मळ्यात एक मोठी विहीर होती. त्यात खूप पाणी भरले होते. काठावर एक चिंचेचे झाडं होते. त्यांनी त्या झाडाखाली कणसे भाजण्यासाठी लाकडे पेटविली. खूप मोठा जाळ झाला. त्या झाडांवर मधमाशांचे एक आग्यामोहोळ होते. खाली जाळ पेटल्यावर मधमाश्यांना विस्तवाची धग लागल्यावर लगेच माशा उठून मोहोळावरून उडाल्या आणि विस्तवाभोवती बसलेल्या लोकांना चावू लागल्या. सर्वजण घाबरून पळाले. एकटे महाराजच चिंचेच्या झाडाखाली बसूनच राहिले. त्यांनी विचार केला की मधमाशी मीच, मोहोळ मीच, कणसेही मीच, कणसे खाणाराही मीच. म्हणून महाराज शांतपणे बसून राहिले.
मधमाश्या त्यांना सर्व अंगाला चावू लागल्या. बंकटलालला वाईट वाटू लागले की आपल्यामुळे महाराजांना त्रास झाला. तो महाराजांच्या दिशेने जाऊ लागला. हे बघून महाराजांनी मधमाश्यांना सांगितले, "जा मोहोळावर परत जाऊन बसा. माझा भक्त येत आहे.'' माश्या जाऊन मोहोळावर बसल्या.
महाराज हसून म्हणाले, वार रे बंकटा, तू खूप मेजवानी केलीस माश्यांची. यामुळे लड्डू भक्त दूर झाले. याचा विचार कर संकट आल्यावर एका ईश्वरांवाचून कोणीही मदतीला येत नसे. यावर बंकट म्हणाले, महाराज माफी असावी मी आता सोनाराला बोलवतो अंगावर बोचलेले माश्यांचे काटे काढण्यासाठी.