शतकातील सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण

गुरूवार, 26 जुलै 2018 (15:26 IST)
२७ जुलै रोजी म्हणजे उद्या रात्री या शतकातील (२००१ ते २१००) सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पहायला मिळणार आहे. या वेळेस होणाऱ्या ग्रहणाचा कालावधी सुमारे चार तास (३ तास ५५ मिनिटे ) असल्याने हे सर्वात मोठ्या कालावधीचे ठरणार आहे. याच दिवशी सूर्यमालेतील क्रमांक चारचा तांबडा ग्रह मंगळ ही प्रतियुती मध्ये येत असून तो २००३ नंतर प्रथमच इतक्या कमी अंतरावर येत आहे. यात सूर्य - पृथ्वी - चंद्र व मंगळ ग्रह हे सर्व एकच रेषेत येत आहेत. या वेळेस खग्रास स्थितीतील तांबडा चंद्रव तेजस्वी तांबडा ग्रह मंगळ हे दोन्हीही आकाशात लक्ष वेधून घेणार आहेत.
 
हे खग्रास चंद्रग्रहण हे सोरास चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडातून (युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया & न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका) हे ग्रहण पहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतातून यावेळी ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे.
 
या वेळेस भारतीय प्रमाण वेळ २७ जुलै रोजी २३ वाजून ५४ वाजता चंद्र पृथ्वीच्या पश्चिमेकडील बाजूने विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे. खग्रास स्थिती वेळ २८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता सुरु होणार आहे. ग्रहण मध्य २८ जुलै रोजी १ वाजून ५२ मिनिटांनी होणार आहे, तर पहाटे २:४३ वाजता ग्रहणाची खग्रास स्थिती संपेल व चंद्र विरळ छायेतून दिसायला सुरुवात होईल व ३:४९ वाजता ग्रहण समाप्ती होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती