यामागची कोणतीही नवीन गोष्ट चांगली पार पडावी ही भावना मात्र कायम आहे. यालाच आपल्या संस्कृतीतला ‘अनेकता में एकता’ हा धागा म्हणायला हवा.

वेबदुनिया वर वाचा