प. पू. नाना महाराज तराणेकर यांची अलौकिक दत्त भक्ती

गुरूवार, 6 मे 2021 (12:20 IST)
परम पूज्य नाना महाराज यांच्या घराण्यात दत्तभक्तीची उत्कटधारा पिढ्यानपिढ्यापासून होती. बाल वयातच प. पू. नानांना दत्तसाधनेची ओढ होती. श्रीदत्तप्रभू श्रीगुरु म्हणून मिळावेत ही तळमळ हृदयामध्ये असताना त्यांना गुरुमंत्र घ्यावासा वाटत होता. दत्त भक्तीसाठी आणि गुरुमंत्राची आस ठेवून श्रीगुरुचरित्राचे पारायण करण्याची आस प. पू. नानांच्या मनता ओढ घेऊ लागली. 
 
सकाळी श्रीगुरुचरित्राचे पारायण आणि संध्याकाळी मोजका आहार सुरु केला. श्रीगुरु गुरुमंत्रासाठी दर्शन देतील असे मनीच वाटत असताना दर्शन घडले नाही. तेव्हा दुसऱ्या दिवसापासून पुन्हा श्रीगुरुचरित्राचे पारायण करण्यास प्रारंभ केली. यावेळी देखील श्रीगुरूंचे दर्शन झाले नाही तेव्हा तिसर्‍या पारायणास सुरुवात केली. यावेळी आहारात केवळ दुग्धपान करवायचं मर्यादित ठेवले. अजूनही श्रीगुरुभेटी झाली नाही तर पाचवे नंतर सहावे पारायण केवळ एकवेळ दुग्धपान करून केले. तरी गुरुमंत्राची वेळ आली नाही. आता मात्र प. पू नानांनी काहीही अन्न व पेय भक्षण न करता पारायण करायचे ठरवले. सलग सात दिवस पोटात अन्नग्रहण न करता पारयण सुरु ठेवले. आता श्रीगुरुचरित्राच्या सातव्या परायणाचा शेवटच्या दिवशी शेवटचा अध्याय वाचून झाला. नाना "आता तरी श्रीगुरु या" अशी आर्त विनवणी करू लागले आणि श्रीगुरु परमहंस परिव्राजकाचार्यश्रीमदवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वायूवेगाने प. पू. नानांच्या उत्कट भक्तीपुढे दर्शनांकित झाले. 
 
त्यांना बघून प. पू. नानांच्या डोळ्यात आनंदाश्रू बरसत होते. त्या भेटीत प.पू नाना हे श्रीगुरूंना म्हणाले "क्षमस्व गुरुदेव, आपणास माझ्यामुळे येथे येण्याचा त्रास घ्यावा लागला". त्यावर श्रीगुरूं उदगारिले "बाळा किती कष्ट घेतोस". श्रीगुरुंची चरणभेट झाली आणि श्रीगुरूंनी प. पू. नानांनी दत्तभक्तीचा प्रसार करावा असा आशीर्वाद दिला. 
 
श्रीगुरुंनी प. पू. नानांच्या कानात गुरुमंत्र अनुग्रहित केला. अशी श्रीदत्तप्रभूंची भक्ती निग्रहपूर्वक करणारा भक्त प. पू. नानांच्या स्वरूपात शिष्य म्हणून लाभला. 
 
नंतर प. पू. नानां महाराजानी दत्तभक्तीचा प्रसार करताना अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली आणि दिव्य अनुभव घेतले. श्री टेंब्ये स्वामींकडून आज्ञा घेऊन नर्मदा परिक्रमाही पूर्ण केली. या परिक्रमेत प. पू. नानांना अनेक देवदेवतांची दिव्य दर्शने घडली. त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी भ्रमण करताना देखील त्यांना अनेक दिव्य अनुभव लाभले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती