भर्तृहरीस दत्तात्रेयाचें दर्शन, हातपाय तोडलेल्या शशांगर राजाच्या पुत्राची व गोरक्ष-मच्छिंद्रनाथाची भेट, पूर्व इतिहास.
गोरक्षनाथ भर्तृहरीस घेऊन गिरिनारपर्वतावर दत्तात्रेयाकडे गेल्यानंतर तेथें तो तीन दिवसपर्यंत राहिला. मग दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जावयास निघाला. त्या वेळेस, मला बहुत दिवस झाले, मच्छिंद्रनाथ भेटला नाहीं, म्हणुन त्यास एकदां माझ्या भेटीस घेऊन ये, असें श्रीदत्तात्रेयानें गोरक्षनाथास सांगितलें.
इकडे दत्तात्रेयानें भर्तृहरीस नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला व त्यास चिरंजीव केलें. मग त्याच्याकडून अभ्यास करविला. ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, वेद हीं सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकविल्या आणि साबरी विद्येंतहि त्यासि निपूण केलें. नंतर नाग अश्वत्थाच्या ठायीं असलेल्या संपूर्ण दैवतांचा आशिर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठविलें. तेथें जाऊन भर्तृहरीनें बावन्न वीर अनुकुल करून घेतले. मच्छिंद्रनाथाप्रमाणें त्यासहि सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले, मग भर्तृहरीस श्रीदत्तात्रेयानें आपल्याबरोबर बदरिकाश्रमास नेऊन तपश्वर्येस बसविलें व आपण गिरिनारपर्वतीं जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटांची वाट पाहात राहिले.
दत्तात्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्यानें त्यास दत्तात्रेयाचा निरोप सांगितला. मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरितां कांहीं दिवसांनीं दोघेजण निघाले. ते वैदर्भदेशाचा मार्ग लक्षून जात असतां कौंडण्यपूर नगरांत गेलें. तेथें ते भिक्षेकरितां हिंडत असतां त्याच्या असें दृष्टीस पडलें कीं, तेथील शशांगर राजानें क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गांवच्या चव्हाट्यावर टाकून दिलें आहे.
शशांगर राजा मोठा ज्ञानी, धीट, उदार, सामर्थशाली, सत्वस्थ व तसाच सदगुणी असतांना मुलची इतकी भयंकर दशा करून टाकण्याइतका राजा कां रागावला ? राजा रागावण्याचें कारण असें आहे कीं, ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळें तो राजास कृष्णानदींत प्राप्त झाला होता. पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हतें. त्यामुळें तो निरंतर उदास असे. राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे कीं, मुलासाठीं असें खंतीं होऊन बसण्यास अर्थ नाहीं. नशिबीं असेल तर संतान होईल, विचार करून काळजी वाहण्याचें सोडून द्या, चिंतेनें शरीर मात्र झिजत चाललें आहे; अशानें संसाराची धूळधाण होऊन जाईल. अशा रीतीनें राणीनें त्यास उपदेश केला असंताहि त्याचें चित्त स्वस्थ होईना. मग राजाच्या मनांत शंकराची आराधना करण्याचें येऊन त्यानें प्रधानास बोलावून आणलें व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला.
भग रामेश्वरास जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथें जावयास निघाला. तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला. तेथें शंकरानें त्यास स्वप्नांत दृष्टांत दिला कीं, तूं कांहीं काळजी करूं नको. तुला येथेंच पुत्र प्राप्त होईल. कृष्णा व तुंगभ्रद्रा यांच्यामध्यें माझें वास्तव्य आहे. समागमें पार्वतीहि आहे. तरी तूं आमची पूजा येथें नित्य करीत जा. ह्याप्रमाणें दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्रिडोहांत पाहूं लागला असतां तेथें एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडलें. त्याची राजानें मोठ्या समारंभानें अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली. हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा जडली. मग तेथें दर्शनासाठीं पुष्कळ लोक नित्य जाऊं लागले व 'जय जय शिव संगमेश्वर' असें बोलूं लागले. राजा संगमेश्वरीं नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून काल क्रमीत राहिला.
तेथून नजीकच्या भद्रसंगम गांवात मित्राचार्य या नांवाचा एक विप्र राहात होता. त्याच्या स्त्रियेचें नांव शरयू. ती मोठी पतिव्रता होती. त्यांसहि पोटीं कांहीं संतान नव्हतें, म्हणूण त्यांनींहि त्याच संगमेश्वराची ( शिवाची ) आराधना आरंभिली.
इकडे कैलासास शंकर कित्येक गणांसह बसले असतां सुरोचना नांवाच्या अप्सरेस शंकरानें बोलावून आणिलें. ती कैलासास आल्यावर शंकराच्या पायां पडून नाचावयास व गावयास लागली. परंतु त्यावेळेस शंकराचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली. ह्यामुळें नाचतांना तिच्या तालासुरांत चूक पडली, तेव्हां तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षांत आला व त्यानें तिला सांगितलें, सुरोचने ! तुझ्या मनांतील हेतू मी समजलों. तूं मनानें भ्रष्ट झाली आहेस, म्हणुन भद्रसंगमीं मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटीं तुला जन्म प्राप्त होईल.
शंकरानें सुरोचनेस असा शाप देतांच ती भयभीत झाली. स्वर्गच्युत होणार म्हणून तिला फारच वाईट वाटलें. शंकराशीं रत होण्याचा विचार मनांत आणल्याचा हा परिणाम, अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झालें. मग तिनें शंकराची स्तुती करून उःशाप देण्याकरितां विनंति केली. तेव्हां शंकरानें प्रसन्न होऊन सुरोचनेस उःशाप दिला कीं, तुं आतां मृत्युलोकीं जन्म घे, तुझी मनकामना पूर्ण होण्यासाठीं माझा तुला स्पर्श होतांच तूं स्वर्गीत येशील.
याप्रमाणें उःशापवाणी निघतांच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयू हिच्या उदरीं तिचा जन्म झाला. शरयू गरोदर होऊन नऊ महिने पूर्ण होतांच ती प्रसूत होऊन कन्या झाली. ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळें तिचें स्वरूप अप्रतिम होतें. तिच नांव 'कदंबा' असें ठेवण्यांत आलें. कदंबा बारा वर्षाची झाली तेव्हां तिच्या बापानें तिच्याकरितां वर पाहण्याचा प्रयत्न चालविला. परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती. ती रात्रंदिवस शंकराचें ध्यान करण्यांत निमग्न असे. शंकराची पूजा करण्यासाठीं आईबाप नित्य जात, त्यांच्यासमागमें ती नेमानें जात असे; परंतु ती मोठी होऊन तिला जसें समजूं लागलें, तशी ती एकटीहि शंकराच्या पूजेस देवालयांत जाऊं लागली.
एके दिवशी ती एकटीच शिवालयांत गेली होती. त्या वेळीं देवळांत दुसरें कोणी नव्हतें. 'जय शंकर' म्हणून शिवाच्या पाया पडून मस्तक जमिनीस टेकातांच शंकरानें अपलें प्रत्यक्ष रूप प्रकट केलें. तिला पाहतांच शिव कामातुर झाला. मग तो तिला धरण्याचा विचार करून धांवूं लागला, तेव्हां ती तेथून निसटून पळूं लागली. शिवानेंहि तिच्या मागोमाग धांवत जाऊन तिला धरिलें; पण शंकराचा स्पर्श होतांच ती सुरोचना पूर्ववत् अप्सरा होऊन स्वर्गास गेली.
परंतु कृत्य फसल्यामुळें शंकराच्या भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्णानदींत गेलें. पुढें शशांगर राजानें स्नान करून अर्ध्य देण्यासाठी हातांत उदक घेतलें, तों तें वीर्य हातांत आलें व राजास ओंजळीत मनुष्यदेहाचा पुतळा दिसूं लागला, मग आपणांस शंकरानें प्रसन्न होऊन अयोनिसंभव पुत्र दिला असा मनाशीं विचार करून अति हर्षानें घरीं जाऊन राजानें तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला. ब्रह्मदेव, शंकर, विष्णु, इंद्र, बृहस्पति ह्यापैकीं कोणीतरी हा अवतार घेतला असावा असें त्यास वाटलें. मग राणीनें आनंदानें त्यास स्तनाशीं लावतांच पान्हा फुटून मुलगा दूध पिऊं लागला. त्याचें नांव कृष्णागर असें ठेविलें व रीतीप्रमाणें सर्व संस्कार केले. मग कांहीं दिवस तेथें राहून राजा कौडण्यपुरास गेला.
पुढें कृष्णागराचें वय बारा वर्षीचें झालें, तेव्हां त्याचें लग्न करण्याचें मनांत आणून राजानें मुलाच्या रूपास व गूणांस योग्य अशी कन्या शोधावयास बरीच मंडळी देशोदेशीं पाठविली. त्या मंडळीनीं अनेक स्थळें पाहिली. पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाहण्यात येईना. मग ते सर्व परत कौडण्यपुरास गेले व त्यांनीं सर्व मजकूर राजाच्या कानांवर घातला. पुढें कांहीं दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली. तिच्या वियोगानें राजास परम दुःख झालें. राजानें वर्षश्राद्धापर्यंतचें तिचें उत्तरकार्य केलें.
पुढें राजास मदनाची पीडा होऊं लागली. पण पुनः लग्न करण्यास त्याचें मन धजेना. शेवटीं लग्न करण्याचा निश्चय करून त्यानें प्रधानास आपल्याजवळ बोलाविलें व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्यायोग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यांत आहे काय, असें विचारलें, तेव्हां प्रधानानें सांगितलें कीं, पुरोहितानें बर्याच मुलींच्या टिपणांच्या नकला करुन आणिलेल्या आहेत; त्यापैकीं घटित पाहून कोणत्या मुलीशीं जुळतें तें पहावें, मग त्याचा विचार करून लग्न जुळविण्यास ठिक पडेल. मग प्रधानानें पुरोहितास बोलावून आणलें व मुलींच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्यांत चित्रकूटचा राजा भूजध्वज ह्याच्या कन्येशीं चांगलें जमल. ती मुलगीहि अत्यंत रूपवती असून उपवरहि झालेली होती.
मग ही कामगिरी बजावण्याकरितां राजानें आपल्या प्रधानाला चित्रकुटास भूजध्वज राजाकडे पाठविलें. त्यानें तेथें जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळविला. भूजध्वज राजासहि ही गोष्ट मान्य झाली. पत्रिका काढून पाहतां कांहीं नडण्याजोगें आलें नाहीं. मग त्यास मुलगी देण्याचें त्या राजानें कबूल करतांच प्रधानानें पत्र लिहून आपल्या राजाकडे दूत पाठविला. तो कौंडण्यपुरास गेल्यावर पत्र वाचून शशांगर राजास परमानंद झाला व तो लग्नासाठीं चित्रकूटास गेला. लग्नसोहळा उत्तम प्रकारें पार पडला. नंतर भुजावंती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरांत परत आला. त्यावेळीं भुजवंती वय तेरा वर्षाचें व कृष्णागर पुत्राचें वय सतरा वर्षांचें होतें.
एके दिवशीं अशी गोष्ट घडून आली कीं, सापत्न पुत्राची व तिची नजरानजर झाली. त्यापूर्वीं तिनें त्यास निरखून पाहिलेलें नव्हतें. एकें दिवशीं राजा शिकारीस गेला असतांना राजपुत्र वावडी उडवावयास बाहेर पडला होता. त्यास पाहतांच भुजावंती कामानें व्याकूळ झाली. मग तिनें दासीस बोलावून सांगितलें कीं, तो पलीकडच्या घरीं वावडी उडवीत आहे; त्यास मजकडे घेऊन ये. आज्ञा होतांच दासीनें कृष्णानराजवळ जाऊन तुला तुझ्या सापत्न मातेनें बोलाविलें आहे, असा निरोप कळविला.
आईनें निरोप पाठविला म्हणून राजपुत्र आनंदानें दासीसमागमें भुजावंतीकडे गेला. त्यापूर्वीं तो एकदांच तिच्या भेटीस गेला होता. त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनीं होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे, म्हणुन आपलें भाग्य उदयास आलें, असें त्यास वाटूं लागलें. त्या वेळीं भुजावंती रंगमहालाच्या दाराशीं त्याची वाट पाहात उभी राहिली होती; इतक्यांत दासी कृष्णागरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावंती दाखवून निघून गेली.
कृष्णागर सापत्न आईजवळ गेल्यावर त्यानें आईस नमस्कार केला. परंतु कामानें व्यथित झाल्यामुळें तिनें हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेनें कृष्णागराकडे पाहिल्यानें तो मनांत दचकला. ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून, मला या वेळेस भोग देऊन माझा काम शांत कर, असें तिनें त्यास उघड सांगितलें. तसेंच त्यानें वश व्हावें म्हणुन तिनें दोन शब्द बोलून बराच आग्रह केला. त्या वेळीं कृष्णागरानें संतापून तिची भीड न धरितां तिला अतिशय फजीत केलें. तो तिला म्हणाला, तुं माझी प्रत्यक्ष सापत्न माता आहेस; असें असतां तूं आज मजशीं पापकर्म करावयास प्रवृत्त झालीस. तुं काय रानातलें जनावर आहेस ? स्त्रियांची जात अमंगळ व दुष्ट त्या कसा अनर्थ करून सोडतील, याचा नेम नाहीं. असें बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवावयास गेला.
त्या वेळीं कामानें आपला अंमल भुजावंतीवर बसविल्यामुळें ती देहभान विसरली होती. जेव्हां हा आपला सापत्न पुत्र आहे, असें तिच्या पूर्ना लक्षांत आलें, तेव्हां ती भयभीत होऊन गेली, तिनें दासीस बोलावून सांगितलें कीं, मघाशीं मी तुजकडून जो पुरुष आणविला तो कोणी परका नसून माझाच सावत्र मुलगा होता; ह्यामुळें मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे. आतां तो राजास ही हकिकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्यावांचून राहणार नाहीं. त्यास्तव आतां विष खाऊन आपणच जिवाचा घात करावा हें चांगलें म्हणजे ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाहीं.