प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ वी तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशीला हरिदिनी असेही म्हणतात. एकादशी विष्णूची तिथी मानलेली असून या दिवशी उपवास करतात. दुसर्या दिवशी त्याची पारणा करतात. एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसर्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते.
प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये २४ एकादश्या येतात, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीची नावे – कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी.
कृष्ण पक्षातील एकादशीची नावे अशी – पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला व विजया. एकादशीचे नित्य व काम्य असे प्रकार सांगितले आहेत.
एकादशीच्या दिवशी ब्रह्महत्यादी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास करण्यास सांगितले जाते. वर्षाच्या २४ एकादश्या नियमाने करणे व त्या दिवशी विष्णुपूजा, जागरण, हरिकथा श्रवण इ. गोष्टी करणे हे नित्य व्रत सांगितले आहे.