तुळशीचं रोप सारखं मरतंय ? मग कारण जाणून घ्या आणि या प्रकारे घ्या काळजी

बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (10:02 IST)
घरात तुळशीचं रोप असल्यास त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. 
 
हिवाळ्यात तुळशीला ओढणी चढवावी. असे केल्याने तुळशीला गार वार्‍यापासून वाचवता येतं. यानंतर नियमित करण्यायोग्य काम म्हणजे तुळशीजवळ दिवा लावणे. आपण सकाळ किंवा संध्याकाळ आपल्या सोयीनुसार दिवा लावू शकता. याने तुळशीजवळ गरमपणा राहील.
 
शक्यतो तुळशीला सकाळचे कोवळे ऊन आणि तिन्ही सांजेचे उतरते ऊन योग्य ठरतं. तुळशीला भर उन्हात ठेवणे टाळावे. जास्त सूर्यप्रकाश किंवा जास्त गारवा या दोन्हीं कारणांमुळे रोप मरते.
 
तुळशीच्या कुंडीतील माती सतत खुरपणी करून सैल व भुसभुशीत ठेवावी. खुरपणी केल्यास दुसर्‍या दिवशी तुळशीत पाणी घालू नये. याने रोप वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात तुळशीला अगदी गार पाणी घालू नये नाहीतर तुळस वाळू लागते.
 
तुळस लावण्यासाठी शक्यतो मातीच्या कुंडीचा आणि वृंदावनाचा वापर करावा.
 
तुळशीला पोषकतत्वे अधिक असलेली आणि जास्त पाणी शोषून न घेणारी माती लागते. त्यामुळे योग्य माती वापरावी. 
 
तुळशीच्या फुलांचे तुरे लहान असतानाच काढून टाकावे.
 
तुळशीवरील मंजरी वाळू लागल्यास लगेच हटवावी कारण याने तुळस वाळू लागते. सतत येत राहणाऱ्या मंजिऱ्या खुडल्यामुळे नवीन पानांची वाढ जोमात होते व झाड बरेच दिवस हिरवेगार राहते. 
 
तुळशीला खताची गरज नसते. तरीही तुळशीच्या कुंडीत वर्षांतून २ ते ३ वेळा मुठभर कुजलेले शेणखत मिसळावे. हे करताना वरची  २ इंच माती सैल करून घ्यावी. त्यातील थोडी माती काढून त्यात शेणखत घालून मातीत ते नीट मिसळून घ्यावे. खत घातल्यानंतर पाणी घालावे.
 
झाडांना कीड व रोगांची लागण दिसल्यास कोणत्याही परिस्थितीत तुळशीवर रासायनिक कीटकनाशके वा औषधे फवारू नका. अगदीच गरज भासल्यास हळदीचे पाणी, पाण्यात मिसळेले आंबट ताक झाडावर शिंपडा किंवा फवारा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती