श्री संतोषीमातेची व्रतकथा

गुरूवार, 28 एप्रिल 2022 (11:14 IST)
श्रीसंतोषीमातेची कहाणी
 
शान्ताकारं भुजगशयनं पद्यनाभं सुरेशम् ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ॥
लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥
 
"शेषावर सुखाने शयन केलेल्या, त्याच्या नाभीतून कमळ निघाले आहे अशा, देवांच्या देवाला, विश्वाला आधार असलेल्या, आकाशासमान सावळ्या रंगाचे सुंदर अंग असलेल्या, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, ध्यानाने मिळणार्‍या, संसारताप नाहीसा करणार्‍या लक्ष्मीपती लोकनाथ विष्णूला मी नमस्कार करतो."

आदिमाया जगज्जनी महालक्ष्मी श्रीसंतोषीमातेची ही कहाणी आहे.
 
लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे एके ठिकाणी फार काळ राहत नाही. एकदा लक्ष्मीने पाठ फिरवली की, मग मनुष्याची वाताहर व्हायला वेळ लागत नाही. पण तीच संतोषीमाता लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर कशाचा तोटा! दारिद्रय, दुःख पार नाहीसे होते. हातामध्ये हरभरे (फुटाणे) आणि गूळ घेऊन हात जोडून मनोभावे तिची प्रर्थना करावी. "माते, लक्ष्मी, तू आदिमाया, महाविष्णूची पत्‍नी आहेस. तुला पार नाही. सृष्टीची उलथापालथ तुझ्यामुळेच होताअसते. तू असलीस तर जीवन आहे, नाही तर जीवनात अर्थ नाही. हे महामाये, तू मला प्रसन्न हो. हा दीन सेवक तुझी प्रार्थना करीत आहे,"
 
अशी प्रार्थना करून झाल्यावर हातात असलेले हरभरे व गूळ गाईला खावयास घालावे. व्रत करणाराने पहिल्याने एका कलशात पाणी भरून त्यावर एका पात्रात हरभरे व गूळ ठेवावा. वरील प्रार्थना म्हणून झाल्यावर ते प्रसादरूपाने सर्वांना वाटावे व कलशातील पाणी तुळशीला घालावे.
 
याप्रमाणे चार महिने संतोषीदेवीचे व्रत करावे. यथाशक्ति उद्यापन करावे. सव्वा पैसा, सव्वा आणा अगर सव्वा रुपयाचे हरभरे, गूळ आणून प्रसाद वाटावा.
 
ब्राह्मणाला जेवायला घालावे. खीर-पुरीचे जेवण करावे. घरातील सर्व मंडळीना आनंदपूर्वक श्रीसंतोषीमातेची प्रार्थना करून प्रसन्न चित्ताने प्रसाद घ्यावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती