मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे व्रत करतात. देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात. कुटुंबात सौख्य - समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. यंदा 2022 मध्ये मार्गशीर्ष महिना 24 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे आणि योगायोग म्हणजे हा दिवस गुरुवार असल्यामुळे या महिन्याचा पहिला गुरुवार हा 24 नोव्हेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरु करावे.
मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी.