श्री परशुराम माहत्म्य अध्याय १६
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीता शोकहरणाय नमः ॥
जय जया भक्त वत्सला जय जया भार्गवा नला जय जया विश्व मंगला विश्वैक ईशा नमोस्तुते ॥१॥
हें एकादशी महाव्रत पूर्ण साधलें रेणुके प्रत तेणें ईश्वर साक्षांत जीचे उदरीं प्रगटले ॥२॥
वैशाख शुद्ध त्रितीयेसीं इंद्र पावला अक्षय पदासी तीच जयंती भार्गवासी त्रिजगीं असे प्रख्यात ॥३॥
अक्षय तृतीया दिवसीं स्नान दान अति विशेषीं पूजा करावी त्हृषीकेशी फरशुसहीत भक्तिभावें ॥४॥
सायंकाळीं पानक द्यावें विप्रांसी भक्तिपूर्वक आणि राम जननाचें कथानक पूजोनी वाचावें ॥५॥
गीत नृत्य वाद्यें गजर उच्छाह करावा जय जय कार दक्षिणा द्यावी अपार सदब्राह्मणांसी ॥६॥
ऐसें व्रत करितां अक्षय तयांसी विष्णू प्रत्यक्ष होय मग दुर्मीळ तयांसी काय कल्पवृक्ष घरीं त्याच्या ॥७॥
माहत्म्य अक्षय तृतीयेचें सर्व देव वर्णिती साचें स्कंद पुराणीं इतिहासाचें वर्णिलें त्द्याचा ॥८॥
अनंत चतुर्दशीव्रत प्रख्यात असे जगत्रयांत यथाविधी जे आचरत चतुर्विध पुरुषार्थ तयासी ॥९॥
व्रत असे हनुमत्रयोदशी मुनी पंचमी चतुर्वर्णासी पापक्षयार्थ अवश्येंसीं करणें सर्वदा ॥१०॥
कलौ कृष्णाष्टमी तिथी उपोषण करा आती भक्ती आणि व्रताची नसे मिती पंचकादिक बहुत ॥११॥
आषाढादि चातुर्मास्य व्रतें असती विशेष विष्णू सांगती ऋषी देवास मद्भक्तीस हीं मुख्य ॥१२॥
आषाढी कार्तिकी एकादशीसी गुरुपासूनी संस्कार ब्राह्मणांसी तप्त मुद्रा धारणाचा विशेषी वेदां मध्यें वर्णिल्या ॥१३॥
श्रावणे वर्जि जे शाका दधि त्याग भाद्रपदका अश्विने दुग्ध व्रत देखा कार्तिके द्विदळ टाकावें ॥१४॥
ब्रह्मचारी गृहस्तासी वानप्रस्थय ते श्वरासी व्रत हेंचि होय विशेषी एकादशी सदृश ॥१५॥
ब्राह्मणासी त्द्या व्रतावीण निष्फळ सर्व कर्मे जाण विष्णू न घेती पूजन तयापासूनी ॥१६॥
माहात्म्य अपार चतुर्मासी वर्णिलें वराह पुराणासी ऐकतां सर्व पुरुषार्थासी पावती नारी नर ॥१७॥
अष्टाद्श महापुराणांत आदि असे श्रीमद्भागवत त्याचें चातुर्मासीं पुण्य अनंत श्रवण पठणें करुनी ॥१८॥
महेंद्र पर्वतीं ऋषीराम सकळ ब्राह्मणांसी व्रतधर्म सकाम अथवा निष्काम सविस्तारें सांगतसे ॥१९॥
जे जे येती भक्तजन सेविती प्रेमें भक्ती करुन तयां प्रसन्न रेणुका नंदन सकळाभीष्ट देतसे ॥२०॥
भक्तजनांचें करुनी पालन दुष्टांचें करी निर्दाळण महेंद्र पर्वतीं वास करुन संकटीं पावे सर्वांच्या ॥२१॥
आणि आंवळीच्या सन्नि होत हे भार्गवेश्वर राह न तेथें पूजिती सतत इच्छित प्राप्ती होय तयां ॥२२॥
फाल्गुन शुक्ल एकादशीसी परशुराम प्रगटवेषी इच्छित देऊनि स्वभक्तांसी अमल करिती मनुष्या ॥२३॥
महेंद्र पर्वताचा महिमा वैकुंठाहून वाढला परमाख्याती जाहलीच वदा भुवना समस्त लोक दर्शना येती ॥२४॥
विमळ तीर्थी स्नानदान करिती तीर्थ विधी जे आचरती ते पुनर्जन्मा न येती सत्य सत्य त्रिवाचा ॥२५॥
सर्व देव इंद्रार्थी ईशचरण क्षाळण करितां विमळ गंगा जाहली उद्भुता उद्धारार्थ जगाच्या ॥२६॥
जितुकीं तीर्थें भूमीवर त्या पर्वतीं जाहले पाझर तेहतीस कोटी सुरवर वृक्ष पाषाण रुपें असती तेथें ॥२७॥
महेंद्र सदृश्य क्षेत्र दुजें नसे अतीपवित्र जेथें श्रीहरी रेणुकापुत्र तो महिमा काय वर्णूं ॥२८॥
भक्त वत्सल भक्तांसाठीं त्रीयुगींच अवतार तो जगजेठी भक्तासी देई ऐश्वर्यें आठी पुत्रपौत्रीं नांदवी ॥२९॥
सर्वव्यापी लक्ष्मीवरु जवळी असतां कल्पतरु न ओळखिती अंध बधिरु वांया कष्टती दैवयोगें ॥३०॥
भजा भजा श्रीरामासी जें जें काम्य तुमचे मानसीं सिद्धी होईल भरवसी रोगियांसि आरोग्यता ॥३१॥
अमृत मिळतां पानासीं क्षारकडू आवडे मूर्खासी ज्ञानवंत भक्तजनासी नामामृत श्रीहरिचें ॥३२॥
राम चरित्रांमृत सेवासेवा हो निश्चित भजा भजा हो अनंत मोक्षकामीं ॥३३॥
परशुरामाचें वाक्य दुःख मृत्यूसी सायक संशय छेदक सूत ह्मणे ॥३४॥
वर्णनीय चरित्र श्रवणासीं पवित्र वर्णिलें तें अत्र श्रोते जन हो ॥३५॥
पांच हे अध्याय पांच वेदकाय तराया उपाय हेंचि सत्य ॥३६॥
श्रीरामकथा अपार काय वर्णितों पामर परी संक्षेपू निसार यथामती ॥३७॥
पुढें वर्तली कथा अमृताहूनि गोडी तत्वतां भीष्म धर्म संवादिता जाली असे ॥३८॥
स्वस्तीश्री परशुरामचरित्र कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु षोडशोध्याय गोड हा ॥१६॥