श्री कोकिळा माहात्म्य अध्याय ऐकोणतिसावा
बुधवार, 19 जून 2024 (11:43 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
श्रीकृष्ण म्हणे धर्मालागून ॥ स्त्रियांचें धर्मे केलें निवेदन ॥ आणीक ऐके सावधान ॥ जेणें पातकें नासती ॥१॥
भ्रताराचें चरण ॥ स्त्रिनें करावें प्रक्षाळण ॥ तदनंतर करावें भोजन ॥ ऐसा नित्य नेमेसीं ॥२॥
पतीसी कठोर वचन ॥ न बोलावे धर्मा जाण ॥ अपराधी मी म्हणून ॥ वारंवार विननावें ॥३॥
पती देखतां पूर्ण ॥ स्त्रीनें करावें हास्यवदन ॥ आपल्या भ्रतारातें टाकून ॥ एकांती शयन करुं नये ॥४॥
जी स्त्री एकांती शयन करी ॥ ती घुबड होईल निर्धारीं ॥ जी भ्रतारास मारूं इच्छी नारी ॥ ती वाघीण होईल ॥५॥
जी स्त्री पतीचा द्वेष करीत ॥ ती कर्कशा होय नेमस्त ॥ जी स्त्री पतीवांवूण मिष्ट ॥ अन्न भक्षिती त्या ॥६॥
ती स्त्री अरण्यामाजी पूर्ण ॥ होईल डुकरी धर्माजाण ॥ जी स्त्री भ्रतारासी मारीत पूर्ण ॥ ती स्त्री चांडाळीण जाणावी ॥७॥
जी पतीची निंदा करीत ॥ ती दुर्भाग्य होत ॥ तिचे दर्शन होतां सत्य ॥ शचिल स्नान करावें ॥८॥
पुरुषानेंही आपुला धर्म जाण ॥ करावा शरीर रक्षण ॥ वेडी अथवा चांगली जाण ॥ तिचा त्याग करू नये ॥९॥
तांबुल पतीसी करावें अर्पण ॥ त्यासी वारा घालावा पूर्ण ॥ अशी सेवा करुन ॥ मग निद्रा करावी ॥१०॥
जी स्त्री पतीस करी प्रसन्न ॥ तीस देव स्वयें आपण येऊन ॥ देऊनियां वरदान ॥ मग कामना पुरवील ॥११॥
सर्व धर्म सोडून ॥ पतीचे करावें सेवन ॥ तेणें सकळ तीर्थाचें स्नान ॥ केलें जाण तत्वतां ॥१२॥
जिसी जिसी नाहीं भ्रतार पूजन ॥ तिसीं विधवा म्हणावें जाण ॥ त्या विधवेचें दु:ख दारुण ॥ मोठें असे जाण पां ॥१३॥
त्या विधवेचें दर्शन ॥ पुरुषें न करावें जाण ॥ त्या स्त्रीचा त्याग करुन ॥ स्वस्त असावें स्वगृहीं ॥१४॥
स्त्रियांनी आपला धर्म पूर्ण ॥ रक्षण करावा संभ्रमें करुन ॥ सदां सर्वदा हर्षमान ॥ आनंदयुक्त असावें ॥१५॥
पती पावलिया मरण ॥ स्त्रीनें करावें सहगमन ॥ अश्वमेधाचें फळ पूर्ण ॥ उभयतांसी प्राप्त होय ॥१६॥
तें गृह जाणावें धन्य ॥ ज्या गृहीं परिव्रता असे पूर्ण ॥ दोन्ही कुळा करी पावन ॥ पतिव्रता धर्म आचरतां ॥१७॥
ऐशा धर्मे करुनी ॥ स्वर्ग सुख घडे उभयतांलागूनी ॥ स्वर्गी अमृतपान करुनी ॥ अक्षयीं सुख पावती ॥१८॥
बहु जन्मीचें पुण्य असेल ॥ तरीच पतिव्रता होईल ॥ गृहस्थाश्रमी सुख भोगून ॥ पुढें स्वर्गसुख पावतसे ॥१९॥
पतिव्रता धर्मे करुन ॥ पुत्रपौत्रें नांदती त्या धर्मे करुन ॥ सकळ तीर्थे घडे स्नान ॥ सकळ व्रतें घडलीं तिसीं ॥२०॥
स्त्रियांनी बहुतकरुन ॥ करावें पतीसेवन ॥ तेणें पुण्यें करुन ॥ सर्व धर्म घडती तिसीं ॥२१॥
पतिव्रतेचा महिमा ॥ न वर्णवे काणा ॥ तिचा अगाध महिमा ॥ धर्मराया किती सांगूं ॥२२॥
प्रात:कालीं उठून ॥ झालिया पतिव्रतेचें दर्शन ॥ त्याचे पुरती सकळ काम ॥ पुण्य अगाध घडे त्यासी ॥२३॥
कृष्ण म्हणे धर्माराया ॥ पतिव्रतेचा सांगितला महिमा ॥ तिच्या पुण्याची गणना ॥ शेषाचेनी न होय ॥२४॥
तें गृह जाणावें धन्य ॥ ज्या गृहीं पतिव्रता असे पूर्ण ॥ दोन्ही कुळा करी पावन ॥ ऐसा महिमा पतिव्रतेचा ॥२५॥
या अध्यायाची फळश्रुती ॥ किती सांगूं तुजप्रती ॥ गंगास्नान निश्चितीं ॥ घडलें जाण श्रवणमात्रें ॥२६॥
इतिश्रीभविष्योत्तरपुराणें ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्ये ॥ एकुणत्रिशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥२९॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥
॥ अध्याय २९ वा समाप्त: ॥