श्री परशुराम माहत्म्य अध्याय २०

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीभरताग्रजाय नमः ॥
जय जय आदि पुरुषा निरंजना सर्वव्यापका चैतन्यघना अवयवानंत मदुसूदना जनार्दना जगत्पते ॥१॥
तुझे इच्छेचें जें मूळ, मायेनें रचिले विरंची गोळ लक्ष चौर्‍यासी योनी सकळ जीव आंत भरियेले ॥२॥
जेवीं तूतें विसरले विषय मदें धुंदावले अहंकृतीं भांबावले सक्त जाले दारा धनीं ॥३॥
ते उत्धरावया मूढ जन देवा तूं जालासी सगुण नाना कौतुकें दाखवून पावन ग्रंथ निर्मिले ॥४॥
ते ग्रंथ ऐकतां श्रवणीं पापी उद्धरती तत्क्षणीं भुक्ति मुक्ती लादोनी वैकुंथ भुवनीं जातीते ॥५॥
परिसोत लक्ष कथांमृती सांगीतली वैतरणी उत्पत्ती यावरी धर्मराज भूपती भीष्माप्रती अनुवादे ॥६॥
आहो परशुराम क्षेत्रांत विमळ बोलती महातीर्थ निर्माण व्हावया किमर्थ कारण समस्त वदावें ॥७॥
भीष्म ह्मणे धर्मातें ऐक राया सावचित्तें पूर्वीं हे कथा नारदातें ब्रह्म देवें सांगीतली ॥८॥
जाणूनि तेथींचे संवादता तूतें निवेदितों विमळकथा श्रीभार्गवें रणीं संहारिता त्रेतायुगीं क्षत्रियांतें ॥९॥
दुष्ट असुरांचा प्राणघात रणीं केला असंख्यांत त्यांमाजीं प्रतापवंत विमळीं दैत्य प्रगटला ॥१०॥
महातामसी भयानक चालों नेदी ऋषींचे मख गोब्राह्मणां प्रती पीडक विघ्न करिती परस्परें ॥११॥
मग मिळोनि सर्व ऋषी गार्‍हाणें सांगती भार्गवासी क्रोधें खळबळोनि मानसीं शैव तामसी पाचारिला ॥१२॥
रण माजवूनि थोर द्वंद्व युद्ध केलें घोर हरी सर्वेश्‍वर फरशुधर अजिंक वीर सकळिकां ॥१३॥
रामाचें अलोट संधान रणीं घेईल आतां प्राण हें विमळा सुरें जाणून पाठी देऊनि पळाला ॥१४॥
पक्ष पतीचा फडत्कार पाहोनि पळती पादोदर तेवीं पळतां असुर ॥ सोडी धीर समरंगणीं ॥१५॥
धांवतां विचारी मनीं ठाव नसे राहतां धरणीं पश्चिम दिशा लक्षोनी सागरा जीवनीं प्रवेशला ॥१६॥
परी वस्ती करावयातें स्थळ नाहीं असुरातें ॥ मग देवगिरी दैत्यनाथें उचलोनि घेतला मस्तकीं ॥१७॥
मग समुद्रा भीतरीं ठेविता जाहला देवगिरी तुंग पर्वत निर्धारीं महास्थळ निर्मिलें ॥१८॥
तया सरोवरीं निर्वेध चित्तें राहूनि आरंभी तपातें एकचरणीं ऊर्ध्वहस्तें शंकरातें आराधी ॥१९॥
किती काळ ऐशा रिती लोटतां रुद्र पार्वती पती प्रसन्न झाला तपांतीं वर द्यावया कारणें ॥२०॥
ह्मणे सावध होई विमळा प्रसन्न झालों आतां तुला भक्तराया ये वेळा इच्छित वरा मागावें ॥२१॥
कर्णी आकर्णितां वाणी मस्तक ठेविलें शंकर चरणीं वर मागे जोडल्या पाणी विनय वचनें करुनियां ॥२२॥
देव दैत्या मानव कुळा अजींक भूमी मंडळा समरंगणीं माझिया बळा ॥ परम वृध्धी होईजे ॥२३॥
आणि तुंग पर्वत स्थळ येथें करावें तीर्थजळ देवता चक्रें जीं सकळ वसोत येथें सर्वदा ॥२४॥
त्रिकाळीं तुझी भक्तिपूजा घडावा ऐसा हेतू माझा ॥ या कारणें भ्रुमध्वजा तु वांही येथें रहावें ॥२५॥
ऐसिया वचनें विनवणी ऐकतां तोषला शूलपाणी ह्मणे हे दैत्या शिरोमणी भक्तांमाजीं तूं एक ॥२६॥
धैर्य वीर्याची बरोबरी समस्त हो तुझे शरीरीं माझी मती निरंतरी करी येथें निरवेध पणें ॥२७॥
माझिया वरें महावीरा अजिंक होशी सुरासुरा परस्त्री आणि ऋषेश्‍वरां पीडितां नाश पावशी ॥२८॥
येरवीं विमळा तुजप्रती भय नाहीं या त्रिजगतीं ऐसें बोलोनि पार्वती पती दिव्य लिंग काढिलें ॥२९॥
ह्मणे या लिंगाचें पूजन करुनि भोगी अक्षय भुवन सांगोनि ऐसें ही आपण तेथेंचि तप करीतसे ॥३०॥
देवता चक्रांचे भार सेविती राहती निरंतर तैं पासूनि तुंगारेश्‍वर पवित्र स्थळ अद्यापी ॥३१॥
जन्मा आले ते प्राणी तुंगारेश्‍वर पाहवया नयनीं कुंडीं स्नान शिवदर्शनीं कैलास भुवनीं पाविजे ॥३२॥
ऐशा परी विमळासुर पर्वतीं राहिला निरंतर यानंतरें फरशुधर सागर शोषी अग्निबाणें ॥३३॥
निर्मूनीयां महेंद्र क्षेत्र आणिली वैतरणी पवित्र तपालागीं रेणुका पुत्र आश्रमीं आपण बैसले ॥३४॥
येरीकडे ऋषीमुनी दिव्य क्षेत्रातें पाहूनी गंगा तटाकीं वैतरणी तपाचरणीं बैसले ॥३५॥
कश्यप अत्री भारद्वाज विश्‍वामित्र गौतम सतेज जमदग्नी वसिष्ठ महाराज सप्त ऋषीही ॥३६॥
पाराशर व्यास शुक भ्रुगू अत्री उत्तंक यज्ञदुर्वास अगस्तीत्रिक कोहळक दत्त पैंग्यऋषी ॥३७॥
सनक आणि सनंदन सनत्कुमार सनातन सकळां सहीत आपण स्वामी नारद राहती ॥३८॥
ऐसे ऋषींचे संघाट वैतरणी तटीं घनदाट परशुरामाची कीर्ती अचाट भक्तिभावें वर्णिती ॥३९॥
तेथें यज्ञ यागादि कर्म परशुराम सेवेचा नित्य नेम वेदघोषें गर्जती परम भार्गव चरित्र वर्णिती ॥४०॥
कोणी करिती अध्ययन कोणी श्रीहरीचे ध्यानी मग्न कोणी कथिती दिव्यज्ञान ठायीं ठायीं बैसोनी ॥४१॥
जागृती स्वप्न उपाधी निरसूनि सुषुप्ती समाधीं तुर्य पदातें भेदी उन्मनी पदीं तल्लीन ॥४२॥
चारी देह चारी खाणी वेगळें पहाती लक्षोनी कोणी सत्रावीचे दोहनीं क्षीर घेती निरंतर ॥४३॥
असो ते ऋषी महंत परब्रह्मीं समाधिस्त तत्पदीं दंडवत समस्त करुनि ग्रंथ परिसीजे ॥४४॥
रिचीक ऋषी महामुनी जमदग्नि पिता तेजोखाणी तपियां माजीं शिरोमणी वैतरणी तटीं पातला ॥४५॥
पाहोनि उत्तम स्थान आरंभिला यज्ञ महान बोलावूनि ऋषी ब्राह्मण समिधा द्रव्य मेळविलें ॥४६॥
स्वाहा स्वधाकार ध्वनी गर्जे निरंतर कुंडीं प्रदीप्त वैश्‍वानर धूम्रें अंबर कोंदाटलें ॥४७॥
चत्वारि श्रृंग द्विमूर्धान सप्तहस्त त्रीचरण अग्न्यंतरी नारायण आहूती घेत यज्ञाची ॥४८॥
वृंदारक सुरपती परमानंदातें पावती तो सोहळा तुंग पर्वतीं विमळा सुरें पाहिला ॥४९॥
बैसला असतां शिवपूजनीं अंतरीं धडकला क्रोधाग्नी ह्मणे या समस्त ब्राह्मणांनीं काय सोंग मांडिलें ॥५०॥
तरी या वैष्णव यज्ञाचा नाश करणे आहूतींचा ॥ ऋषी आणि अमरांचा वैरी साचा अखंड ॥५१॥
पहा शंकरें वरदान वोपून दिधलें पुण्य भुवन परी आपुले स्वभावगुण कदा जाण न सोडी ॥५२॥
नित्य क्षीर घृतें पायस न्हाणितां नव्हे राजहंस पक्षी नित्य मेद मांस त्यातें षडूस नावडती ॥५३॥
सर्पालागीं दुग्धपान करितां न सांडी आपुले गुण केलिया अग्नीचें पूजन परी सदन जाळील की ॥५४॥
तस्कर स्वयें आपण जरी जाला साधू जन परी द्रव्यालागीं प्राण घेई क्षण न लागतो ॥५५॥
कर्पूर कस्तुरी भूमी करुन माजी पेरिला पलांडू लसुण घातलें भागीरथीचें जीवन परी दुर्गंधी न सोडी ॥५६॥
प्रकृती पुरुष न जाणती पंचभेद असत्य ह्मणती मिथ्या वादी अतिप्रीती तयां वेद कासया ॥५७॥
तयां कैंचा देवधर्म सार्वकाळ ह्मणती अहं ब्रह्म देवर्षींच्या स्त्रिया घेती हिरोन रुंडास्थि दीक्षा मिरविती ॥५८॥
ऐशा परी विमळासुर क्रोधें रगडोनियां अधर यज्ञ करिती धरामर तेथें सत्वर पातला ॥५९॥
पाषाण प्रहारें प्रचंड विध्वंसिलें होमकुंड समिधा द्रव्य उदंड विखारुनि टाकी चहूंकडे ॥६०॥
पुस्तकें कमंडलू अक्ष सूत्र आसन गवाळें अर्ध्यपात्र मुद्रिका उपकरणीं विचित्र विमळें सर्व भिरकाविलीं ॥६१॥
रिचीकादि ऋषी समस्त पळती होऊनि भयाभीत हर्ष मानोनि दैत्यनाथ तुंग पर्वतीं वळंगला ॥६२॥
येरीकडे ऋषीमुनी वेगीं पातले कैलास भुवनीं नमोनियां पिनाकपाणी प्रार्थिती ते ॥६३॥
जय जयाजी पंचवत्क्रा मोहशास्त्र करा त्रिनेत्रा कैलास पते कपाल पात्रा जगद्गुरु जगत्पते ॥६४॥
गंगाधरा भोगी भूषणा भूताधिपते भवानी रमणा काम दहना त्रिपुर हरणा अंधक मर्दना नमोस्तुते ॥६५॥
मन्युजा ईशान्येश्‍वरा अर्धनारी नटेश्‍वरा नाम पवित्रा सुरवरा करुणा करा नमोस्तुते ॥६६॥
तुंग पर्वतीं विमळासुर तुवां त्यातें अक्षय वर देऊनि केला आनिवार अह्मांलागीं पीडावया ॥६७॥
वैतरणी तटीं सत्कर्मा चरण आरंभितां महायज्ञ विमळा सुरें येऊन प्रचंड विघ्न पैं केलें ॥६८॥
फळ प्राप्तीचिये काळीं प्रदीप्त होता ज्वाळ माळी विध्वंस केला समूळीं होम द्रव्य समाधींचा ॥६९॥
आतां स्वामी तुज वांचूनी त्राता नसे दुजा अवनीं आकर्णितां शूळपाणी गौरवी वचनीं विप्रांतें ॥७०॥
तुह्मीं आतां धरणें धीर तेथें गुप्त भार्गववीर तोचि आलिया असुर नाश पावेल सहजची ॥७१॥
ऐसें बोलतां चंद्रमौळी जयजयकारें ऋषिमंडळी गर्जोनिया मही स्थळीं आपुले भुवनीं प्रवेशले ॥७२॥
भीष्म ह्मणती धर्माप्रती पुढें अश्चर्य कथेप्रती ऐकतां होतसे प्रीती अमृतापेक्षां ॥७३॥
श्रीमद्व्यास गुरुप्रेरणे जें वदतों यथार्थपणें तें विचार करोत अंतःकरणें श्रोते जन ॥७४॥
स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु ॥ विंशतीध्याय गोड हा ॥२०॥
श्रीरुक्मिणीकांतार्पण मस्तु ॥

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती