Champa Shashti 2022 श्री खंडोबाचे नवरात्र

मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (07:23 IST)
मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते.

चंपा षष्ठी पूजा : मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
चंपा षष्ठी पूजा मुहूर्त : षष्ठी तिथी प्रारंभ: 28 नोव्हेंबर 13:35 मिनिटांपासून
षष्ठी तिथी समाप्त: 29 नोव्हेंबर 2022 11.05 मिनिटापर्यंत
 
नवरात्र पूजा
नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालून तयार केलं जाणारं पदार्थ, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो. तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण "सदानंदाचा येळकोट" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. ब्राह्मण-सुवासिनीला जेवायला बोलवतात.
 
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले, असे सांगितले जाते. मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी श्रीशंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला. युद्धाला प्रारंभ झाला तो मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेचा दिवस. तेव्हा पासून मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल प्रतिपदा ते षष्ठी असा सहा दिवस उत्सव साजरा होत असतो. मणी आणि मल्ल दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला असल्याची आख्यायिका आहे.
 
खंडोबाचे सात कोटी सैन्य होते. खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव असून कानडी भाषेत येळू म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. त्यामुळे तळी आरतीच्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो. अर्थात सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी, अशी प्रार्थना केली जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती